अंगाची होतेय लाहीलाही, तरीही सिग्नल सुरूच राही! पारा ४४ अंशापार

By परिमल डोहणे | Published: April 27, 2024 07:43 PM2024-04-27T19:43:22+5:302024-04-27T19:43:38+5:30

सद्य:स्थितीत चंद्रपुरात उन्हाचा कहर सुरू आहे. दिवसभर कडक ऊन असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

heat wave continues in Chandrapur, 44 degrees Celsius | अंगाची होतेय लाहीलाही, तरीही सिग्नल सुरूच राही! पारा ४४ अंशापार

अंगाची होतेय लाहीलाही, तरीही सिग्नल सुरूच राही! पारा ४४ अंशापार

चंद्रपूर : उन्हाच्या झळांपासून संरक्षण मिळावे, या अनुषंगाने बहुतांश मोठ्या शहरांत दुपारच्या सुमारास सिग्नल बंद ठेवले जातात. मागील काही वर्षांपूर्वी चंद्रपुरातसुद्धा दुपारी सिग्नल बंद केले जायचे. मात्र, यंदा एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असतानासुद्धा २४ तासही सिग्नल सुरूच दिसून येतात. एकीकडे उष्माघाताच्या बचावासाठी प्रशासनच नागरिकांना क्षणभरही उन्हात उभे राहू नका, असा सबुरीचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे भर दुपारी ४४ अंश तापमानात वाहनचालकांना सिग्नलवर उभे राहावे लागते. यामुळे केवळ एका मिनिटातच दुचाकीस्वार घामाघूम होऊन कासावीस होत असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर शहराचे तापमान देशात सर्वोच्च पातळीवर असते. त्यामुळे येथे उष्माघाताचा अधिक धोका असल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रशासन जनजागृतीची मोहीम राबवत असते.

सद्य:स्थितीत चंद्रपुरात उन्हाचा कहर सुरू आहे. दिवसभर कडक ऊन असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच अनेक नागरिकांना कामानिमित्त उन्हाच्या झळा सोसत बाहेरचा रस्ता धरावा लागतो. अशा उन्हात सिग्नलवर उभे राहिल्यावर एक मिनिटातच अंगातून घामाच्या धारा बाहेर पडायला सुरुवात होत आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यावर उपाय म्हणून मागील काही वर्षांपूर्वी भर दुपारी सिग्नल बंद केले जायचे. त्यामुळे वाहनचालक सरळ मार्गक्रमण करू शकत होते. परंतु, चंद्रपुरात ४४ अंश तापमानात सिग्नल सुरूच राहत असल्याने दुचाकीस्वारांना तप्त उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

अपघाताचा धोका असल्याने सिग्नल सुरूच

सिग्नल जर बंद केले तर वाहतुक विस्कळीत होऊन अपघाताचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा अद्यापतरी सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला नसल्याचे सांगितले. अपघाताचा धोका असतो, ही बाब जरी खरी असली तरी काही कामानिमित्त शहरात यायचे असल्यास जवळपास चार सिग्नल पडतात आणि या प्रत्येक सिग्नलवर प्रतीक्षा करायची वेळ आल्यास उष्माघाताचा धोकाही असू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बॉक्स

११ ते ५ या वेळेत सिग्नल बंद हवे
चंद्रपूर शहरात सकाळी ८ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे थोडेसे अंतर जरी कापतो म्हटले तर अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे सकाळी ११ ते ५ या वेळेत सिग्नल बंद ठेवावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

सोलापूर, नाशिकमध्ये शक्य, मग चंद्रपुरात का नाही?
दुपारच्या सुमारास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय सोलापूर, नाशिक यासह विविध मोठ्या शहरांत घेण्यात आला असल्याची माहिती आहे. मग हा नियम चंद्रपुरात का नाही, असाही प्रश्न चंद्रपूरकरांना पडला आहे.

Web Title: heat wave continues in Chandrapur, 44 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.