‘सोशल’ प्रेमात महिलेने गमावले ३१ लाख रुपये; महागड्या गिफ्टच्या बहाण्याने फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 07:33 AM2024-05-09T07:33:36+5:302024-05-09T07:33:45+5:30

पनवेल परिसरात राहणाऱ्या महिलेची फेसबुकवर एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या व्यक्तीने तो ब्रिटिश असून, भरपूर श्रीमंत परंतु एकटाच राहत असल्याचे सांगितले होते.

Woman loses Rs 31 lakh in 'social' love; Cheating on the pretext of an expensive gift | ‘सोशल’ प्रेमात महिलेने गमावले ३१ लाख रुपये; महागड्या गिफ्टच्या बहाण्याने फसवणूक

‘सोशल’ प्रेमात महिलेने गमावले ३१ लाख रुपये; महागड्या गिफ्टच्या बहाण्याने फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेल्या ओळखीतून महिलेची ३१ लाखांची फसवणूक झाली. ३३ कोटी किमतीचे विदेशी चलन व महागडे गिफ्ट मिळवण्याच्या प्रयत्नात या महिलेने ही रक्कम गमावली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल परिसरात राहणाऱ्या महिलेची फेसबुकवर एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या व्यक्तीने तो ब्रिटिश असून, भरपूर श्रीमंत परंतु एकटाच राहत असल्याचे सांगितले होते. यावेळी या महिलेच्या पतीचेदेखील चार महिन्यांपूर्वी निधन झाले असल्याने तिला तो भावनिक आधार देत होता. यातूनच त्याने महिलेवर प्रेम असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादित केला. त्यातून काही दिवसांपूर्वी त्याने महिलेला विदेशातून महागडे गिफ्ट व ३३ कोटी रुपये पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोनच दिवसांत महिलेला दिल्ली कस्टम तसेच इतर ठिकाणांवरून फोन येऊ लागले. त्यामध्ये महागडे गिफ्ट व पैसे मिळविण्यासाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागेल, असे सांगून पैसे उकळण्यात आले. मात्र, पैशांची मागणी अधिकच वाढू लागल्याने त्या ब्रिटिश व्यक्तीने आपण स्वतः येऊन स्वतः सर्व मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी या व्यक्तीनेदेखील आपण दिल्ली विमानतळावर आलो असून, अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असल्याने सोडविण्यासाठी १३ लाख ५० हजारांची मागणी केली. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने  एकूण ३० लाख ९६ हजार रुपये वेगवेगळ्या व्यक्तींना पाठवले. त्यानंतर संपर्क तुटल्याने आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. 

महिलेने तत्काळ पाेलिस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. 

Web Title: Woman loses Rs 31 lakh in 'social' love; Cheating on the pretext of an expensive gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.