एवढे उशिरा आणि तेही तोंडी... ?

By admin | Published: August 9, 2016 01:04 AM2016-08-09T01:04:08+5:302016-08-09T01:04:08+5:30

फार उशीर झाल्यानंतर आणि लोक वाट पाहून थकल्यानंतर पंतप्रधानांनी आपले तोंड उघडून गुजरातमध्ये दलितांवर केलेल्या अत्याचारांसाठी तिथल्या तथाकथित गोरक्षकांना फटकारले आहे

So late and pretty ...? | एवढे उशिरा आणि तेही तोंडी... ?

एवढे उशिरा आणि तेही तोंडी... ?

Next

फार उशीर झाल्यानंतर आणि लोक वाट पाहून थकल्यानंतर पंतप्रधानांनी आपले तोंड उघडून गुजरातमध्ये दलितांवर केलेल्या अत्याचारांसाठी तिथल्या तथाकथित गोरक्षकांना फटकारले आहे. गायीच्या रक्षणाचे नाव घेऊन दलित आणि महिलांवर अत्याचार करणारे हे लोक गुंड आहेत आणि रात्री दंगे करून दिवसा गोरक्षक असल्याचे सोंग आणणारे आहेत अशी जोरकस टीका त्यांनी या हल्लेखोरांवर केली आहे. (चोरूनमारून का होईना संघानेही त्यांच्या आवाजात आपला आवाज आता मिसळला आहे. दलित हा हिंदू समाजाचा भाग आहे आणि तो दुबळा आहे असे मानणाऱ्या या संघटनेला आपल्या त्याविषयीच्या जबाबदारीचे भान उशिरा का होईना आता आले ही एक त्यातल्यात्यात चांगली गोष्ट आहे.) गुजरातमधील भाजपाचा परंपरागत मतदार असलेला पटेलांचा मोठा वर्ग आरक्षणाची मागणी घेऊन त्याच्या विरोधात गेला आहे आणि उनामधील दलितांना झालेल्या राक्षसी मारहाणीमुळे त्यानेही राज्यभर एका व्यापक आंदोलनाची आखणी केली आहे. या दोन्ही प्रकारात गुजरात सरकारची हतबलता व दिशाहीनता उघडही झाली आहे. आरक्षणाची मागणी करणे हा देशद्रोह ठरवून तेथील जुन्या आनंदीबेन सरकारने त्या आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला अटक केली. (आणि जागतिक कीर्ती मिळवून दिली) भादंसचे १२४ अ हे देशद्रोहाबाबतचे कलम देशाच्या (म्हणजे सरकारच्या कारभारावरील) टीकेसाठी वापरायचे नसून देशाविरुद्धच्या प्रत्यक्ष कृतीसाठी वापरायचे आहे ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतरही ते हार्दिकविरुद्ध वापरले गेले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प्रत्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्धही सरकारने ते वापरले. त्यातून गुजरातचे आनंदीबेन सरकार त्यांच्या मुलामुलींनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारासाठी देशात बदनाम झाले होते. ही स्थिती त्यांना घालवायला जेवढी उपयुक्त तेवढीच त्या निमित्ताने हाताबाहेर चाललेल्या तेथील गोरक्षकांनी चपराक लावायला उपयोगाची वाटली असणार. मात्र यापुढचा प्रश्न या गोरक्षकांना कायद्याचा धडा शिकविण्याचा आहे. त्या दिशेने मोदी व गुजरातचे नवे मुख्यमंत्री विजय रूपानी हे कोणती पावले उचलतात हे पहायचे आहे. दादरीकांड विस्मरणात जायचे आहे आणि त्यातले खुनी गोरक्षक मोकाट आहेत. हातात दंडुके घेतलेल्या त्यांच्या झुंडी त्याचमुळे देशभर उंडारू लागल्या आहेत. धर्मवंशाच्या वा त्यांच्या चिन्हांच्या नावाने दहशत उभी करणे हा फॅसिझमचा प्रकार आहे. विरोधकांना देशद्रोही ठरविणे हीदेखील फॅसिझमचीच दुसरी बाजू आहे. काश्मिरातले हत्त्याकांड थांबत नाही आणि देशभरातील अल्पसंख्यकांना भयभीत करण्याचे प्रकारही थांबत नाहीत हा अतिरेकी बहुसंख्यांकवादी प्रवृत्तीचाच निदर्शक प्रकार आहे. सबब पंतप्रधानांनी गोरक्षकांना तोंडी फटकारे लावून फारसे काही साध्य व्हायचे नाही. त्यांच्या मुसक्या आवळून व त्यांना न्यायासनासमोर उभे करून दलितांना त्यांच्या मानवी हक्कांची हमी देणे हाच या प्रकारावरील खरा इलाज आहे. मेलेली गुरे उचलणे, त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणे आणि इतरांनी घाण केलेल्या मोऱ्या साफ करणे अशी कामे एकेकाळी समाजाने दलितांची मानली. गुजरात प्रकरणानंतर आम्ही असली घाणेरडी कामे करणार नाही हा त्या वर्गाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह व समानतेशी सुसंगत असलेला आहे. या निर्णयावर ठाम राहून देशभरच्या दलितांनी आपण असा अन्याय यापुढे सहन करणार नाही हे साऱ्यांना सांगितले पाहिजे आणि समाजातील विधायक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांचे बळ वाढविले पाहिजे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, गुजरात व पंजाबसह देशातील अनेक राज्यांत विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे आजचा काळ राजकीयदृष्ट्या संवेदनशील झाला आहे. आपल्या धमकीवजा भाषेला समाज भितो ही धारणा असणाऱ्यांच्या दहशती कारवाया या काळात वाढतील आणि अत्याचाराच्या घटनांतही आणखी भर पडेल. याच काळात समाजातील सगळ्या पुरोगामी, विधायक व सर्वधर्मसमभाव हा विचार मानणाऱ्यांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे. पंतप्रधानांच्या धमकावणीला कायद्याच्या प्रक्रियेची जोड मिळाली पाहिजे. समाज आश्वस्त असेल तरच देश व सरकार यशस्वी होत असतात. अन्यथा केवढ्याही मोठ्या सुधारणा वा योजना राबवायला घेतल्या तरी जनतेतला रोष त्यामुळे कमी होत नाही आणि त्या योजनांच्या वाट्यालाही यावे तसे कौतुक येत नाही... जाता जाता एक गोष्ट देशातील गांधीवादी म्हणविणाऱ्यांच्या या संदर्भातल्या मौनाविषयीचीही. देशात धर्मांधतेने धुमाकूळ घातला आहे. जातीय शक्ती हिंसाचारावर उतरल्या आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत आणि दलित व अल्पसंख्य यांना निशाणा बनविले जात आहे. शिवाय या साऱ्यांना बळ देणारे पक्ष व तथाकथित सांस्कृतिक संघटना विस्तारत आहेत. या काळात गांधी वा जयप्रकाशांचे नाव घेणाऱ्या शांततावादी, अहिंसक व जनतेच्या चळवळी जागविणारे त्या चळवळींचे आजचे वंशज काय करीत आहेत? गांधी वा जयप्रकाश या काळात गप्प राहिले असते काय?

Web Title: So late and pretty ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.