सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !

By वसंत भोसले | Published: April 28, 2024 09:48 AM2024-04-28T09:48:02+5:302024-04-28T10:02:27+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: दक्षिण महाराष्ट्रातील काेल्हापूर, सातारा, सांगली तसेच साेलापूर जिल्ह्यांत काॅंग्रेसची भक्कम स्थिती हाेती. शरद पवार यांनी 1999 मध्ये या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा झालेल्या संघर्षातून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे वर्चस्व निर्माण झाले. मात्र, पवार यांच्या सुभेदारांनी एकमेकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याच्या नादात काॅंग्रेसचे नुकसान हाेण्याचे स्वप्न पाहत असताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचीच घसरगुंडी झाली. सांगलीतील काॅंग्रेसची जिरवाजिरव करण्याच्या अनेक प्रयत्नात राष्ट्रवादी काॅंग्रेस संपत गेली.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Sangli's 'Correct' program has led to the downfall of the Nationalist Congress in South Maharashtra! | सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !

सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !

- डाॅ. वसंत भोसले
संपादक, लोकमत कोल्हापूर

सांगली लाेकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा काॅंग्रेस पक्षाला निवडणूक न लढता हातावर हात ठेवून बसावे लागत आहे. त्याच्या मागे कटकारस्थानांचा भाग असल्याचे आराेप काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाेरदार करण्यात आले. त्या कटाचे बळी मात्र सांगली जिल्ह्यातील काॅंग्रेस पक्षाला देण्यात आले. या तीव्र प्रतिकार करण्याच्या राजकीय हिंमत दाखविण्यात काॅंग्रेसचे राज्य पातळीवरील नेते कमी पडले तसाच दाेष स्थानिक नेत्यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुखांनादेखील दिला पाहिजे. याउलट काेल्हापुरात काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सलग दाेन निवडणुकीत आपल्याला हवी तशी भूमिका घेत काॅंग्रेसचा दबदबा वाढविला. तीस वर्षे सातत्याने लढून शिवसेनेने मागच्याच निवडणुकीत यश संपादन केले असताना त्यांनाही नमते घेण्याचा डाव टाकला. शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीने सारेच पक्ष गारद झाले आणि त्या पक्षांना शाहू छत्रपतींना न्यू पॅलेसवर येऊन पाठिंबा जाहीर करावा लागला.

मागील निवडणुकीत सहा महिन्यांपासूनच तयारी करीत सतेज पाटील यांनी काॅंग्रेसची ताकद शिवसेनेच्या मागे उभी केली. त्या माेहिमेला ‘आमचं ठरलंय’ अशी टॅगलाईन दिली हाेती. काेणी काही म्हणाे, आमचं ठरलंय त्यात आता बदल नाही. यावर आघाडी धर्म पाळण्याचा काेणी सल्ला दिला नाही. काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार झाली नाही. पक्षविराेधी कारवाईचा मुद्दा उपस्थित झाला नाही. सांगलीच्या विद्यमान काॅंग्रेस नेतृत्वाचा अनुभव कमी पडला.

नाना पटाेले, बाळासाहेब थाेरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांना युवा नेते डाॅ. विश्वजित कदम यांनी ज्या पद्धतीने खणखणीत वाजवून सांगितले तशी भाषा वापरत निवडणूक लढणाऱ्यांनी आवाज काढायला हवा हाेता. केवळ अन् केवळ ‘वसंतदादा’ या ब्रॅण्डचा वापर आणखी किती दिवस करीत राहणार आहात? महाआघाडीच्या जागावाटपात सांगलीतून काॅंग्रेसला डावलणे म्हणजे बारामतीतून शरद पवार यांना वगळून राजकारण करण्यासारखेच आहे. अनेक माेठे नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये असतानाही काॅंग्रेस पक्षच सांगलीतून  लढत हाेता. काॅंग्रेसवरील प्रेमापाेटी ग्रामीण भागातून भरभरून मतांचे दान हाेत हाेते. तसेच कायम व्हावे, अशी अपेक्षा का करावी? ही चूक लक्षात
घेतली नसल्याने काॅंग्रेसचे प्राबल्य असूनसुद्धा चार ग्रामपंचायतींदेखील जिंकण्याची ताकद नसलेल्या शिवसेनेकडून जागा हिसकावून घेतली जाऊ शकते, यातच सारे काही आलं !

वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जे राजकारण घडत गेले त्यात कटकारस्थानाचा हा पहिला प्रयाेग नाही अन्यथा जनता दलाचे संभाजी पवार यांचा उदय झालाच नसता. लाेकसभेच्या निवडणुकीत मात्र तीनवेळा झटके देण्याचा प्रयत्न झाला. त्यातील पहिला प्रयत्न २००९ च्या लाेकसभा निवडणुकीत झाला हाेता. ताे यशस्वीपणे काॅंग्रेस पक्षाने उधळून लावला. तत्कालीन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना त्याचे श्रेय जाते. कारण शरद पवार यांच्या आशीर्वादानेच जयंत पाटील यांनी तत्कालीन कवठेमहांकाळचे काॅंग्रेसचे आमदार अजितराव घाेरपडे यांना बंडासाठी सहा महिने आधीच तयार करण्यात आले हाेते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सांगली जिल्हा बॅंकेच्या तसेच जिल्हा परिषदेच्या राजकारणात अजितराव घाेरपडे यांना मानाचे स्थान देण्यात आले हाेते. सर्व काही नाट्यसंहितेप्रमाणे घडत हाेते. घाेरपडे यांची बंडखाेरी हाेणार, त्यांना राष्ट्रवादीची अंतर्गत रसद मिळणार आणि तरीदेखील अटीतटीच्या लढतीत काॅंग्रेस कमी मताने विजयी हाेणार, याचा अंदाज हाेता.

नाट्यसंहितेप्रमाणे घडत गेले, पण सांगलीतील राहुल गांधी यांच्या सभेतील चर्चेने या कटकारस्थानाला सुरुंग लागला. सभा सुरू हाेण्यापूर्वीच राहुल गांधी यांनी काॅंग्रेस विराेधात काेण लढते आहे, याची माहिती घेतली अन् त्यांना धक्काच बसला. काॅंग्रेसचे विद्यमान आमदारच (अजितराव घाेरपडे) यांनी बंडखाेरी केल्याची माहिती घेऊन राहुल गांधी यांनी हा काय प्रकार आहे, असा सवाल विलासराव देशमुख यांना केला. त्याच दरम्यान काेल्हापुरात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे संभाजीराजे यांच्याविराेधात ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक यांनी बंडखाेरी केली हाेती. हातकणंगले मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी राष्ट्रवादी काॅंग्रेसविरुद्ध लढत हाेते. काेल्हापूर जिल्ह्यात काॅंग्रेस थेट काेठे लढतच नव्हती.

सांगलीच्या काॅंग्रेसविराेधातील राष्ट्रवादीचे डावपेच उधळून लावण्याचा इशारा विलासराव देशमुख यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांना दिला. सांगलीचे नाटक मागे घ्या, अन्यथा काेल्हापूर आणि हातकणंगलेचे राष्ट्रवादीचे दाेन्ही उमेदवार पाडले जातील असा फाेन काेताेलीची सभा करून काेल्हापुरातील हाॅटेलवर पाेहाेचलेल्या आर. आर. आबा यांना विलासरावांचा आला. राष्ट्रवादीत कारभारीच जास्त झालेत. सांगलीच्या कटकारस्थानाची माेठी किंमत माेजावी लागणार याची स्पष्ट जाणीव आर. आर. आबा यांना झाली. शरद पवार यांच्याशी बाेलून घेतले आणि आपला दुसऱ्या दिवसाचा दाैरा सांगलीकडे वळविला. जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव, आटपाडीत पाच-सहा सभा आबांनी लावून काॅंग्रेसच्या प्रतीक पाटील यांना राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाही दिली. मात्र, विलासराव देशमुख यांना सांगलीत काॅंग्रेस विजय हाेणार याचा अंदाज आला हाेता. तरीदेखील देशमुख यांनी गुप्त आदेश देऊन राजू शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिक यांना मदत करण्याचे ठरले. मतदानाला चार दिवसच राहिले हाेते.
निकाल जाहीर झाले. सांगलीत काॅंग्रेसचा विजय झाला. राष्ट्रवादीच्या कारस्थानाचा पराभव झाला. शिवाय मंडलिक आणि राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा पराभव केला. तेव्हा निकाल साजरा करताना सांगलीच्या राजवाडा चाैकात एक फलक झळकला, ‘एका तिकिटात, दाेन खेळ’, त्या फलकावर सदाशिवराव मंडलिक आणि राजू शेट्टी यांची छायाचित्रे लावली हाेती. राष्ट्रवादी काॅंग्रेसला माेठा झटका बसला हाेता. सांगलीच्या कटकारस्थानाचा ताे परिणाम हाेता. राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना झाली (१९९९) तेव्हा काॅंग्रेस विराेधात लढून राष्ट्रवादीने काेल्हापूर आणि इचलकरंजीच्या दाेन्ही जागा जिंकल्या हाेत्या. राष्ट्रवादीच्या दक्षिण महाराष्ट्रातील दबदब्याची हवा तेव्हापासून कमी हाेऊ लागली. आता तर काेल्हापूर, हातकणंगले आणि सांगलीतून राष्ट्रवादी काॅंग्रेस हद्दपार झाली आहे.

सांगली आणि काेल्हापूरच्या राजकारणाचे उलटसुलट परिणाम वारंवार हाेत आहे. काेल्हापूरची जागा शाहू महाराज यांच्यासाठी महाआघाडीने साेडायची आणि पक्षाची निवड त्यांनीच करावी, असाही सन्मानजनक निर्णय घेण्यात आला. काॅंग्रेसची निवड त्यांनी केली. कारण काेल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ ही माेहिम पुन्हा सतेज पाटील यांनी चालविण्याची तयारी आधीपासूनच केली हाेती. डाॅ. विश्वजित कदम यांनी प्रथमच फर्ड्या राजकीय नेत्यासारखे भाषण करीत या सर्व कटकारस्थानाचा पर्दाफाश केला. या साऱ्या लढाईत वसंतदादा पाटील यांचे नाव शीर्षस्थानी असले तरी त्यांच्या घराण्यातील उमेदवारास प्रथमच पक्षश्रेष्ठींनीदेखील नकारघंटा दिली. आता सारे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस या तिन्ही मतदारसंघात लढत नसल्याने आणि काॅंग्रेस केवळ काेल्हापुरातच लढत असल्याने ‘एका तिकिटात, दाेन खेळ’ हा प्रयाेग काही हाेणार नाही. विशाल पाटील यांची लढत भाजपचे संजयकाका पाटील यांच्याशी हाेईल. काॅंग्रेसला मात्र बाद करून सांगलीची जागा शिवसेनेला देण्याच्या कटात बाजी मारण्यात आली आहे, पण शिवसेना मुख्य लढतीत येण्याची शक्यता खूपच कमी आहे. सांगलीच्या काॅंग्रेसला अडचणीत आणण्यात खेळली गेलेली ही तिसरी खेळी आता तरी यशस्वी झाली आहे. विश्वजित कदम यांनी याचा वचपा काढण्याचा निर्णय आणि विशाल पाटील यांचा बंडाचा निर्णय कायम असणे, या दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देतील.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Sangli's 'Correct' program has led to the downfall of the Nationalist Congress in South Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.