मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 07:10 PM2024-05-05T19:10:42+5:302024-05-05T19:11:26+5:30

चालकाच्या मागील भागात 10 फुट गुप्त कप्पा, त्यात चंदनाची लाकडं.

Empty carat behind and sandalwood in front, 'Pushpa' style theft exposed, sandalwood worth 2 crore seized | मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त

मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त

मधुकर सिरसट/ केज: साउथच्या 'पुष्पा' चित्रपटात टेंपो, ट्रक आणि टँकरमधून लाल चंदनाची तस्करी दाखवण्यात आली आहे. अशाच प्रकारची घटना केज तालुक्यात घडली. येथून जालन्याला चंदनाचा गाभा घेऊन जाणारा आयशर टेंपो बीड गुन्हे शाखा आणि केज पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविवारी पहाटे केजजवळ पकडण्यात आला. यावेळी 1 हजार 235 किलो चंदनाच्या गाभ्यासह आयशर टेंपो, असा 2 कोटी 18 लाख 31 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड येथील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, चंदनाच्या झाडाचा गाभा घेऊन एक आयशर टेंपो केजकडून धारुरकडे जात आहे. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलिसांनी रविवारी (दि.5) पहाटे साडे चार ते सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान केज-धारुर महामार्गावर सापळा लावला. यावेळी आयशर टेंपो(क्र. एमएच 24 एयु 9383) थांबवून चालकाची चौकशी केली आसता, टेंपोमध्ये चंदनाच्या झाडाच्या गाभ्याने भरलेल्या 60 गोण्या आढळल्या. 

ही चंदनाचे लाकडं केज येथील बालासाहेब उर्फ बालाजी दत्तात्रय जाधव यांच्या सांगण्यावरुन जालना येथे घेऊन जात आसल्याचे चालकाने सांगितले. यानंतर तो टेंपो केज पोलीस ठाण्यात आणून 60 गोणी चंदनाचे वजन केले आसता त्यात 1 हजार 235 किलो लाकूड असल्याचे आढळले. बाजार भावानुसार याची किंमत 1 कोटी 97 लाख 68 हजार रुपये आहे. पोलियांनी चंदनासह 20 लाख 63 हजार रुपयांचा आयशर टेंपो, असा एकूण 2 कोटी 18 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांच्या फिर्यादीवरुन टेंपो चालक प्रीतम काशीनाथ साखरे(वय 34 वर्षे,रा गुरुवार पेठ,अंबाजोगाई), त्याच्या सोबत असणारा शंकर पंढरी राख(रा.कौडगाव) आणि ज्याच्या सांगण्यावरुन चंदनाचा गाभा जालना येथे घेऊन जात होते, ते मालक बालासाहेब उर्फ बालाजी दत्तात्रय जाधव(वय 42 वर्षे,रा. केज) या तीन आरोपींविरुद्ध केज पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

एलसीबी आणि केज पोलीसांची संयुक्त कारवाई....
ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे, सहाय्यक फौजदार जायभाये, खेडकर, पोलिस हवालदार निसार शेख, तुषार गायकवाड, भागवत शेलार, कैलास ठोंबरे, दीलीप गित्ते, मतीन शेख, शिवाजी कागदे, संतोष गित्ते, महादेव बहीरवाल व प्रकाश मुंडे यांनी केली.

पुष्पा स्टाईल टेंपोची रचना....
या आयशर टेंपोची रचना पुष्पा सिनेमातील टेंपोप्रमाणे करण्यात आली होती. चालकाच्या मागील भागात एक 10 फुट रिकामा कप्पा तयार करण्यात आला होता. त्यात चंदनाचा गाभा ठेवला जायचा, तर त्याच्या मागील भागात रिकामे कॅरेट ठेवले जायचे. पोलीसांच्या तपासणीत फक्त  रीकामे कॅरेट आसल्याचे भासवले जायचे. या टेंपोच्या रचनेचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या कारवाईत गुन्हा दाखल झालेल्या बालासाहेब उर्फ बालाजी दत्तात्रय जाधव याच्यावर यापूर्वी बर्दापुर आणि अंबाजोगाई पोलिसांत गुन्हे दाखल असून केज येथील हा तिसरा गुन्हा असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे.

Web Title: Empty carat behind and sandalwood in front, 'Pushpa' style theft exposed, sandalwood worth 2 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.