पाच टनाचा दगड पडला; अन् सारे संपले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 03:42 PM2024-05-06T15:42:30+5:302024-05-06T15:43:59+5:30

सेंट्रिंग लावताना दुर्दैवी घटना : दुसरा सुदैवाने बचावला, कुटुंबीयांना २१ लाखांची मदत

A stone of five tons fell; worker died | पाच टनाचा दगड पडला; अन् सारे संपले

Relatives of a worker who died, talking to police

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर / नाकाडोंगरी :
चिखला खाणीत शनिवारी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास सुमारे शंभर फूट खोल सुमारे पाच टन वजनाचा दगड अंगावर पडल्याने त्याखाली दबून चेतन हेमराज शिवणे (३५) या कंत्राटी कामगाराचा चेंदामेंदा झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या दुसरा कंत्राटी कामगार किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर सध्या भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे दोन्ही कामगार कंत्राटी होते. रविवारी चेतनच्या प्रेताचे तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कारापूर्वी नातेवाईक आणि नागरिकांनी चिखला खाण मुख्यालयावर धडक दिली. सुमारे चार तास हे आंदोलन सुरू होते. तोडगा निघाल्यावर वातावरण निवळले. त्यानंतर दुपारी चेतनच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

पाचव्या लेअरवर काम करीत होता चेतन
चेतन व त्याचा सहकारी हे शेवटच्या पाचव्या लेअरवर काम करीत होते, अशी माहिती पुढे आली आहे. तिसऱ्या लेअरवर अन्य कामगार कर्तव्य बजावित होते. पाचव्या लेअरवर अप्रशिक्षित कंत्राटी कामगारांना जीव धोक्यात घालून पाठविले जाते, असे या घटनेतून पुढे आले आहे.

कामगार दबावात
चिखला येथील भूमिगत मॅगनिज खाणीत यापूर्वीही अनेक अपघात घडले. मात्र कामगारांवर दबाव असल्याने त्याची वाच्यता करण्यास अनेकजण कचरत आहेत. मात्र या अपघातानंतर आता अनेकजण खासगीत बोलायला लागले आहेत. माहिती दिल्यास नोकरी गमावण्याची वेळ येते. त्यामुळे येथील कामगार दबावात आहेत.

५०० नागरिकांची खाण कार्यालयावर धडक
मृत कामगाराचे नातेवाइकांसह सुमारे ५०० नागरिकांनी चिखला खाण मुख्यालयात धडक देऊन कुटुंबीयाला आर्थिक मोबदला व पत्नीला नोकरीची
मागणी केली. त्यानंतर खाण प्रशासनाचे एजेंट यू, एस. भाटी यांनी मृताच्या कुटुंबाला २१ लाख रुपये, कंत्राटदाराकडून एक लाख रुपये तसेच खाण प्रशासनाच्या डीएव्ही शाळेत मासिक १५ हजाराची नोकरी, दीड हजार रुपयाची मासिक पेन्शन तसेच बारावीपर्यंत मुलामुलींच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत देण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी आमदार राजू कारेमोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव, जिल्हा परिषद सदस्य कृष्णकांत बघेल, चिखला सरपंच करुणा कोकोडे, उपसरपंच दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते.

कंत्राटदाराचा बोलबाला
या खाणींमध्ये वर्षानुवर्षे कंत्राटदार कार्यरत आहेत. कंत्राटदाराचे कामगार प्रशिक्षित नाहीत, अशीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे खाणीतील सुरक्षेबाबत सुरक्षबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कंत्राटी अप्रशिक्षित कामगारांनी कोणती कामे करावीत, याबाबत नियमावली आहे, परंतु त्याकडे नफ्यासाठी येथे दुर्लक्ष केले जाते.

कंत्राटी कामगारांना खाणीत उतरण्यास परवानगी आहे का?
चेतन शिवणे हा कंत्राटी कामगार असून हेल्पर होता. खाणीमध्ये तो काम करताना त्याचे सहकारी दगड ड्रिल केल्यानंतर लाकडी सेंट्रिग लावत होते, अशी माहिती पुढे आली आहे. ही जोखमीची कामे दोन किवा तीन कामगारच करतात, अशीही माहिती समोर आली आहे. या अपघाताबद्दल खाण प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत. कोणतेही प्रशिक्षण नसतानाही जोखमीच्या कामावर दीडशे फूट खोल कसे पाठविले, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

Web Title: A stone of five tons fell; worker died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.