एक खड्डा चुकवला, दुसऱ्यात गाडी अडकली अन् ट्रॅक्टरने तिघांना उडवले; मुलासमोर आईचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 12:49 PM2024-04-30T12:49:11+5:302024-04-30T12:51:27+5:30

अर्धवट रस्त्यावरील खड्ड्याचा बळी, ट्रॅक्टरच्या धडकेत ट्रीपलसीट दुचाकीस्वार कुटुंब कोसळले, चाकाखाली येऊन वृद्धेचा जागीच मृत्यू

bike gets stuck in pothole and three are blown away by a tractor; Death of mother in front of child | एक खड्डा चुकवला, दुसऱ्यात गाडी अडकली अन् ट्रॅक्टरने तिघांना उडवले; मुलासमोर आईचा मृत्यू

एक खड्डा चुकवला, दुसऱ्यात गाडी अडकली अन् ट्रॅक्टरने तिघांना उडवले; मुलासमोर आईचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : अर्धवट रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी वळवताच मागून सुसाट आलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत ट्रीपलसीट दुचाकीस्वार कुटुंब दूर फेकले गेले. यात दुचाकीच्या शेवटी बसलेल्या ७५ वर्षीय सुभद्रा सांडू काळे (वय ७५) यांचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. सोमवारी सकाळी १० वाजता हर्सूल जळगाव रोडवरील सोफा फॅक्टरीसमोर हा अपघात झाला. गेल्या ८ महिन्यांमध्ये या अर्धवट कामांमुळे सातत्याने अपघात होत असून कंत्राटदार, संबंधित विभाग मात्र त्याकडे डोळेझाक करत आहे.

सुभद्रा या कन्नड तालुक्यातील टाकळी अंतूर गावात पती, मुलगा, सून व नातवंडासह राहत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खराब असल्याने त्यांनी शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू केले होते. त्यासाठी त्या नियमित तपासणीसाठी मुलासह शहरात येत होत्या. सोमवारी त्या सकाळी डॉक्टरांची वेळ घेऊन मुलगा, सुनेसह दुचाकीवरून ट्रीपलसीट शहराच्या दिशेने येत होत्या. सकाळी १० वाजेच्या सुमारास हर्सूल परिसरातील फुलेनगर पाण्याच्या टाकीजवळ रस्ता काहीसा अर्धवट असून तेथे खड्डे पडले आहेत. सुभद्रा यांच्या मुलाने तो खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, दुसऱ्या खड्ड्यात दुचाकी अडकली व मागून सुसाट येत असलेला ट्रॅक्टर थेट दुचाकीवर येऊन धडकला. यात मागे असलेल्या सुभद्रा ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक गणेश केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सुभद्रा यांचा मृत्यू झाला होता. सुभद्रा यांचा मुलगा व सुनेला स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. शेती करून काळे कुटुंब उदरनिर्वाह चालवते. अपघाताची माहिती कळताच त्यांचे नातेवाईक, ग्रामस्थांनी घाटीत गर्दी केली होती.

खड्ड्याने जीव घेतला
हर्सूल जळगाव रोड नव्याने करण्यात आला. काही भाग सार्वजनिक बांधकाम विभाग, तर काही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे येतो; परंतु रस्त्याचा काही भाग कंत्राटदाराने अर्धवट सोडल्याने पोकळी निर्माण झाली आहे, तर रस्ता न झालेल्या ठिकाणी खड्डे झाल्याने सातत्याने वाहने अडकून अपघात होतात. सप्टेंबर महिन्यात मुख्तार रशिद शहा यांचा याच रस्त्यावरील खड्ड्याने जीव घेतला होता. मात्र, तरीही कंत्राटदार, संबंधित विभागाकडून आवश्यक उपाययोजना केली गेली नाही.

Web Title: bike gets stuck in pothole and three are blown away by a tractor; Death of mother in front of child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.