‘गोरेगाव-मुलुंड’चे काम वेळेत करा, महापालिका आयुक्तांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 10:38 AM2024-05-07T10:38:05+5:302024-05-07T10:39:40+5:30

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात सुरू असलेल्या पेवमेंट क्वालिटी काँक्रीटच्या कामादरम्यान स्लम्प कोन चाचणी करण्यात आली.

work of goregaon mulund in time municipal commissioner's instructions to workers | ‘गोरेगाव-मुलुंड’चे काम वेळेत करा, महापालिका आयुक्तांच्या सूचना

‘गोरेगाव-मुलुंड’चे काम वेळेत करा, महापालिका आयुक्तांच्या सूचना

मुंबई :गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात सुरू असलेल्या पेवमेंट क्वालिटी काँक्रीटच्या कामादरम्यान स्लम्प कोन चाचणी करण्यात आली. सिमेंट आणि पाणी वापराचे प्रमाण तपासण्यासाठी ही चाचणी केली जात असून, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रकल्प विभागाचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या. 

प्रकल्पाची चार टप्प्यांत होणारी कामे सुरू असून, २७ ठिकाणी खांबांसाठी लागणाऱ्या पाया रचण्याचे काम पूर्ण झाले आहे.

पश्चिम उपनगरात रस्त्यांच्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा दौरा पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केला. यावेळी त्यांनी गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या कामाची ही पाहणी केली. या प्रकल्पात गोरेगाव पूर्व येथून ४.७० किलोमीटर लांबीचे दोन जुळे बोगदे असणार असून, त्यामध्ये प्रत्येकी तीन मार्गिका असतील. देशातील सर्वाधिक लांबीचे हे बोगदे आहेत. गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंत असणाऱ्या या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. 

१) हे काम पाच वर्षांत पूर्ण केले जाईल. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमला आहे.

२) दोन बोगदे करताना संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या काही भागांच्या खालून बोगदा जाणार आहे. 

३) कमीत कमी २० ते २५ मीटर आणि जास्तीत जास्त १०० मीटर खोलवर हे बोगदे होतील. 

४) अभयारण्याचा काही भाग येत असला तरीही त्याला कोणताही धक्का न लागता हे काम होणार आहे.

५) मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) वाहनचालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पात गोरेगाव पूर्व येथून ४.७० किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत जुळे बोगदे असून त्यामुळे प्रवास झटपट होण्यासाठी मदत मिळणार आहे. या बोगद्यांच्या कामासाठी मुंबई पालिकेने कार्यादेश दिले असून, सध्या प्राथमिक सर्व्हे सुरू आहे. 

६) बोगद्याचे संरेखन, त्यातील विविध कामे ही आव्हानात्मक असून,  या बोगद्याच्या कामात ५० हून अधिक विविध बांधकामांचा अडथळा ठरत आहे. 

७)  पालिकेच्या या सर्वेक्षणाला स्थानिकांकडून विरोध होत आहे. परिणामी, प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पातील बाधितांसाठी लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

जोड रस्त्याचे काम चार टप्प्यांत -

टप्पा १- नाहूर येथील रेल्वेमार्गावर उड्डाणपूल- ८० टक्के काम पूर्ण.

टप्पा २- गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता रुंदीकरण- ८५ टक्के काम पूर्ण आणि मुलुंड पश्चिम रुंदीकरण.

टप्पा ३- रत्नागिरी हॉटेल जंक्शन (गोरेगाव पूर्व) येथील १.२६ किमी लांबीचा उड्डाणपूल, खिंडीपाडा, तानसा जलवाहिनी ते नाहूर येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलापर्यंत १.८९ किमी लांबीचा उड्डाणपूल आणि जी. जी. सिंग रोड व गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प येथे त्रिस्तरीय चक्रीय मार्ग, तसेच मुलुंड पश्चिममधील हेडगेवार जंक्शन येथील उड्डाणपूल- २२ टक्के काम पूर्ण.

टप्पा ४- १.६ किमीचा गोरेगावमधील पेटी बोगदा आणि ४.७ किमीचा गोरेगाव पूर्वमधीलच जोड बोगद्याचे काम- कार्यादेश जारी आणि प्राथमिक सर्व्हे सुरू, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे १० टक्के काम पूर्ण.

Web Title: work of goregaon mulund in time municipal commissioner's instructions to workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.