दुखऱ्या हृदयात अंधारेंचा प्रकाश

By admin | Published: April 27, 2017 11:22 PM2017-04-27T23:22:19+5:302017-04-27T23:22:19+5:30

दुखरं हृदय माणसाचं जीवन विस्कळीत करून टाकतं. त्या जीवनाची घडी बसविण्याचे व दुखऱ्या हृदयात प्रकाश टाकण्याचं काम

Dark light in the dark heart | दुखऱ्या हृदयात अंधारेंचा प्रकाश

दुखऱ्या हृदयात अंधारेंचा प्रकाश

Next

दुखरं हृदय माणसाचं जीवन विस्कळीत करून टाकतं. त्या जीवनाची घडी बसविण्याचे व दुखऱ्या हृदयात प्रकाश टाकण्याचं काम
डॉ. विजय अंधारेंसारखी मंडळी करताहेत...
वैद्यकीय सेवा क्षेत्रात सुपरस्पेशालिटी ही काळाची गरज बनली आहे. उपचारपद्धतीत संशोधन आणि तंत्रज्ञानाने क्रांती घडविली असली तरी ग्रामीण भागात त्या क्रांतीचे परिणाम अपेक्षित गतीने पडताना दिसत नाहीत. तसे घडण्यासाठी सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर्सनी ग्रामीण भागात राहून आपल्या सेवेचे दालन खुले करण्याची गरज आहे. सेवाभाव आणि डॉक्टरी पेशाचे खरे कर्तव्य याची जाणीव असलेली मंडळीच हे काम करू शकतात. हृदयविकार आणि त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या शारीरिक समस्या आता फक्त शहरी भागापुरत्या राहिलेल्या नाहीत. रक्तदाब आणि हृदयविकार या विकाराने वयाच्याही भिंती उद्ध्वस्त करीत आपला विस्तार मोठ्या गतीने वाढविला आहे. या पार्श्वभूमीवर अ‍ॅन्जिओग्रॉफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे विषय सर्वसामान्य माणसांच्या परिचयाचे तरीही अनामिक भीतीचे बनलेले आहेत. त्याच भीतीला हद्दपार करण्याचा प्रयत्न सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील डॉ. विजय अंधारे हे हृदयरोगतज्ज्ञ करताना दिसत आहेत.
हृदयविकाराचे संकट एक तर आपल्यावर येऊ नये आणि आले तरी त्याला सामोरे जाण्याचे तंत्र आपण आणि आपल्या परिवाराने संपादन केले पाहिजे, हा विचार डॉ. अंधारे ‘शस्त्रक्रियेनंतरचे जीवन’ या विशेष कार्यक्रमाद्वारे समाजात पोहचविण्याचा प्रयत्न करताहेत. बायपाससारखी शस्त्रक्रिया झाली की, आपल्या जीवनातील आनंद गमावून बसणाऱ्यांची संख्या समाजात खूप मोठी आहे. तो आनंद न घाबरता सुदृढ राहून कसा मिळवायचा याचे तंत्र डॉ. अंधारे यांचा कार्यक्रम शिकवितो. त्या शिकविण्याला वैद्यकीय क्षेत्राच्या कर्तव्याचे आणि माणुसकीचे अधिष्ठान त्यांनी दिल्याने आज हा कार्यक्रम वैद्यकीय क्षेत्रातील एक चळवळ बनू पाहात आहे. हृदय शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च हा गोरगरिबांना परवडण्याच्या पलीकडचा असतो. त्यातून मार्ग काढण्याच्या मोहिमेतही डॉ. अंधारे स्वत: सहभागी होतात. प्रसंगी पदरमोडही करतात, परंतु रुग्णसेवेत बाधा येणार नाही याची काळजी घेतात. त्यांच्या या मनोभूमिकेमुळेच गेल्या सात वर्षांत त्यांनी २५०० हून अधिक हृदयशस्त्रक्रिया केल्या. त्या करीत असताना अगदी अडीच वर्षांपासून ते ७८ वर्षांपर्यंत वयाच्या रुग्णांना न्याय देण्यात त्यांना यश लाभले आहे. तब्बल ९८ टक्के ही त्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियांची सरासरी राहिली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सुपरस्पेशालिटीचा आधार हा तंत्रशुद्ध टीमवर्क हा असतो. ते निर्माण करणे हेच पहिले आव्हान असते. हे आव्हान पेलताना त्यांनी आपल्या टीमला प्रशिक्षण तर दिलेच दिले शिवाय सामाजिक बांधीलकीची ऊर्जाही विकसित केली.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका शिक्षकाच्या घरात जन्मलेल्या विजय श्रीधर अंधारे यांचे शिक्षण तिथल्या महात्मा फुले विद्यामंदिर, महाराष्ट्र विद्यालय येथे झाले. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्थेतील दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत येण्याचा पहिला मान त्यांनी पटकाविला. प्रथमदर्शनी ‘गबाळा’ वाटणारा हा विद्यार्थी पुढे सोलापूरच्या वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात १९९७ साली ‘मिस्टर टॅलेंट’ ठरला. कवी मनाच्या या सर्जनला पुण्याच्या डॉ. शशांक शहांसारख्यांचे मार्गदर्शन लाभले. बेंगळुरुच्या जयदेव हॉस्पिटल येथे वयाच्या २९व्या वर्षी त्यांनी सुपरस्पेशालिटी संपादन केली. उलटे हृदय असणाऱ्या रुग्णांपासून ते बायपासपर्यंत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या.
शस्त्रक्रिया यशस्वी तर झाली पाहिजेच; पण त्याला जोडून रुग्ण आणि त्याचा परिवार यांनादेखील शस्त्रक्रियेनंतरचे आनंदी जीवन याविषयी प्रशिक्षण दिले पाहिजे यासाठी त्यांनी समुपदेशनावर विशेष काम केले. सुपरस्पेशालिटीला लोकशिक्षणाची जोड दिल्यास रुग्ण आणि त्यांचे कुटुंब आनंदी बनू शकतात हे त्यांनी कृतीने सिद्ध केले. रुग्ण व नातेवाईक यांचे २० जणांचे गट करून आजवर त्यांनी २३० छोटे-मोठे मेळावे घेण्याचे काम केले. आता या मेळाव्यांना हजारांच्या वर रुग्ण, नातेवाईक फक्त हजरच राहात नाहीत तर आनंदाने गात बागडताना दिसतात. डॉ. अंधारे यांच्या या चळवळीने रुग्णांच्याच नव्हे तर त्यांच्या नातेवाइकांच्याही दुखऱ्या हृदयात आनंदाचा प्रकाश पाडण्याचे काम केले आहे.
- राजा माने

Web Title: Dark light in the dark heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.