तेंदूपत्ता संकलनासाठी गेला, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: May 4, 2024 05:08 PM2024-05-04T17:08:47+5:302024-05-04T17:11:11+5:30

Bhandara : तेंदूपत्ता आणण्यासाठी जंगलालगत गेलेल्या इसमावर अस्वलीने केला हल्ला

Farmer went for collect Tendupatta got injured in a bear attack | तेंदूपत्ता संकलनासाठी गेला, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला

Farmer went to collect Tendupatta got injured in a bear attack

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलालगत गेलेल्या इसमावर अस्वलीने हल्ला चढवुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना ४ मे रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मुर्झा येथे घडली आहे. रमेश हगरू आंबेडारे (५७, मुर्झा) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यात तेंदुपत्ता संकलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घटनेच्या दिवशी घटनेतील जखमी रमेश आपल्या पत्नीसह गावालगतच्या जंगल शिवारालगत तेंदुपत्ता संकलनासाठी गेला होता. जंगलात असलेल्या तेंदूच्या झाडाची पाने तोडत असतानाच अस्वलाने रमेशवर हल्ला चढविला. यात रमेशच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.

ही घटना रमेशच्या पत्नीसह परिसरात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या अन्य मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी रमेशकडे धाव घेत अस्वलाला घटनास्थळावरून हुसकावून लावले. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी असलेल्या रमेशला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रय ठाकरे यांनी जखमीवर उपचार केले. जखमी रमेशची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला होताच वनपरिक्षेत्राकारी रुपेश गावित व अन्य वन कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात भेट देत घटनेचा पंचनामा केला. जखमीला शासकीय मदत मिळवून देण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांनी आश्वासन दिले.

तेंदूपत्ता संकलन करताना दक्षता घेण्याचे आवाहन
तेंडूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांनी जंगलामध्ये सकाळच्या सुमारास तेंदूपत्ता तोडण्याकरिता जाऊ नये. जायचे असल्यास जंगलात जाताना एकटे जाण्याऐवजी समूहाने जावे. पहाटेच किंवा सकाळच्या सुमारास अन्य प्राणी जागृत झालेले असतात अशावेळी ते हल्लाही करू शकतात त्यामुळे मजुरांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन गटागटात किंवा समूहाने जावे असे आवाहन लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ता मानबिंदू दहिवले व वनरक्षक खंडागळे यांसह नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Farmer went for collect Tendupatta got injured in a bear attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.