सांस्कृतिक समृद्धतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 11:03 PM2017-03-24T23:03:39+5:302017-03-24T23:03:39+5:30

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने व्यापक भूमिका स्वीकारत शासकीय उपक्रम आणि कार्यक्रम मुंबई-पुण्याबाहेर घ्यायला सुरुवात केल्याने

Moving towards cultural prosperity | सांस्कृतिक समृद्धतेकडे वाटचाल

सांस्कृतिक समृद्धतेकडे वाटचाल

Next

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने व्यापक भूमिका स्वीकारत शासकीय उपक्रम आणि कार्यक्रम मुंबई-पुण्याबाहेर घ्यायला सुरुवात केल्याने जळगावसारख्या छोट्या शहरांमध्ये ही चळवळ जोर धरू लागली आहे. सांस्कृतिक संस्था अल्पबळावर ही चळवळ कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना राज्य शासनाची साथ मोलाची ठरत आहे.
बालगंधर्व संगीत महोत्सव नियमितपणे आयोजित करणाऱ्या स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानला यंदा पं.भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा मान मिळाला. विख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांना जीवन गौरव पुरस्कार या सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांचे गाणे ऐकण्याचा स्वर्गीय आनंद जळगावकरांनी घेतला. त्यासोबतच प्रीती पंढरपूरकर, सानिया पाटणकर, देबवर्णा कर्माकर, धनंजय हेगडे, रुचिरा पांडा यांचे गायन तर समीप कुलकर्णी, अभिषेक लहिरी, उन्मेषा आठवले, विवेक सोनार यांच्या वादनाचा आनंद रसिकांनी घेतला. तीन दिवसीय संगीत महोत्सवाला प्रतिसाददेखील चांगला लाभला.
याच सांस्कृतिक कार्य संचालनालयाने बालशाहीर प्रशिक्षण शिबिर प्रथमच जळगावात घेतले. जळगाव जिल्हा शाहीर परिषदेच्या सहकार्याने नगरदेवळा या छोट्या गावात २० दिवस हे शिबिर झाले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील ९ ते १५ वयोगटातील २५ मुले-मुली या शिबिरात सहभागी झाली. शाहीर परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दादा पासलकर, शिवाजीराव पाटील यांच्यासारख्या शाहिरांनी बालशाहिरांना शाहिरी, पोवाडा, गवळण, सवाल-जबाब, लोकगीते यासोबतच पोषाख, अभिनय, वाद्य-संगीत, शाहिरीचा इतिहास याविषयी माहिती आणि प्रात्यक्षिक दिले. शाहिरी कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आणि तिचे संवर्धन व प्रसार करण्याचा स्तुत्य प्रयत्न या शिबिरातून झाला. राज्य नाट्य स्पर्धेकडे नाट्यसंस्थांनी पाठ फिरविल्याने केंद्र वाचविण्याची वेळ काही वर्षांपूर्वी आली होती. त्याच स्पर्धेला आता उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दर्जेदार नाटके सादर होत आहेत. परिवर्तनसारख्या संस्थांच्या स्पर्धेतील नाटकांचे राज्यभर प्रयोग होऊ लागले. पूर्वी विकास मंडळ या नाट्य संस्थेने अशीच कामगिरी केली होती. चांदोरकर प्रतिष्ठानने पुढचे पाऊल टाकत व्यावसायिक रंगभूमीसाठी नवे नाटक बसविले आहे. जळगावचे गुणी नाटककार प्रा.डॉ. हेमंत कुलकर्णी यांनी खान्देशी बोलीभाषेतील ‘संगीत संशेवकल्लोळ’ हे नाटक लिहून दिग्दर्शित केले आहे. २५ तरुणांना निवडून या नाटकाची तालीम सध्या सुरू आहे. स्व.मच्छिंद्र कांबळी यांच्या महालक्ष्मी या प्रसिद्ध नाटक कंपनीने सहकार्याचा हात देऊ केल्याने खान्देशी रंगकर्मी या नाटकाच्या रूपाने महाराष्ट्रात पोहोचणार आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांनी खान्देशी बोलीभाषा महाराष्ट्रभर पोहोचली आहे. या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा ती संधी मिळाली आहे. खान्देशी रंगकर्मी गुणवान आणि जिद्दी आहेत. पुण्यातील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे विजेतेपद ३५ वर्षांपूर्वी मिळविले आणि पुढे या स्पर्धेचे केंद्रदेखील जळगावात खेचून आणले. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ही स्पर्धा अखंडपणे सुरू आहे. ‘गोट्या’ या दूरचित्रवाणी मालिकेद्वारे महाराष्ट्रभर पोहोचलेले कलावंत स्व. भैय्या उपासनी यांनी ‘नटसम्राट’चे २५ प्रयोग राज्यभर केले होते. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी यांच्यासारख्या दिग्गजांनी साकारलेली ‘आप्पासाहेब बेलवलकरां’ची भूमिका उपासनींनी कसदारपणे साकारली. चाळीसगावातील एका दर्दी रसिकाने त्यांच्या अभिनयाला दाद देत स्वत:ची नवी कोरी बुलेट गाडी उपासनी यांना भेट दिली होती. ‘संगीत संशेवकल्लोळ’च्या निमित्ताने पुन्हा एकदा खान्देशी रंगकर्मींना ही संधी मिळाली आहे. हे सगळे छान असले तरी रंगकर्मींपुढे डोंगराएवढ्या समस्या आहेत. तालमीसाठी चांगल्या जागा न मिळणे, बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात अनंत अडचणी, नव्या नाट्यगृहाची संथ उभारणी, सादरीकरण खर्च देण्याविषयी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची चालढकल अशी समस्यांची मालिका आहे. पण त्यावर मात करीत रंगकर्मी वाटचाल करीत आहे. त्याचे कौतुक करायलाच हवे.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: Moving towards cultural prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.