राष्ट्रवादीची कामगिरी असमाधानकारक

By Admin | Published: June 15, 2017 11:35 PM2017-06-15T23:35:52+5:302017-06-15T23:41:21+5:30

नांदेड : स्थापनेची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कामगिरीबद्दल पक्षाचे नेते अजित पवार यांनी असमाधान व्यक्त केले

NCP's performance is unsatisfactory | राष्ट्रवादीची कामगिरी असमाधानकारक

राष्ट्रवादीची कामगिरी असमाधानकारक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : स्थापनेची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कामगिरीबद्दल पक्षाचे नेते अजित पवार यांनी असमाधान व्यक्त केले असून पक्ष वाढविण्याची जबाबदारी पेलवत नसेल तर पदे सोडा असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे़ पक्ष संघटन मजबूत असेल तर यश मिळतेच असेही त्यांनी सांगितले़
पक्ष संघटन वाढविण्याच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण व शहर विभागाचा विस्तृत आढावा घेतला़ महिला पदाधिकाऱ्यांच्या समस्याही या दौऱ्यात जाणून घेण्यात आल्या़ राष्ट्रवादीचे नेते पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी प्रारंभी जिल्हा कार्यकारिणीच्या कामाचा आढावा घेतला़ त्यानंतर तालुका आणि शहर विभागांचा विस्तृत आढावा घेताना प्रत्येक तालुकाध्यक्षांना पक्षविस्तारासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला़ त्यात कार्यकारिणी स्थापनेपासून तालुक्यात पक्षाची असलेली स्थिती त्यांनी जाणून घेतली़ यात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी आणखी जोमाने काम करण्याचा सल्ला दिला तर काम न करणाऱ्यांना पदे सोडून दुसऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचे सांगितले़ पक्ष वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडावे, केवळ पत्रिकांवर छापण्यासाठी पदे ठेवू नका असेही त्यांनी स्पष्ट केले़
या आढाव्यादरम्यान मुखेड तालुकाध्यक्षांनी पक्षातील मंडळीकडूनच काम करताना अडचणी निर्माण केल्या जात असल्याची तक्रार केली़ तर अर्धापूर तालुकाध्यक्षांनी काम करूनही पक्षाची, पदावरील मंडळीकडून हवी तशी साथ मिळत नसल्याचे सांगितले़ मुदखेड, नांदेड तालुकाध्यक्षांनी बैठकीला मारलेली दांडी पवार यांनी गंभीरतेने घेताना अशा लोकांना पदावर ठेवल्यास पक्ष वाढणारच नाही असे सांगितले़
नांदेड शहर कार्यकारिणीच्या आढाव्यातही पक्षाचे भीषण चित्र नेत्यांसमोर आले़ विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराला ६ टक्के मते मिळाली तर नांदेड दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ अर्धा टक्के मते मिळाली़ पक्षाचे उमेदवार हे १० व्या क्रमांकावर राहिले़ १ हजार मतेही आपला उमेदवार मिळवू शकला नाही, ही परिस्थिती असेल तर पदाधिकारी करतात काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना बहुतांश वार्डात पक्षाची शाखा नाही़ कार्यकारिणीच्या बैठका नाहीत इतकेच नव्हे तर मुंबईत होणाऱ्या बैठकांना शहराध्यक्षही येत नाहीत़ ही परिस्थिती बदला अशी तंबीही यावेळी देण्यात आली़
बैठकीस माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर, शहराध्यक्ष डॉ़ सुनील कदम, जि़ प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, रामनारायण काबरा, माजी आ़ शंकर धोंडगे, माजी आ़ हरिहरराव भोसीकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे, माजी जि़ प़ उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, फेरोज लाला, प्रांजली रावणगावकर, कृष्णा मंगनाळे, कल्पना डोंगळीकर, निर्मला कांबळे, माजी मनपा विरोधी पक्ष नेता जीवन पाटील घोगरे, रमेश सरोदे, एकनाथ वाघमारे, भारत काकडे, गणेश तादलापूरकर, जर्नेलसिंघ गाडीवाले यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी सदस्य आदींची उपस्थिती होती़

Web Title: NCP's performance is unsatisfactory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.