विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 01:24 PM2024-05-07T13:24:11+5:302024-05-07T13:25:21+5:30

Amravati : तत्कालीन प्रभारी कुलगुरू अडचणीत, डॉ. प्रशांत गावंडे यांची याचिका

Dispute over the chairmanship of the board of studies in the university is in the high court | विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च कोर्टात

Dispute over the chairmanship of the board of studies in the university is in the high court

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेला आहे. याप्रकरणी विद्यापीठाने सुनावणी घेऊन न्यायनिवाडा करावा, अन्यथा १० जून रोजी न्यायालय अंतिम निकाल देईल, असे स्पष्ट केले आहे. डॉ. प्रशांत गावंडे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सन २०२३ मध्ये १० सदस्य संख्या असलेल्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात अध्यक्षपदासाठी डॉ. दिनेश खेडकर आणि डॉ. प्रशांत गावंडे या दोघांनाही समान पाच मते पडली. त्यामुळे उपकुलसचिव विक्रांत मालवीय यांनी ईश्वरचिठीचा निर्णय घेतला. यावेळी ईश्वर चिठीतून डॉ. प्रशांत गावंडे यांचे नाव बाहेर आले. तेव्हा डॉ. दिनेश खेडकर आपसूकच बाद झाले असा समज झाला. मात्र, विद्यापीठ परिनियमानुसार ईश्वरचिठीतून ज्या व्यक्तीचे नाव येते ती व्यक्ती स्पर्धेतून बाद करावी लागते. मात्र, यावेळी डॉ. दिनेश खेडकर यांचे नावे चिठी निघाली नसताना डॉ. गावंडे यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले. ही बाब नंतर लक्षात आली असता दिनेश खेडकर समर्थकांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद यावले यांच्याकडे तक्रार केली.

त्यानंतर प्रशासनाने डॉ. गांवडे यांच्याऐवजी दिनेश खेडकर यांना अभ्यास मंडळाचे अध्यक्षपद बहाल केले. तथापि, यानिर्णयाविरुद्ध डॉ. प्रशांत गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ५८२८/२०२३ नुसार धाव घेतली. तत्कालीन
प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद यावले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांना प्रतिवादी केले आहे. दरम्यान, याप्रकरणी २ मे रोजी उच्च न्यायालयात तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना वारंवार नोटीस बजावूनसुद्धा ते गैरहजर राहत असल्याबाबत कोर्टाने ताशेरे ओढले. याप्रकरणी विद्यापीठाने योग्य ती कार्यवाही करून १३ मे रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेशित केले आहे. त्यामुळे १३ मे रोजी याविषयावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालय दोन आठवड्यात म्हणजे १० जून रोजी अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


कुलसचिवांच्या अडचणी वाढल्या
वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा डॉ. दिनेश खेडकर यांचे बाजूने निर्णय दिल्यास नुटा कुलसचिवांवर आक्षेप घेईल आणि डॉ. गावंडे यांना कौल दिला तर शिक्षण मंच जीव घेईल, अशा प्रकारे इकडे आड तिकडे विहीर, अशी कुलसचिवांची अवस्था झाली आहे. कुलगुरु नवीन असल्याने शिक्षक संघटनांच्या दबावात न येता कुलगुरूंनी सुनावणी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


विद्या परिषदेचे राजकारण कुणाच्या पथ्यावर?
डॉ. दिनेश खेडकर यांना विजयी घोषित केल्यास विद्या परिषदमधून व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य नामित करण्याचा मार्ग सुकर होईल व व्यवस्थापन परिषदेवर शिक्षण मंचाचे दोन सदस्य जातील. कारण अॅकेडेमीकमध्ये शिक्षण मंचचे प्राबल्य आहे. कुलसचिवांचा कालावधी १७ मे रोजी संपत असल्याने निवडणुकीतील वेळकाढूपणाचे हे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागू शकते

Web Title: Dispute over the chairmanship of the board of studies in the university is in the high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.