कार्यकर्त्यांनी लढावे कसे?

By admin | Published: June 20, 2017 12:36 AM2017-06-20T00:36:07+5:302017-06-20T00:36:07+5:30

२०१$४ च्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विस्कळीत झालेला काँग्रेस पक्ष देशपातळीवर अजूनही सावरलेला नाही आणि नागपुरात या पक्षातील अनागोंदी तशीच कायम आहे

How do the fighters fight? | कार्यकर्त्यांनी लढावे कसे?

कार्यकर्त्यांनी लढावे कसे?

Next

२०१$४ च्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विस्कळीत झालेला काँग्रेस पक्ष देशपातळीवर अजूनही सावरलेला नाही आणि नागपुरात या पक्षातील अनागोंदी तशीच कायम आहे. स्थानिक नेत्यांना पक्षाशी घेणे-देणे नाही आणि कार्यकर्ते हतबल आहेत. आणीबाणीतही या पक्षाची एवढी गलितगात्र अवस्था झाली नव्हती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कार्यकर्त्यांमध्ये अधूनमधून जोश भरतात व कार्यकर्ते ऐन भरात आले की ते विपश्यनेला जातात किंवा आजीकडे इटलीला जातात. ज्यांच्याकडे देश व राज्यस्तरावरील संघटनेची धुरा आहे ती नेतेमंडळी आता व्यवहारकुशल झाली आहेत. दीर्घकालीन सत्तेत कमावलेली संपत्ती टिकवून ठेवण्यातच त्यांना स्वारस्य आहे. मागील तीन वर्षांत राज्यात झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आपल्या खिशातील पैसा जाईल, या भीतीने हे नेते हातावर हात ठेवून बसून राहिले.
संघाची राजधानी असलेल्या नागपुरात तर काँग्रेसमध्ये निर्माण झालेली मरगळ सामान्य कार्यकर्त्यांना उद्विग्न करणारी आहे. नागपूर मनपाच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सुरू असलेले भांडण अखेर न्यायालयात पोहोचले. हे जसे पक्षनेतृत्वाचे अपयश आहे तसेच राज्यस्तरावरील नेत्यांना स्थानिक नेते जुमानत नसल्याचे ते निदर्शकही आहे. हा वाद विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद या ज्येष्ठ नेत्यांमधील भांडणांमुळे चिघळला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे हेही नागपूरचे. पण, आपली पक्षांतर्गत ‘अजातशत्रू’ प्रतिमा कायम ठेवण्यासाठी पांडेंनीही या वादाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण त्याही पातळीवर पक्षात सामसूम आहे. या पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम तसा १५ मेपासून सुरू झाला असला तरी हवी तशी तयारी दिसत नाही. २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गडकरी-फडणवीस कामाला लागले आहेत. भाजपा कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. काँग्रेस नेते मात्र आपसात भिडले आहेत. हे झाले काँग्रेस नेत्यांच्या पराभूत मानसिकतेचे उदाहरण. आता या नेत्यांच्या आपमतलबी आणि लबाड क्लृप्तीचे दुसरे उदाहरण बघू. यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत केवळ तीन संचालक असूनही भाजपाचे अमन गावंडे बँकेचे अध्यक्ष झाले. बँकेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर येईल, या भीतीने काँग्रेस-राकाँच्या संचालकांनी सरकारचे संरक्षण मिळविण्यासाठी भाजपाला खुर्चीवर बसवले. काँग्रेस-राकाँच्या अधिकृत उमेदवाराला या संचालकांनी पराभूत करून केवळ वैयक्तिक हित साधले. मतलबी वृत्तीचे हे लोण केवळ यवतमाळ-नागपुरातच आहे असे नाही. ते सर्वव्यापी आहे.
२०१४ चा पराभव काँग्रेससाठी नवा नाही. यापेक्षाही या पक्षाची हलाखीची अवस्था १९७७ मध्ये झाली होती. पण, पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी इंदिरा गांधींसारखे समर्थ नेतृत्व होते. आज ती उणीव जाणवत आहे. आजारपणामुळे सोनिया गांधींना पूर्वीसारखी धावपळ शक्य नाही. राहुल गांधी परिश्रम घेतात. पण खूप अभ्यास करूनही ऐन परीक्षेच्या वेळी घरच्यांचा भ्रमनिरास करणाऱ्या कष्टाळू मुलासारखी त्यांची अवस्था आहे. पक्षातील ज्येष्ठ मंडळी त्यांना निर्णय घेऊ देत नाही. नेत्यांच्या मुलांव्यतिरिक्त इतरांना आपले भवितव्य फारसे आश्वासक वाटत नाही. समाजातील विविध घटकांतील कार्यकर्त्यांना हेरून त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करण्याची प्रक्रियाच आज या पक्षात संपलेली आहे. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान होते. आज सत्तेवर असलेली माणसे त्यावेळी कुठेच नव्हती. पण आज त्यांची छाती ५६ इंचाची आणि काँग्रेसची अवस्था अस्थिपंजर झालेली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि हत्यांनी देश अस्वस्थ असताना, कधी नव्हे ती मोदी सरकारची कोंडी झाली असताना राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना असे वाऱ्यावर सोडून आजीला भेटायला इटलीला जाणे गरजेचे होते का? चार दिवसानंतर गेले असते तर काही बिघडले असते का? ही सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आहे. पक्ष संकटात असताना काँग्रेस नेतृत्वाने कशाला प्राधान्य द्यावे? याबद्दलचा सल्ला मोदी किंवा अमित शाह देणार नाहीत. इटलीच्या ‘आजीबाईच्या बटव्यातूनही’ तो मिळणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या प्रामाणिक भावनेला अधिक महत्त्व आहे.
- गजानन जानभोर

Web Title: How do the fighters fight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.