देखण्या व्यक्तिमत्त्वाची अखेर

By admin | Published: April 27, 2017 11:24 PM2017-04-27T23:24:10+5:302017-04-27T23:24:10+5:30

हा काय योगायोग आहे बघा. गेली दोन महिने मृत्यूशी सामना करणारा हिंदी चित्रपट सृष्टीचा हा बेताज बादशाह विनोद खन्ना आज आपल्यातून निघून गेला.

The beauty of the beautiful personality | देखण्या व्यक्तिमत्त्वाची अखेर

देखण्या व्यक्तिमत्त्वाची अखेर

Next

हा काय योगायोग आहे बघा. गेली दोन महिने मृत्यूशी सामना करणारा हिंदी चित्रपट सृष्टीचा हा बेताज बादशाह विनोद खन्ना आज आपल्यातून निघून गेला. बरोबर याच दिवशी म्हणजे २७ एप्रिल २००९ साली फिरोज खान याने या जगाचा निरोप घेतला. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा चित्रपटाच्या सर्व भूमिका त्याने सर्व ताकदीने सादर केल्या. इतक्याच काय त्याचे संवाददेखील आज रसिकांच्या ओठांवर आहेत व राहतील. सुनील दत्त यांच्या ‘मन का मीत’ या चित्रपटाद्वारे खलनायकी दुनियेत त्याने प्रवेश केला खरा; परंतु नंतर नायक म्हणूनदेखील तो तेवढाच यशस्वी ठरला. धर्मेंद्रसारखा दमदार नायक समोर असताना विनोद खन्नाच्या मुखातून येणारे संवाद
विसरता येणे शक्य नाही. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सुनील दत्त यांच्या ‘रेश्मा और शेरा’ चित्रपटातील दुष्मन की चौकट के कुत्ते, अब आया उठ पहाड़ कर’ कसा विसरायचा.
पुनरागमनानंतर त्यांची मुुलाखत घ्यायची संधी मिळाली होती. तेव्हा त्यांना मी प्रश्न केला होता की, या क्षेत्रात येण्यापूर्वी चित्रपट सृष्टीतील काही चित्रपट तुम्हाला आवडले होते का? त्यावर त्यांचे उत्तर होते, होय. मला देवआनंद यांचा ‘सोलवा साल’ व दिलीप कुमार यांचा ‘मुगल-ए-आजम’ हे दोन चित्रपट खूप आवडले होते. नायक म्हणून आपले बस्तान येथे बसवणे अवघड आहे, हे लक्षात येताच त्यांनी खलनायक म्हणून भूमिका स्वीकारल्या. ‘मेरे अपने’ चित्रपटातील श्याम ही भूमिका शत्रुघ्न सिन्हा यांच्या समोर जिवंत उभी केली. ‘आन मिलो सजना’, ‘सच्चा-झुटा’, ‘प्रीतम’, ‘रखवाला’ या चित्रपटांतील खलनायक म्हणून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला.
एका साच्यात न राहता ‘अचानक’ या चित्रपटात मेजर रणजित खन्नाची अविस्मरणीय भूमिका त्यांनी केली, तर पुन्हा एकवार त्यांचा डाकू पाहायला मिळाला तो कबीर बेदीसमोर, ‘कच्चे धागे’ या चित्रपटात. ‘कच्चे धागे’मधील ठाकूर लखनसिंग ही भूमिका त्यांनी गाजवली. ‘इम्तिहान’मधील तनुजासमोर उभा राहिलेला हा प्राध्यापक प्रमोद शर्मा अप्रतिम होता.
मी या क्षेत्रात कोणाची बरोबरी करायला आलो नाही, असे त्यांनी अनेक वेळा सांगितले. अमिताभ बच्चन यांचा कार्यकाळ ‘जंजीर’पासून सुरू झाला. त्यानंतर विनोद खन्ना यांनी ‘हेरा-फेरी’, ‘खून पसिना’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘परवरीश’, ‘अमर-अकबर-अ‍ॅन्थोनी’ इत्यादी चित्रपटांत अमिताभ बच्चन यांच्या तोडीस तोड काम केले; परंतु कधीही आपली तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली नाही. प्रणय प्रसंग यशस्वी रंगवून नायिकेसमोर उभा राहणारा नायक त्यांना फार कमी सादर करायला मिळाला. त्यांच्याकडे अशा भूमिका फार कमी येत गेल्या; परंतु ज्या भूमिका आल्या त्या त्यांनी यशस्वी केल्या.
आपल्या कारकिर्दीत अगदी टॉपच्या जागेवर जाऊ पाहणाऱ्या व यशस्वी होत असलेल्या या नायकाच्या जीवनात काही काळात अज्ञातवासात जाण्याचे क्षण आले. कौटुंबिक मतभेदांमुळे १९८२च्या सुमारास त्यांनी पुणे येथील आचार्य रजनीश यांचे शिष्यत्व स्वीकारले; परंतु आचार्य रजनीश यांच्याकडे फार काळ ते राहिले नाहीत. पाच वर्षांनंतर त्यांनी परत फिल्मी दुनियेत प्रवेश केला. त्यावेळी ‘सत्यमेव जयते’, ‘महादेव’, ‘इन्साफ’ या चित्रपटांत त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. अलीकडच्या काळात ‘दबंग’, ‘वॉण्टेड’, ‘रेड अलर्ट’, ‘रिस्क’ व शाहरूख खानसोबत ‘दिलवाले’ या चित्रपटात तो पहायला मिळाला. दूरदर्शनवर ‘मेरे अपने’ या मालिकेत त्यांनी काशीनाथची भूमिका सादर केली होती. १९९७ साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत खासदार म्हणून दाखल झाले. २००२ साली त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. अलीकडे २०१४ मध्ये त्यांची परत लोकसभेवर निवड झाली होती.
आपला मुलगा या क्षेत्रात यावा म्हणून त्यांनी ‘हिमालयपुत्र’ या चित्रपटाची निर्मिती केली. अक्षय खन्ना व राहुल खन्ना यांनी चित्रपट सृष्टीत जम बसविण्याचा प्रयत्न केला; परंतु यश मिळाले नाही. त्यांचा आवाज ही त्यांची अभिनयाची ताकद होती. संवादफेक करताना त्यांची स्टाईल पाहण्याजोगी असायची. विनोद खन्ना यांना वैवाहिक जीवनात मतभेदांमुळे पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन कविता यांच्या सोबत १९८५ साली दुसरा विवाह करावा लागला; परंतु रूपेरी पडद्यावर अशा क्षणानंतरसुद्धा त्यांनी अभिनयात बाजी मारली होती. एक काळ असा होता की, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा त्यांचे मानधन जास्त होते. अनेक मान्यवर कलावंताला त्यांनी मागे टाकले होते; परंतु याचा जरादेखील त्यांना गर्व नव्हता. विनोद खन्ना यांच्या निधनाने अभिनयाच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक अभिनयसंपन्न, देखणा, कर्तबगार असा रूपेरी पडद्याचा नायक आपण गमावला आहे.
शेवटी मेरे अपने चित्रपटातील संवाद -
छेनू ऊर्फ शत्रुघ्न सिन्हाला सांगून गेला. ‘छेनू को कह देना श्याम चला गया.’ -अशोक उजळंबकर

Web Title: The beauty of the beautiful personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.