मोबाइलवर मिळणार मोनोचे तिकीट; एमएमआरडीए आणणार क्यूआरकोड प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:58 AM2020-06-16T00:58:41+5:302020-06-16T00:58:50+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Mono tickets will be available on mobile | मोबाइलवर मिळणार मोनोचे तिकीट; एमएमआरडीए आणणार क्यूआरकोड प्रणाली

मोबाइलवर मिळणार मोनोचे तिकीट; एमएमआरडीए आणणार क्यूआरकोड प्रणाली

Next

मुंबई : कोरोनासोबत जगताना फिजिकल डिस्टंसिंग आणि सार्वजनिक ठिकाणांवरील उपकरणे आणि साहित्याशी कमीतकमी संपर्क ठेवण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून एमएमआरडीएने मोने रेल्वेची तिकिटे काढण्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्या वर्षी १ कोटी ७७ लाख रुपये खर्च करण्याची त्यांची तयारी आहे.

मोने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सध्या स्टेशनच्या तिकीट काऊंटरवरून तिकीट (टोकन) घ्यावे लागते. स्टेशनात प्रवेशासाठी हे प्लास्टिकचे टोकन प्रवेशद्वाराजवळच्या मशिनमध्ये टाकावे लागते. त्याशिवाय प्रवासासाठी स्मार्ट कार्डचाही वापर करता येतो. परंतु, हे तिकिट देताना आणि घेताना लोकांशी संपर्क येतो. प्रवेशादरम्यान मशिन आणि अन्य उपकरणांनासुद्धा हात लागतो. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी अशाप्रकारचे संपर्क कमीतकमी ठेवावे लागतील. त्यासाठी या नव्या प्रणालीचा स्वीकार करत असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार केले जाईल. या अ‍ॅपच्या सहाय्याने आॅनलाईन पैसे भरून प्रवासी क्यूआर कोडमधील तिकीट काढू शकतात.

स्थानकांच्या प्रवेशद्वाराशी हा कोड स्कॅन करून आत बाहेर प्रवेश मिळेल. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल आणि स्टेशन परिसरातील गर्दी कमी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केला आहे. हे काम खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या केल्या आहेत. यशस्वी निविदाकाराला दोन महिन्यांत क्यू आर कोडसाठी मोबाईल अँप विकसित करून पुढील १२ महिन्यांसाठी राबविण्याची जबाबदारी दिली जाईल.

आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या स्थानकादरम्यान १९.५४ किमी धावणाºया या मोनोतून दैनंदिन १० हजार प्रवासीसुद्धा प्रवास करत नाहीत. त्यानंतरही दररोज २५ हजार तिकीटे या प्रणालीच्या माध्यमातून काढली जातील एवढी प्रणाली उभारण्याची अट निविदेत आहे. प्रवासीसंख्या अत्यल्प असल्याने वर्षाकाठी फक्त ६ कोटींचे उत्पन्न मिळते. फेब्रुवारी महिन्यांत या प्रकल्पाच्या तिकिटवाटपाच्या व्यवस्थेसाठी ३ कोटी ७५ लाखांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. या प्रकल्पातील सुरक्षा रक्षकांसाठी ५ कोटी ३५ लाख खर्च होतात. तर, श्वानपथकांचा खर्चही १ कोटी ६९ लाख रुपये आहे. त्यात आता क्यू आर कोड प्रणालीच्या आणखी १ कोटी ७७ लाखांच्या खर्चाची भर पडणार आहे. मोनोचे उत्पन्न वाढत नसताना खर्चाचे आकडे मात्र भरारी घेत आहेत.

Web Title: Mono tickets will be available on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.