मोदींचा मीडियावर अंकुश लावण्याचा इरादा ?

By admin | Published: May 10, 2014 02:50 AM2014-05-10T02:50:18+5:302014-05-10T02:50:18+5:30

नरेंद्र मोदींसारखा पुढारी दिवसातून चार-चार वेळा मीडियाला ‘बातम्यांचे व्यापारी’ म्हणतो, निवडणूक आयोगाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल शंका उपस्थित करतो तेव्हा भीती वाटते.

Modi's intent to curb media? | मोदींचा मीडियावर अंकुश लावण्याचा इरादा ?

मोदींचा मीडियावर अंकुश लावण्याचा इरादा ?

Next

- एन.के.सिंह

मीडियात हिंमत असेल तर राहुल गांधींना अमेठीच्या विकासाबाबत प्रश्न विचारा’, ‘हे तर बातम्यांचे व्यापारी आहेत’, ‘निवडणूक आयोगाची नि:पक्षता संदिग्ध आहे’, ‘माझी लहान बहीण स्मृती इराणीने अमेठीबाबत वस्तुस्थितीची माहिती देणे सुरू केले तेव्हा दिग्गज पत्रकार गप्प झाले’, ‘चूक तुमची नाही हे तर बातम्यांचे व्यापारी आहेत’ ही मुक्ताफळे आहेत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची. मीडिया व निवडणूक आयोग या लोकशाहीच्या आधारस्तभांना मोदींनी या वक्तव्यांमध्ये कमी लेखले, त्यांवर चिखलफेक केली. भाषण व वितंडवाद या दोहोंमध्ये फरक आहे. मोदी अमेठीत काय-काय बोलले ते पाहा... ‘मी इथे कुणाला चांगले किंवा वाईट म्हणायला आलेलो नाही. अमेठीचा असा विकास करीन, की गुजरातच्या संस्था इथे शिकायला येतील’, ‘बंधू-भगिनींनो, गरीब आईच्या पोटी जन्म घेणे गुन्हा आहे काय?’, ‘अरे, अमेठी के लोगों को कम से कम एक शौचालय तो दे देते’, ‘४० वर्षांत तीन पिढ्या बरबाद झाल्या, त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली’, ‘म्हणते कशी, कोण ही स्मृती?’ ‘भारतमातेच्या सुपुत्राला हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला’. तर्कशास्त्रात दोन प्रकरच्या उणिवा सांगितल्या आहेत. एक औपचारिक आणि दुसरी अनौपचारिक. मोदींनी दोन्ही उणिवांचा आपल्या भाषणांमध्ये बेमालूम उपयोग केला. कोण म्हणतो अमेठीत काही झाले नाही? देशाच्या डझनापेक्षा अधिक प्रमुख संस्था आणि उद्योग केंद्र सरकारच्या पैशाने अमेठीत आली आहेत; पण मोदींनी शौचालयासाठी थयथयाट केला. कुणाची निंदा करण्यासाठी आपण आलेलो नाही, असे म्हणत मोदींनी तब्बल अर्धा तास सोनिया, राहुल, प्रियंका आणि स्व. राजीव गांधी यांची निंदानालस्ती केली. संस्था मोडायच्या आणि त्यांना इतके काळे फासायचे की, चेहराही ओळखू येणार नाही. सामाजिक न्यायासाठी ओरडणार्‍या पक्षांची कामाची ही पद्धत राहिली आहे. आपल्याकडे १९९०नंतर अशा प्रकारचे राजकारण सुरू झाले. काही तरी बेफाम बोलायचे, म्हणजे ऐकणार्‍यांनाही चेव येतो. शतकानुशतके चेंगरत आलेल्या लोकांना अशा भाषणांनी स्फुरण चढते. त्यांनाही वाटते, की आपले चांगले दिवस येणार. असे काही बोलण्यामध्ये कुठलाही धोका नसतो. तत्त्व, मूल्ये वगैरे भानगड नसते. कार्यकर्ते जमवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत नाहीत. लालू यादव यांची हीच शैली होती. शाळेच्या मुख्याध्यापकाला, जिल्हा पोलीसप्रमुखाला ते चारचौघांपुढे खडसवायचे. कार्यकर्त्यांसोबत बसले असताना लालुप्रसादांना हुक्की यायची. सार्‍यांसमोर ते मोठ्या साहेबाला आपला गुटका बनवायला सांगायचे. हा मोठा साहेब म्हणजे एकदम मुख्य सचिव स्तरावरचा अधिकारी; पण काय करणार! लालूजींनी म्हटले म्हणजे एकावेच लागे. साहेबाचा अपमान करून आमचा पुढारी आम्हाला सामाजिक न्याय मिळवून देतो आहे, असे दलित आणि मागास वर्गातील लोकांना वाटते. कारण, त्याने नेहमी साहेबाची दादागिरीच पाहिली असते. त्याला काही वेगळे दिसते तेव्हा तो विकासाची भूक विसरून जातो. आपल्या भागात रस्ते, शिक्षण संस्था यांची आधी गरज आहे, याचा त्याला विसर पडतो. तिकडे पुढार्‍याची सत्ता बिनधास्त चालू राहते... पण, नरेंद्र मोदींसारखा पुढारी दिवसातून चार-चार वेळा मीडियाला ‘बातम्यांचे व्यापारी’ म्हणतो, निवडणूक आयोगाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल शंका उपस्थित करतो तेव्हा भीती वाटते. मायावती किंवा लालू देशाचे पंतप्रधान नाहीत. देशाच्या जनभावनेच्या आकांक्षेचे कधी प्रतीकही राहिले नाहीत. निवडणूक पद्धतीमधील उणिवांचा फायदा उठवून ते सत्तेत येऊ पाहतात, हे सार्‍यांना ठाऊक आहे. दलित-मुस्लिम किंवा दलित-ब्राह्मण किंवा कुर्मी-उच्च जाती किंवा कुर्मी-मुस्लिम अशी मोट बांधून हे पुढारी २०-३० टक्के मते मिळवतात व सत्तेत बसतात. प्रत्येक निवडणुकीत हाच खेळ सुरू असतो. त्यामुळे त्यांचे ओरडणे समजू शकते; पण मोदींसारखा नेता मीडियाला व्यापारी म्हणतो, तेव्हा लालू आणि मोदी यांची राजकारण करण्याच्या पद्धत सारखीच आहे, असे वाटते. ‘मीडिया मोदींच्या मांडीवर बसला आहे,’ असे काँग्रेसपासून सारे राजकीय पक्ष आरोप करतात आणि इकडे मोदी मीडियाकडे बोट दाखवतात. हे तर मुलायमछाप राजकारण झाले. गेल्या दहा वर्षांत सत्तापक्षाने मीडियावर इतका घाणेरडा आरोप केला नसेल. मोदी असे का बोलतात? जमले तर उद्या ते पंतप्रधान होतील. त्या जागी बसणारा नेता सर्वसमावेशक असायला हवा. सूडभावनेने वागणारा नसावा. सारीच प्रसारमाध्यमे धुतल्या तांदळासारखी आहेत, असे मी म्हणणार नाही; पण मीडियाने काँग्रेसलाही झोडपले आहे. सत्ता पक्षाविरुद्ध आज जे वातावरण दिसते आहे, ती गुजरात मॉडेलची जादू नाही. मीडियाची मेहनत आहे. काँग्रेसने मीडियाला कधी ‘बातम्यांचे व्यापारी’ म्हटले नाही. मीडियावर वाट्टेल ते आरोप लागोत; पण मीडियाने मोदी किंवा राहुल किंवा इतर कुणाला सोडले, असे कुणी म्हणणार नाही. एखाद्याला कमीअधिक प्रसिद्धी देणे समजू शकते; पण एखाद्याचे अजिबात छापलेच नाही, असे झाले नाही. ते शक्यही नाही. तसे झाले तर वाचकच दुसर्‍या दिवशी त्या मीडियाला नापास करील. मोदी म्हणतात, ‘राहुलना प्रश्न विचारा.’ विचारले आहेत. मीडियाने मनमोहन सरकारलाही सोडले नाही. मोदींची आज जी राष्टÑीय प्रतिमा तयार झाली, त्याचे एक मोठे कारण मीडिया आहे. हे वास्तव असताना मीडियाला नावे ठेवणे हे दुसरे-तिसरे काही नसून शुद्ध मुजोरी आहे. मोदी सहसा पत्रकारांना भेटत नाहीत. अलीकडे त्यांनी मुलाखती देणे सुरू केले; पण अवघड प्रश्न विचारताच पत्रकारांबद्दल त्यांना वाटणारी घृणा बाहेर येते. ती त्यांना लपवता येत नाही. मोदी असे वातावरण का बनवत आहेत? भविष्यात मीडियावर अंकुश लावायचा त्यांचा इरादा आहे की काय? 

लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

Web Title: Modi's intent to curb media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.