lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुवर्ण ठेव योजनेला थंडा प्रतिसाद, फक्त ४०० ग्रॅम सोने

सुवर्ण ठेव योजनेला थंडा प्रतिसाद, फक्त ४०० ग्रॅम सोने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून उद््घाटन केलेल्या सुवर्ण ठेव योजनेला अत्यंत थंड प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन आठवड्यांत

By admin | Published: November 20, 2015 01:57 AM2015-11-20T01:57:11+5:302015-11-20T10:04:58+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून उद््घाटन केलेल्या सुवर्ण ठेव योजनेला अत्यंत थंड प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन आठवड्यांत

Gold deposit scheme, only 400 grams of gold | सुवर्ण ठेव योजनेला थंडा प्रतिसाद, फक्त ४०० ग्रॅम सोने

सुवर्ण ठेव योजनेला थंडा प्रतिसाद, फक्त ४०० ग्रॅम सोने

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून उद््घाटन केलेल्या सुवर्ण ठेव योजनेला अत्यंत थंड प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन आठवड्यांत देशभरातून फक्त ४०० ग्रॅम सोने या योजनेखाली बँकांमध्ये जमा झाल्याची माहिती सर्राफा उद्योगाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने गुरुवारी दिली.
भारतीयांच्या घरांमध्ये व श्रीमंत देवस्थानांमध्ये दागिने व आभूषणांच्या स्वरूपात पडून असलेले सुमारे २२ हजार टन अनुत्पादक सोने अर्थव्यवस्थेत यावे या उद्देशाने सरकारने ही योजना सुरु केली आहे. खातेदारांनी बँकेत खाते उघडून त्यात पैशाऐवजी सोन्याची ठेव ठेवायची व बँकांनी त्यावर व्याज द्यायचे, अशी ही योजना आहे. ‘जेम अ‍ॅण्ड ज्वेलरी एक्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’च्या उत्तर क्षेत्राचे अध्यक्ष अनिल संखवाल यांनी गुरुवारी केंद्रीय वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही योजना जोमाने राबविण्यात येत असलेल्या अडचणींविषयी त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर संखवाल यांनी या जोनते आत्तापर्यंत फक्त ४०० ग्रॅम सोने जमा झाल्याची माहिती दिली.
या योजनेनुसार संभाव्य ठेवीदाराकडील सोन्याची मान्यताप्राप्त ‘अ‍ॅसेइंग सेंटर’कडून शुद्धता तपासून घ्यायची, त्यानुसार प्रमाणपत्र घ्यायचे, सोने वितळवायचे व प्रमाणपत्रात नमूद केलेल्या वजन व शुद्धतेनुसार बँकांनी त्या ग्राहकाचे सुवर्ण बचत खाते उघडायचे अशी व्यवस्था आहे.
यासाठी पुरेशा संख्येने शुद्धता तपासणी केंद्रे व सोने वितळविणाऱ्या प्रमाणित रिफायनरीज असणे गरजेचे आहे. संखवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासह इतर अडचणी सरकारपुढे मांडल्या. ब्युरो आॅफ इंडियन स्टॅन्डर्ड्सने सध्या या योजनेसाठी ३३ सोने शुद्धता प्रमाणीकरण केंद्रे व पाच रिफायनरीज प्रमाणित केल्या आहेत. वर्षअखेरपर्यंत या केंद्रांची संख्या ५५ व रिफायनरीजची संख्या २० पर्यंतवाढविली जाईल, असे वित्त मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

बँकांना हवी अधिक स्पष्टता
या योजनेच्या बाबतीत बँकांनाही अनेक मुद्द्यांवर अधिक स्पष्टता हवी आहे व रिझर्व्ह बँकेने रीतसर परिपत्रक काढून याचा खुलासा करावा, अशी बँकांची अपेक्षा असल्याचे एका बड्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सोन्याची शुद्धता तपासणी व शुद्धिकरण यासाठी येणाऱ्या खर्चाची कशा प्रकारे प्रतिपूर्ती केली जाईल व या खात्यांमधील सुवर्ण ठेवींवर ‘टीडीएस’ची आकारणी कशा प्रकारे करायची याविषयी बँकांना अधिक सुस्पष्टता हवी आहे.

सुवर्णरोखे मार्चपर्यंत
केंद्र सरकारची सार्वभौम हमी असलेले सुवर्णरोखे ही नव्याने जाहीर झालेली सोन्याशी संबंधित तिसरी योजना आहे. मार्चअखेर चालू वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी तीन-चार टप्प्यांत सुवर्णरोखे विक्रीस काढले जातील, अशी बँकांना अपेक्षा आहे.

सुवर्ण मुद्रेला
मागणी
याच वेळी पंतप्रधानांच्या हस्ते भारताच्या पहिल्या सुवर्ण मुद्रेचेही अनावरण करण्यात आले होते. या सोन्याच्या नाण्यावर एका बाजूला भारताची राजमुद्रा असलेले अशोकचक्र व दुसऱ्या बाजूला म. गांधींची छबी आहे. गेल्या दोन आठवड्यांत सुमारे ६२०० सुवर्णमुद्रा विकल्या गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Gold deposit scheme, only 400 grams of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.