"मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले"; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 04:27 PM2024-05-07T16:27:21+5:302024-05-07T16:27:41+5:30

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

Does Uddhav Thackeray agree with Vijay wadettiwar who speaks the language of Pakistan says devendra fadnavis | "मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले"; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

"मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले"; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यावरुन भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना लक्ष्य केलं होतं. यावरुन आता भाजप चांगलीच संतापली आहे. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबई पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

"हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलतायत. त्यामुळे काँग्रेसशी आघाडी केलेले उद्धव ठाकरे या विषयावर अद्याप गप्प आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपण वडेट्टीवार यांच्या आरोपाशी सहमत आहोत का, हे जाहीर करावे," असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात ॲड.उज्ज्वल निकम यांनी बजावलेल्या भूमिकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र  वडेट्टीवार हे  निकम यांच्यावर बेछूट आरोप करत असताना मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

"महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा नेता पाकिस्तानधार्जिणी वक्तव्ये खुलेआम करत असताना उद्धव ठाकरे मात्र मूग गिळून गप्प आहेत. हेमंत करकरे हे अजमल कसाबच्या गोळीनेच हुतात्मा झाले हे न्यायालयातही सिद्ध झाले असताना वडेट्टीवार पाकची भाषा बोलत आहेत. वडेट्टीवार हे पाकिस्तानमधील कुणाच्या संपर्कात वडेट्टीवार आहेत," असा सवालही फडणवीसंनी केला. 

"मुंबई हल्ल्याबाबत न्यायालयात सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचा कट होता आणि अजमल कसाबच्या गोळीनेच हेमंत करकरे हुतात्मा झाले हे न्यायालयामध्ये सिद्ध होऊन पाकिस्तान तोंडघशी पडले होते. शेकडो मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या अजमल कसाब सोबत काँग्रेस असून भाजप उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी आहे," असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Does Uddhav Thackeray agree with Vijay wadettiwar who speaks the language of Pakistan says devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.