"त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर"; अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:25 PM2024-04-24T22:25:16+5:302024-04-24T22:27:18+5:30

विले पार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ वा पुण्यतिथी सोहळ्यात मा. दीनानाथ मंगेशकर व लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

"The name of that sky is Lata Mangeshkar"; Amitabh Bachchan expresses emotion after accepting Lata Mangeshkar award | "त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर"; अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली भावना

"त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर"; अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली भावना

मुंबई - माझ्या वडीलांना जेव्हा लता मंगेशकरांबाबत विचारले तेव्हा ते केवळ 'शहद की धार' इतकेच म्हणाले. त्यांच्या गायनात मधाचा गोडवा होता. जशी मधाची लय कधी तुटत नाही, तसा त्यांचा सूर कधी तुटला नाही. लता मंगेशकरांचा स्वर आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा धागा आहे, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी 'त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...' अशी शब्दरचना असलेली 'आकाशाची सावली' ही मराठी कविता वाचून उपस्थितांची मने जिंकली. लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 

विले पार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ वा पुण्यतिथी सोहळ्यात मा. दीनानाथ मंगेशकर व लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इतका मोठा पुरस्कार मिळणे ही सौभाग्याची गोष्ट असल्याचे सांगत अमिताभ म्हणाले की, मी कधीच स्वत:ला या पुरस्कारसाठी योग्य मानले नाही. हृदयनाथ मंगेशकरांनी मागच्या वर्षीसुद्धा बोलावले होते, पण मी तब्बेत ठिक नसल्याचे सांगितले. खरे तर मी चांगला होतो, पण मला यायचे नव्हते. या वर्षी माझ्याकडे कोणते कारण नसल्याने त्यांचे आमंत्रण स्वीकारावे लागले. लताजींनी माझ्या कुटुंबावर नेहमीच प्रेम केले. त्यांच्याकडून आम्हाला मिळालेल्या आदराचे वर्णन शब्दांत करू शकणार नाही. १९८१मध्ये त्यांच्याच प्रेरणेमुळे मी कार्यक्रम करू लागलो. एकदा मी न्यूयॉर्कमध्ये असताना तिथे लताजींनी मला भेटायला बोलावले. तिथल्या मोठ्या हॅालमध्ये त्यांचा कार्यक्रम होणार होता. तिथे त्यांनी मला एक सादरीकरण करायला सांगितले. मला काही समजले नाही, पण त्या लता मंगेशकर असल्याने मी त्यांचे म्हणणे मान्य केले. त्या म्हणाल्या की, तुम्ही एका चित्रपटात गाणे गायले आहे. त्या 'लावारीस' चित्रपटातील 'मेरे अंगने में...' गाण्याबद्दल बोलत होत्या. त्यांच्या आग्रहाखातर मी त्या शोमध्ये गाणे गायले. लोकं अक्षरश: नाचू लागले. माझ्या मित्रांनी ते पाहिले आणि माझे कार्यक्रम सुरू झाले. त्यामुळे माझ्या कार्यक्रमांचे श्रेय लता मंगेशकरांना जाते.

मराठी... मराठी...
एका कार्यक्रमात मी हिंदीत बोलत असताना मागून आवाज आला की, ए मराठी... मराठी... तेव्हा मी हात जोडून त्यांची क्षमा मागितली आणि मराठी शिकत असल्याचे सांगून स्वत:चा बचाव केला. या गोष्टीला १०-१२ वर्षे झाली, पण अद्याप मी मराठी शिकू शकलो नाही. पूर्वी वेळ मिळाला नाही, पण आता वृद्धावस्थेत वेळ मिळत असल्याने मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही अमिताभ म्हणाले.

या सोहळ्यात गायक रुपकुमार राठोड यांना प्रदीर्घ संगीत सेवेसाठी मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात आले. इतर मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांमध्ये संगीतकार ए. आर. रहमान यांना दीर्घकाळ संगीत सेवेसाठी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य-सिनेसृटीतील प्रदीर्घ सेवेसाठी, अभिनेत्री पाद्मिनी कोल्हापुरे यांना सिनेसृष्टीतील प्रदीर्घ सेवेसाठी, भाऊ तोरसेकर यांना प्रदीर्घ पत्रकारितेसाठी, अभिनेता अतुल परचुरेला प्रदीर्घ नाटय सेवेसाठी, अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांचा उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. २०२३-२४ वर्षातील उत्कृष्ट नाटक निर्मितीसाठी दिला जाणारा मोहन वाघ पुरस्कार 'गालिब' या मराठी नाटकाला देण्यात आला. समाजसेवेसाठी दीपस्तंभ फाउंडेशन मोनोबल या संस्थेला आशा भोसले यांच्यातर्फे आनंदमयी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंजिरी फडके यांना प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी वाग्विलासीनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: "The name of that sky is Lata Mangeshkar"; Amitabh Bachchan expresses emotion after accepting Lata Mangeshkar award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.