जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा मुहूर्त करणार कोट्यवधीची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:36 PM2024-05-08T15:36:31+5:302024-05-08T15:37:10+5:30

Bhandara : सराफ व्यावसायिकांनी मागविली नवी आभूषणे; प्लॉटचे बुकिंग यंदा गाठणार उच्चांक

Akshaya Tritiya will generate crores of turnover in the district | जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा मुहूर्त करणार कोट्यवधीची उलाढाल

Akshaya Tritiya will generate crores of turnover in the district

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
धनत्रयोदशीप्रमाणेच अक्षय तृतीयेच्या सणालाही हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या शुभ दिवशी लोक सोने-चांदी, वाहन, जमीन किंवा घर खरेदी करण्यास प्राधान्य देतात. या वर्षी अक्षय तृतीया १० मे रोजी साजरी केली जाईल. मौल्यवान धातू किंवा रिअल इस्टेट, वाहन खरेदी करण्यासाठी या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसल्याने भंडारा जिल्ह्यातील बाजारपेठेत यंदा हा मुहूर्त खरेदी-विक्रीचा उच्चांक साधणार, असेच एकंदर दिसत आहे. 
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि तोंडावर असणारी लग्नसराई लक्षात घेता, या वर्षी सराफ बाजारात चांगलीच उलाढाल राहील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. या सोबतच रिअल इस्टेटवरही ग्राहकांनी आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील लेआउटची पाहणी करून आतापासूनच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर टोकण देण्यासाठी अनेकांनी जुळवाजुळव करून ठेवली आहे, तर वाहन खरेदीसाठी तरुणाई आपल्या आवडत्या वाहनांची चॉइस करण्यात गुंतल्याचे दिसत आहे. एकंदरीत अक्षय तृतियेचा मुहूर्त साधण्यासाठी व्यापारी आणि ग्राहकांनी तयारी केली आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य दिसत आहे.


दागिन्यांपेक्षा सोन्याच्या नाण्यांना मागणी अधिक
अक्षय तृतीयेचा मुहूर्त महत्त्वाचा असल्याने सोने खरेदीमध्ये दागिन्यांपेक्षा तुकडा किंवा क्चाइन खरेदीकडे येथील ग्राहकांचा कल अधिक असल्याचा सराफ व्यावसायिकांचा अनुभव आहे. हा ट्रेंड लक्षात घेता, व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर क्वाइन आणि आभूषणांची तयारी करून ठेवली
आहे. तोंडावर लग्नसराई असल्याने आभूषणे घेण्यासाठी अनेकजण हा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या
घडणावळाची आभूषणेही सराफांनी मागविली आहेत. भंडारा शहरात सुमारे १०० ते १,५००च्या जवळपास लहान मोठे सराफ व्यावसायिक आहेत, तर २०च्या जवळपास आभूषणांचे शो रूम आहेत. आपल्या खात्रीच्या सराफ व्यावसायिकाला ग्राहकांची पसंती अधिक असते. यंदा ७२ हजारांच्या जवळपास दर आहेत. गुंतवणूक म्हणून क्चाइन खरेदी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

अक्षय तृतीयेचा मुहूर्त लक्षात घेऊन आम्ही सराफांनी तयारी करून ठेवली आहे. ग्राहक आपल्या ऐपतीनुसार थोडीतरी का होईना, पण खरेदी करतातच, असा आजवरचा अनुभव आहे.
- प्रतिन फाये. सराफा व्यावसायिक.


फ्लॅटपेक्षा भंडारावासीयांची प्लॉट खरेदीकडे अधिक कल
भंडारा शहरात फ्लॅट संस्कृती अद्याप रुजलेली नाही, त्यामुळे प्लॅटपेक्षा प्लॉट खरेदीकडे नागरिकांचा कल अधिक आहे. भंडारा शहरात विशेषतः खात रोडवरील खरेदीला पहिली पसंती दिली जात असून दुसरी पसंती बेला रोडवरील लेआउटला दिली जात आहे. खात रोडवर ८०० ते १,२०० रुपये प्रति चौरस फूट दराचे फ्लॉट असून बेला रोडवर ४५० ते १,००० रुपये प्रति चौरस फूट दराचे प्लॉट आहेत. असे असले, तरी अधिक मागणी खात रोडवरील प्लॉटलाच अधिक आहे. बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या मते, यंदाच्या मुहूर्तावर २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडून चौकशी सुरू झाली असून अनेकांनी अक्षय तृतीयेला टोकण देऊन अनेकांनी सौंदा पक्का करण्याची तयारी केली आहे.


यंदाच्या एकंदर स्थितीवरून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर उलाढाल होण्याची शक्यता आहे. अनेकांनी खात रोडवर पसंती अधिक दर्शविली आहे.
- निरज वाडीभस्मे, व्यावसायिक.


वाहन खरेदीसाठी अॅसेसरीवर सूट
भंडारा शहरात चारचाकी वाहनांचे शो रूम नसले, तरी नागपुरातील जवळपास सर्व कंपन्यांच्या बॅचेस येथे आहेत, तर दुचाकीमध्ये जवळपास सर्वच कंपन्यांचे डिलर्स शहरात आहेत. तालुका स्तरावर सबडिलर्सही आहेत. अक्षय तृतीयेसाठी अनेक वाहन विक्रेत्यांनी अॅसेसरीवर सूट देऊ केली आहे. काहींनी अक्षय तृतीया ऑफरही ठेवली आहे. चारचाकी वाहनांमध्ये २०२३ मधील मॉडेलही आहेत. त्यावर भरघोस सूट देऊन ही वाहने विक्रीत वाढण्याची योजनाही काही विक्रेत्यांनी केली आहे. यंदाच्या मुहूर्तावर दुचाकी वाहनांची खरेदी अधिक होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तविली आहे.


वाढत्या मागणीचा ग्राफ ..
वाहनांच्या खरेदीमध्ये बुकिंगपेक्षा थेट खरेदीवरच ग्राहकांचा अधिक भर असतो. त्यामुळे पुरसा स्टॉक उपलब्ध करून ठेवण्याचा प्रयत्न डिलर्सचा असतो. यंदाचा मुहूर्त चांगला राहिल, असा अंदाज आहे.
- रोशन महाकाळकर, वाहन विक्रेता.

 

Web Title: Akshaya Tritiya will generate crores of turnover in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.