स्वामी स्मरणानंद यांच्या अनंत प्रस्थानाचा शोक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 09:18 AM2024-03-29T09:18:44+5:302024-03-29T09:19:08+5:30

स्वामीजींनी आपले संपूर्ण आयुष्य, आचार्य रामकृष्ण परमहंस, माता शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या प्रसारासाठी समर्पित केले होते!

Condolences on the eternal departure of Swami Smaranananda | स्वामी स्मरणानंद यांच्या अनंत प्रस्थानाचा शोक

स्वामी स्मरणानंद यांच्या अनंत प्रस्थानाचा शोक

-  नरेंद्र मोदी
(पंतप्रधान)

लोकसभा निवडणुकीच्या या महापर्वात एक अशी बातमी कानी आली, ज्यामुळे मन आणि विचार काही क्षणांसाठी सुन्न झाले. भारताच्या आध्यात्मिक श्रद्धेचे एक प्रखर व्यक्तिमत्त्व श्रीमत स्वामी स्मरणानंदजी महाराज यांचे समाधिस्थ होणे, ही माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक घटना आहे. स्वामी आत्मास्थानंदजी यांचे महाप्रयाण आणि आता स्वामी स्मरणानंद यांचा अनंताचा प्रवास ही घटना कित्येकांना शोकसागरात बुडवणारी आहे. मी देखील त्यांचे कोट्यवधी भक्त, संतजन आणि रामकृष्ण मठ आणि मिशनच्या अनुयायांइतकाच दुःखी झालो आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला माझ्या बंगालच्या दौऱ्यावेळी मी रुग्णालयात जाऊन स्वामी स्मरणानंद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य, आचार्य रामकृष्ण परमहंस, माता शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी समर्पित केले होते. हा लेख लिहिताना माझ्या मनात, त्यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याशी केलेली चर्चा आणि त्या अनेक स्मृती जिवंत होत आहेत.

जानेवारी २०२० मध्ये मी बेलूर मठात स्वामी विवेकानंद यांच्या कक्षात बसून ध्यानधारणा केली होती. त्या दौऱ्याच्या वेळी मी स्वामी स्मरणानंद यांच्याशी स्वामी आत्मास्थानंदजी यांच्याबद्दल खूप वेळ बोललो होतो. रामकृष्ण मिशन आणि बेलूर मठ यांच्याशी माझे  जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गेल्या पाच दशकांच्या कालखंडात मी अनेक संतमहात्म्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि विविध ठिकाणी वास्तव्यदेखील केले आहे. रामकृष्ण मठातदेखील अध्यात्मासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या अनेक संतांचा परिचय झाला, ज्यामध्ये स्वामी आत्मास्थानंदजी आणि स्वामी स्मरणानंदजी यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. त्यांचे पवित्र विचार आणि ज्ञानाने मला नेहमीच एक समाधान लाभले आहे. 

स्वामी आत्मास्थानंदजी आणि स्वामी स्मरणानंदजी यांचे आयुष्य, रामकृष्ण मिशनच्या ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धितायच’  या तत्त्वाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. शिक्षण प्रसार आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत रामकृष्ण मिशन करत असलेले कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. रामकृष्ण मिशन  भारताची आध्यात्मिक जाणीव, शिक्षणाचे सक्षमीकरण आणि मानवतेची सेवा या संकल्पानुसार कार्य करत आहे. बंगालमध्ये १९७८ मध्ये  पुराने थैमान घातले होते, तेव्हा रामकृष्ण मिशनने आपल्या निःस्वार्थ सेवेने सर्वांची मने जिंकली होती. २००१ मध्ये कच्छमध्ये मोठा भूकंप झाला, त्या वेळी मला सर्वात आधी दूरध्वनी करणाऱ्यांमध्ये स्वामी आत्मास्थानंदजी एक होते.  त्यांच्या निर्देशांप्रमाणे रामकृष्ण मिशनने भूकंपाच्या त्या संकटात लोकांची खूप मदत केली.

गेल्या काही वर्षांत, स्वामी आत्मास्थानंदजी आणि स्वामी स्मरणानंदजी यांनी विविध पदे भूषवताना सामाजिक सक्षमीकरणावर मोठा भर दिला. त्यांच्यासारखे संत आधुनिक शिक्षण, कौशल्य आणि महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत गंभीर असत.स्वामी आत्मास्थानंदजी यांच्या महान व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्याने मला सर्वाधिक प्रभावित केले. ते म्हणजे, प्रत्येक संस्कृती आणि प्रत्येक परंपरेबद्दल त्यांना असणारे प्रेम आणि आदर हे आहे. त्यांनी भारताच्या विविध भागांत बराच काळ व्यतीत केला आणि ते सतत प्रवास करत असत. गुजरातमध्ये राहून ते गुजराती बोलायला शिकले. माझ्याशीदेखील ते केवळ गुजरातीमध्येच बोलत असत. मला त्यांची गुजराती पण खूप आवडत असे.

भारताच्या विकासाच्या प्रवासात अनेक टप्प्यांवर, आपल्या मातृभूमीला स्वामी आत्मास्थानंदजी, स्वामी स्मरणानंदजी यांसारख्या अनेक साधुसंतांचा आशीर्वाद लाभला असून, याने आपल्याला सामाजिक परिवर्तनाची नवी चेतना दिली आहे. या संतांनी आपल्याला समाजहितासाठी एकत्र काम करण्याची दीक्षा दिली आहे. ही तत्त्वे शाश्वत आहेत आणि येणाऱ्या काळात हेच विचार विकसित भारताची आणि अमृतकाळाची  संकल्पशक्ती बनतील.संपूर्ण देशाच्या वतीने मी या महान संतांना श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण मिशनशी संबंधित सर्व लोक त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे वाटचाल करतील आणि हा मार्ग अधिक प्रशस्त करतील, असा मला विश्वास आहे.
ओम शांती!!

Web Title: Condolences on the eternal departure of Swami Smaranananda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.