Ram Navami 2024: राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांची जन्मतिथी आणि जन्मवेळदेखील रामजन्माचीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:39 PM2024-04-16T12:39:15+5:302024-04-16T12:39:48+5:30

Ram Navami 2024: प्रखर रामभक्तीमुळे समर्थांना श्रीरामाचीच जन्मतिथी व जन्मवेळ तर मिळालीच; शिवाय रामाचा दास ही बिरुदावलीदेखील मिळाली!

Ram Navami 2024: Rashtraguru Samarth Ramdas Swamy's birth date and birth time is also Ram Janma! | Ram Navami 2024: राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांची जन्मतिथी आणि जन्मवेळदेखील रामजन्माचीच!

Ram Navami 2024: राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांची जन्मतिथी आणि जन्मवेळदेखील रामजन्माचीच!

१७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे. श्रीरामाचा जन्मोत्सव आपण चैत्र शुद्ध नवमीला साजरा करतो. याच दिवशी त्यांच्या भक्ताचा अर्थात समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला. योगायोग म्हणजे श्रीरामांची जन्मवेळ तीच समर्थ रामदास स्वामींची जन्मवेळ! रामभक्तीचा वसा त्यांना जन्मतःच मिळाला असं म्हणायला हरकत नाही. घेऊया त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा. 

समर्थ रामदास यांचा जन्म सन १६०८ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात चैत्र शुक्ल नवमीला झाला. सूर्याजी पंत आणि राणूबाई यांचा मुलगा म्हणून जन्मलेल्या या महापुरुषाचे बालपणीचे नाव नारायण होते. असे म्हणतात की बाल हनुमानाप्रमाणेच ते बालपणी खूप खोडकर होते, पण एके दिवशी त्यांच्या आईच्या सूचक बोलण्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ते हनुमंताप्रमाणेच रामाचे महान भक्त बनले. वयाच्या १२ व्या वर्षी टाकळी नावाच्या ठिकाणी त्यांनी १२ वर्षे प्रभू श्री रामाची कठोर साधना केली आणि रामाचे दास झाले. तेव्हापासून त्यांना रामदास स्वामी अशी ओळख मिळाली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्रीरामांनी त्यांना दर्शन दिले. 

तपश्चर्या पूर्ण करून त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असा संपूर्ण देश प्रवास बारा वर्षे केला. भारतभेटीत त्यांनी हिंदूंची दुर्दशा आणि त्यांच्यावर मुघलांचे अत्याचार जवळून पाहिले. हिंदूंना संघटित केल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही हे त्यांना समजले. त्यामुळे मुघल राज्यकर्त्यांच्या अत्याचारातून मुक्ती मिळवून त्यांनी देशात स्वराज्याची स्थापना हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. तेव्हापासून ते स्वामी रामदासच नाही तर समर्थ रामदास बनले. 

देशातील तरुणांमध्ये स्वराज्याची जाणीव रुजवण्यासाठी त्यांनी देशभरात असंख्य मठ आणि आखाडे उभारले. त्यांनी तरुणांच्या हृदयात शूर, वीर आणि रामभक्त हनुमानाची मूर्ती बसवली आणि तरुणांना व्यायामाची प्रेरणा दिली, जेणेकरून ते निरोगी, तंदुरुस्त आणि परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचारांना तोंड देऊ शकतील. 'जय-जय श्री रघुवीर समर्थ' असा त्यांचा नारा होता. समर्थ गुरूंचा त्याग-तपश्चर्या जीवन-प्रवासातील अनुभवांचे सार त्यांच्या 'दासबोध' या मुख्य ग्रंथात संकलित केले आहे. 

सात दशकांच्या उद्दिष्टपूर्ण प्रवासानंतर त्यांनी आयुष्याच्या अखेरीस साताऱ्याजवळील सज्जनगड किल्ल्याला आपले निवासस्थान बनवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणाच्या वार्तेनंतर त्यांना अन्न पाणी गोड लागेनासे झाले. तमिळनाडूतील तंजावर येथे राहणाऱ्या अरणीकर नावाच्या कारागिराने राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती बनवून त्यांच्याकडे पाठवली. समर्थ रामदासांनी त्या रामपंचायतनाच्या समोर पाच दिवस निर्जल उपवास केल्यावर इ.स. १६८२ मध्ये पद्मासनात बसून रामनामाचा जप करत देह ठेवला. सज्जनगडावर आजही समर्थांच्या समाधीचे दर्शन घेता येते. त्यांनी सुरु करून दिलेले उपक्रम आणि रामदासी परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू आहे. त्यांनी लोकांना ताठ कण्याने, ताठ मानेने जगायला शिकवले आणि लोकांच्या मनात स्वधर्म, स्वराज्य आणि स्वदेशाभिमान जागृत केला. अशा समर्थांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि त्यानुसार कृती करणे हीच त्यांना शब्द सुमनांजली!

Web Title: Ram Navami 2024: Rashtraguru Samarth Ramdas Swamy's birth date and birth time is also Ram Janma!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.