अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी

By निलेश जोशी | Published: October 26, 2023 07:16 PM2023-10-26T19:16:17+5:302023-10-26T19:24:17+5:30

अग्निवीर ही योजना देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. काँग्रेसने प्रारंभापासून या योजनेला विरोध केला आहे.

Agniveer scheme is dangerous for the country, there should be no distinction between regular soldiers and firemen says rohit Chaudhary |  अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी

 अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी

बुलढाणा : अग्निवीर ही योजना देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. काँग्रेसने प्रारंभापासून या योजनेला विरोध केला आहे. आता अग्निवीर वीरगतीला प्राप्त होत असल्याने या योजनेतील कच्चे दुवे स्पष्ट होत आहे. सोबतच भारतीय सैन्यदलात यामुळे उभी फूट पडू शकते, अशी टीका काँग्रेसच्या माजी सैनिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल रोहित चौधरी यांनी २६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे केले. देशातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिला अग्निवीर अक्षय गवते सियाचीनमध्ये वीरगतीला प्राप्त झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते २६ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव सराई येथे आले होते. 

त्यानंतर बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन योजनेतील फोलपणा, कच्चे दुवे व देश सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेच्या माध्यमातून केंद्रातील सरकारवर टीका करताना भारतीय सैन्यात नियमित सैनिक व अल्पकाळ सेवा करणारे अग्निवीर अशी फूट पाडली गेली आहे. काँग्रेस खा. राहुल गांधी यांनी हा धोका आधीच अेाळखत या योजनेला प्रखर विरोध केला आहे. दरम्यान नियमित सैनिक व अग्निवीर यांना मिळणारे वेतन, आर्थिक लाभ, सेवा काळ, यात मोठी तफावत आहे. अग्निवीराला पेन्शन, कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा नाहीत. तारुण्यातच ते निवृत्त होतील. त्यातच माजी सैनिकांचा दर्जा नसल्याने सैन्याकडून मिळणारे अनेक लाभही त्यांना मिळणार नाहीत. शहीद अग्निवीर अक्षय गवतेंमुळे आता अनेक बाबी समोर येत असल्याचे चौधरी म्हणाले.

दरम्यान सैनिकाला दीर्घ प्रशिक्षण गरजेचे आहे. ऑल वेदरमध्ये कार्यरत राहण्यासाठी सैनिकाला किमान सहा वर्षे लागतात. येथे अवघ्या सहा महिन्यांत अग्निवीराला संवेदनशील ठिकाणी तैनात केल्या जात आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील, असे ते म्हणाले. पंजाबमधील शहीद अग्निवीराला मानवंदना सारखा सन्मानसुद्धा मिळाला नाही. यामुळे येत्या पाच वर्षांत भारताची सैनिक संख्या घटून दहा लाखांच्या आसपास येईल. त्यातही अग्निवीरांची संख्या अधिक असेल असे ते म्हणाले. त्यामुळे ही योजना बंद करण्याची मागणीच त्यांनी केली.---
अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटंबाला एक कोटी रुपये द्यावेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद अक्षय गवतेच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत जाहीर करणे ही लज्जास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया चौधरींनी दिली. सोबतच ही योजना कायम ठेवायची असेल तर नियमित सैनिक व अग्निवीर यामधील भेद दूर करून ते समान पातळीवर आणावेत. केंद्र व राज्याचेही सैनिकाप्रती दायित्व आहे. शहिदाला १ कोटीची मदत, घरातील एकाला शासकीय नोकरी, १० एकर शेती देण्याची मागणी चौधरी यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, समन्वयक संदेश सिंगलकर, आ. धीरज लिंगाडे, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, विजय अंभोरे उपस्थित होते.

Web Title: Agniveer scheme is dangerous for the country, there should be no distinction between regular soldiers and firemen says rohit Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.