'गृहमंत्र्यांचे धन्यवाद पण... अनिल देशमुख यांनी तसं करायला नको होतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 03:24 PM2021-01-29T15:24:22+5:302021-01-29T15:33:02+5:30

भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवर एक मोठी चूक झाली होती. रावेर मतदारसंघातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे.

याप्रकरणी आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. मात्र, हा सर्व गोंधळ गुगल भाषांतरामुळे निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे.

भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.

भाजपाने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल', असा इशाराही अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिला होता. अनिल देशमुख यांनी ते आक्षेपार्ह उल्लेख असलेला फोटोही शेअर केला होता.

खासदार रक्षा खडसे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच, राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी गृहमंत्री म्हणून देशमुख यांची आहे, असेही त्या म्हणाल्या.

रक्षा खडसेंनी अनिल देशमुख यांच्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. कारण, देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्या आक्षेपार्ह मजकूर असलेल्या फोटोसह ते ट्विट रिट्विट केलं होतं.

देशमुख यांनी तो आक्षेपार्ह मजकूर वगळून ट्विट करायला हवं होतं, ती पोस्ट शेअर करायला नको होती. गृहमंत्र्यांचं ते ट्विट मला खटकलं, असं रक्षा खडसेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

राजकारणात चांगल्या आणि वाईट गोष्टीही घडत असतात, याप्रकरणाचीही चौकशी होईल. पण, देशातील कुठल्याही महिलेला बदनाम करण्याचं कृत्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरला नको, असेही रक्षा खडसेंनी म्हटलं.

प्रत्यक्षात याबाबत खातरजमा केली असता हा भाषांतराचा गोंधळ असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व खासदारांची यादी आहे. वेबसाइटवर इंग्रजी आणि हिंदी असे पर्याय आहेत.

हिंदीचा पर्याय निवडल्यानंतर खासदारांच्या यादीत रक्षा खडसे यांचा उल्लेख योग्यच असल्याचे दिसत आहे. श्रीमती रक्षा खडसे, रावेर (महाराष्ट्र) असे कॅप्शन रक्षा यांच्या फोटोला देण्यात आले आहे.

तर Raver या इंग्रजी शब्दाचे गुगल ट्रान्स्लेटमध्ये जाऊन हिंदीत भाषांतर केले असता होमोसेक्सुअल असा अर्थ सांगितला जात आहे. त्यामुळे या भाषांतरातूनच हा सारा गोंधळ झाल्याचे दिसत आहे.