इतरांच्या संकेतस्थळावरील माहितीचे अनुकरण करणे हा गुन्हा ठरतो : काजल हुरीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 02:01 PM2020-07-07T14:01:48+5:302020-07-07T14:28:20+5:30

"ई लर्निंगः- ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" या अॉनलाईन `विद्यार्थी अध्ययन विकास कार्यक्रमात` देश - विदेशातील तब्बल २८१७८ विद्यार्थी सहभागी झाले होते

It is a crime to imitate information on other people's websites: Kajal Hurriya | इतरांच्या संकेतस्थळावरील माहितीचे अनुकरण करणे हा गुन्हा ठरतो : काजल हुरीया

इतरांच्या संकेतस्थळावरील माहितीचे अनुकरण करणे हा गुन्हा ठरतो : काजल हुरीया

Next
ठळक मुद्दे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा अभिनव आंतरराष्ट्रीय उपक्रम"ई लर्निंगः- ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" चा समारोपअॉनलाईन `विद्यार्थी अध्ययन विकास कार्यक्रमात` तब्बल २८१७८ विद्यार्थी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
 ठाणे : स्वतःचे अनुदिनी खाते, संकेतस्थळ कसे तयार करावे, याबाबत`मजकूर लेखन' या विषयावर  डिजिटल विपणन क्षेत्रातील अग्रगण्य `वॕटकन्सल्ट` कंपनीत खाते व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या काजल हुरीया यांनी मार्गदर्शन करताना आपल्या वैयक्तिक अनुदिनी किंवा संकेतस्थळावरील माहिती ही पूर्णतः स्वरचित असावी, इतर कुणाचेही अनुकरण करणे हा गुन्हा ठरतो, असे सांगितले. 
          सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे आणि मुंबई विद्यापिठाच्या वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर  विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय `ई-लर्निंग : ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडब्रँड` या विनामूल्य अॉनलाईन `विद्यार्थी अध्ययन विकास कार्यक्रमात` तब्बल २८१७८ विद्यार्थी  सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी ई-व्यवसायाच्या अनुषंगाने `मजकूर लेखन` आणि `डिजिटल विपणन` या विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्यानांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.       `मजकूर लेखन' या विषयावर  डिजिटल विपणन क्षेत्रातील अग्रगण्य `वॕटकन्सल्ट` कंपनीत खाते व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या काजल हुरीया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या व्याख्यानात त्यांनी उदाहरणादाखल डिजिटल क्षेत्राचा सकारात्मक वापर करून अल्पावधीतच, स्वःतमधील कौशल्यगुणांच्या साहाय्याने प्रभावी ठरलेल्या काही व्यक्तींची ओळख करून दिली. तसेच आपल्या क्षमता जाणून ई-व्यवसाय करू ईच्छिणाऱ्या नवोदितांसाठी यु-ट्युब, इन्स्टाग्राम, अनुदिनी यांसारखी अनेक नेटवर्कींग साइटस् प्रारंभीचे एक व्यासपीठ  म्हणून उपयुक्त ठरतात, असे त्या म्हणाल्या. यानंतर त्यांनी स्वतःचे यु-ट्युब चॕनल कसे तयार करावे, स्वतःमधील कौशल्यगुण ओळखून त्यावर आधारित, प्रभावी व इतरांना आकर्षित करून घेण्याची क्षमता असलेल्या मजकुराच्या साहाय्याने व्हिडीओ कसे तयार करावे, यु-ट्युब चॕनलच्या मदतीने पैसे कसे मिळवावेत व त्यासंबंधीचे निकष काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले. महाजालावर उपलब्ध कॕनवासारख्या अॕपच्या मदतीने आकर्षक व्हिडीओ तयार करता येतात, मोठ्या व्हिडीओंचा आकार लहान करण्यासाठी वंडरशेअर, कीपविड यांसारख्या  संकेतस्थळांचा वापर करावा अशी माहिती त्यांनी दिली. 
     दुसऱ्या सत्रात सायबर सुरक्षा, ॲडव्हान्स एक्सेल यांसारख्या अनेक विषयांसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून २३ वर्षांपासून `कार्पोरेट ट्रेनर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जास्मिन दावडा यांनी `डिजिटल विपणन` या विषयावर विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. कॕनवा.कॉम या संकेतस्थळाच्या साहाय्याने आपल्या व्यवसायाला गती देण्यासाठी प्रभावी व आकर्षक मजकूर कसा तयार करावा ते प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले,  तसेच आपले परिचयपत्र, वैयक्तिक संकेतस्थळ, लोगो यांसारख्या अनेक बाबी कॕनवा.कॉमच्या मदतीने सहज आकर्षक करता येतात याची माहिती त्यांनी दिली. त्याबरोबरच गुगल व पिक्साबे.कॉम, अनस्पाश.कॉम, फ्रीपीक.कॉम या संकेतस्थळांच्या मदतीने कॉपीराईट फ्री आणि विनामुल्य छायाचित्रे मिळवता येतात, याची माहिती दिली. रेंडरफॉरेस्ट.कॉम या संकेतस्थळाच्या मदतीने आकर्षक व्हिडिओ कसा तयार करावा, तसेच  कॕनवा.कॉम मधील फ्रेम्स, शेप्स, स्टीकर, चार्ट, बॕकग्राउंड इ अनेक बाबी प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने समजावून सांगितले. 

        निरोप समारंभाच्या या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले मुंबई विभागातील शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनोमुळे उद्भवलेल्या भिती आणि नैराश्याच्या या काळात फक्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपुरताच कार्यक्रम मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी हा विनामुल्य उपक्रम राबविल्याबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समिती, प्राचार्य, शिक्षकवर्गाचे कौतुक करून अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या सत्रानंतर निरोप समारंभाच्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मराठे यांनी संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान, खजिनदार सतीश शेठ, व्यवस्थापन  सदस्य मानसी प्रधान, यांच्या सकारात्मक पाठींब्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमास देशातील २६ राज्ये व ५  केंद्रशासित प्रदेशांतील आणि जगातील १५ राष्ट्रांतील ( नायजेरिया, हॉंगकॉंग, कुवेत, नेपाळ, घाना, इथिओपिया, ओमान, यु.के, यु.एस संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, भूतान, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया ) तब्बल २८१७८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

Web Title: It is a crime to imitate information on other people's websites: Kajal Hurriya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.