हेल्पलाईन १०९८/११२; कृती दलाने वर्षभरात रोखले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७५ बालविवाह

By विजय सरवदे | Published: May 9, 2024 04:51 PM2024-05-09T16:51:45+5:302024-05-09T16:52:04+5:30

शासकीय यंत्रणा सतर्क, अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्याची शक्यता

Helpline 1098/112; Action Force prevented 75 child marriages in Chhatrapati Sambhajinagar district during the year | हेल्पलाईन १०९८/११२; कृती दलाने वर्षभरात रोखले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७५ बालविवाह

हेल्पलाईन १०९८/११२; कृती दलाने वर्षभरात रोखले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७५ बालविवाह

छत्रपती संभाजीनगर : बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली असून वर्षभरात ७५ बालविवाह रोखण्यात कृती दलाला यश आले आहे. त्यातील तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, १० मे रोजी ‘अक्षय तृतीया’ असून हा मुहूर्त साधून बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा, तालुका व गावपातळीवरील शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. एन. चिमंद्रे यांनी कळविले आहे की, बालविवाह होत असल्याची किंवा तशी तयारी केली जात असल्याचा संशय आल्यास सजग नागरिकांनी यासंबंधीची माहिती शासनापर्यंत पोहोचवावी. संबंधितांचे नावाची गोपनीयता राखली जाईल. जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाकरीता जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कायद्याची जाणीव व्हावी, यासाठी तसेच बालवयात कोणताही बालक हक्कांपासून वंचित राहू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाही करण्याचे कामकाज सुरू आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षांच्या आत असताना विवाह केल्यास तो विवाह बालविवाह म्हणून गणला जातो. त्यासाठी १ लाख रुपये दंड व २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा किंवा दोन्ही, असे शिक्षेचे प्रावधान आहे.

ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी
गावपातळीवर ग्रामसेवक, तर नागरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या परिसरात वा गावात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास आपण संबंधितांकडे माहिती देऊ शकता.

हेल्पलाईन १०९८ किंवा ११२
जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असतील किंवा होऊ घातले असतील, तर नागरिकांनी चाईल्ड हेल्प लाईन १०९८ किंवा ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. बालविवाहाबाबतची माहिती जवळचे पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, बालकल्याण समिती, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयातही देता येईल.

Web Title: Helpline 1098/112; Action Force prevented 75 child marriages in Chhatrapati Sambhajinagar district during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.