एसी लोकलचे तिकीट कमी करा, नाही तर फेऱ्या वाढवा! रेल्वे प्रवासी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:56 AM2024-05-07T09:56:42+5:302024-05-07T09:58:16+5:30

रेल्वेच्या कारभारावर टीका.

reduce ac local tickets otherwise increase local trips railway passengers are aggressive critcism of railway administration | एसी लोकलचे तिकीट कमी करा, नाही तर फेऱ्या वाढवा! रेल्वे प्रवासी आक्रमक

एसी लोकलचे तिकीट कमी करा, नाही तर फेऱ्या वाढवा! रेल्वे प्रवासी आक्रमक

मुंबई : लोकलच्या गर्दीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. यावर उपाय म्हणून गर्दीचे व्यवस्थापन केले पाहिजे. आवश्यक ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली पाहिजे. लोकल फेऱ्या वाढविल्या पाहिजेत. फलाटांवर उपाययोजना केल्या पाहिजेत. कार्यालयीन वेळांमध्ये बदल केले पाहिजे, अशा उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात यावा, या मागण्यांकडे प्रवाशांनी लक्ष वेधत रेल्वेच्या कारभारावर टीका केली आहे. एसीचे लोकलचे तिकिट कमी करा नाही तर लोकल फेऱ्या वाढवा, अशी मागणीही रेल्वे प्रवाशांनी केली आहे. 

लोकलचे दर कमी ठेवणे, लांबून येणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवणे, प्रवासी आणि खासकरून महिला प्रवाशांची सुरक्षितता यासाठी ठोस नियोजन आवश्यक आहे.  एसी लोकल वाढवून रेल्वे प्रवास सुखकर करण्यास प्राधान्य, पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकमधील जलनिस्सारण इत्यादींवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
- शैलेश कांड

लोकल मुंबईची शान आहे; पण पूर्वी जसे आपण कुटुंबासोबत आरामात लोकलचा प्रवास करायचो तो आता शक्य नाही. मुंबईतबाहेरील राज्यातून कामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लोकलवर ताण पडत आहे. रेल्वेचे काम परफेक्ट आहे; पण हे वाढणारे लोढे कमी झाले पाहिजेत.- मंगेश माने

तांत्रिक बिघाडामुळे जी परिस्थिती ज्या ठिकाणी उद्भवते त्यावेळी व्यवस्थित ऐकायला जाईल, अशी घोषणा योग्यवेळी वारंवार कराव्यात. ज्यामुळे प्रवासी रेल्वे रुळावरून उतरून चालणार नाहीत. त्यामुळे रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी होईल. वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेले रेल्वे प्रवासी यासाठी रेल्वे पोलिस बळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान मुंबई लोकल रेल्वे मंडळाने आत्मसात केले पाहिजे.- चांगदेव एकनाथ वीर

प्लॅटफॉर्मवर ज्याप्रमाणे एसी लोकलसाठी प्रवासी रांगेत उभे राहून चढतात; त्याचप्रमाणे साध्या लोकलसाठी लोकांनी शिस्तीने लोकलमधील प्रवेश करायला हवा. त्यामुळे लहान मुले, वृद्ध, आजारी, कमजोर प्रवाशांची गैरसोय टळेल.- अनिल देशमुख

लोकलच्या २ फेऱ्यांमधील वेळ कमी केली तरच फलाटावर गर्दी कमी होईल. लोकल ट्रेनचे रूपांतर वातानुकूलित लोकलमध्ये करणे हा सामान्य माणसाच्या हक्काला धोका आहे. सामान्य माणसाला भाडे परवडणारे नाही.  वातानुकूलित लोकलच तिकीट ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत ९५ रुपये आहे. तेच सामान्य लोकलचे १५ रुपये आहे.- विकी पाटील

पंधरा कोच असावेत. एसी लोकलचे दर कमी असावे. कार्यालयीन वेळेमध्ये बदल करावेत. घाटकोपर ते सीएसएमटी गाडी आधी होती ती बंद केली. ती पुन्हा सुरू करावी.- विनोद हिवाळे

Web Title: reduce ac local tickets otherwise increase local trips railway passengers are aggressive critcism of railway administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.