उपनगरांतील 2,728 मतदार घरूनच बजावणार हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 07:15 AM2024-05-08T07:15:04+5:302024-05-08T07:15:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८५ वर्षांवरील आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना घरातून मतदानाची ...

2,728 voters in the suburbs will exercise their rights from home | उपनगरांतील 2,728 मतदार घरूनच बजावणार हक्क

उपनगरांतील 2,728 मतदार घरूनच बजावणार हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८५ वर्षांवरील आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याला प्रतिसाद देत उपनगरातील दोन हजार ७२८ मतदारांनी घरातून मतदानाचा पर्याय निवडला आहे. या मतदारांसाठी २०० पथकांची नियुक्ती केली असून, ते १० व ११ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत, अशी माहिती उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी येथे दिली. 

उपनगरातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम तयारीच्या अनुषंगाने क्षीरसागर यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी तेजस समेळ उपस्थित होते. उपनगरात चारही मतदारसंघात १६ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने अतिरिक्त बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार असून, त्याचेही नियोजन केले आहे. दोन दिवसात ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई उत्तरमध्ये - १९, मुंबई उत्तर पश्चिममध्ये - २१, मुंबई उत्तर पूर्वमध्ये - २०, तर मुंबई उत्तर मध्यमध्ये - २७, अशा चारही मतदारसंघातून एकूण ८७ उमेदवार रिंगणात आहेत. 
जिल्ह्यात १२ निवडणूक निरीक्षक भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण ४, खर्च तपासणीसाठी ६, तर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी २ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र ते मुख्य मार्गावर बेस्टच्या बसची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. तर, निवडणूक कर्तव्यावरील १६ हजार ५९६ आणि अत्यावश्यक सेवेच्या कर्तव्यावरील ६ हजार ९१७, असे २३ हजार ५१३ टपाली मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी मतदार सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यांचे टपाली मतदान १४ ते १७ मे दरम्यान होणार आहे.

उपनगरावर दृष्टिक्षेप ७४ लाख मतदार  
    एकूण मतदार - ७४ लाख ४८ हजार ३८८ 
    पुरुष मतदार - ४० लाख २ हजार ७४९ 
    महिला मतदार - ३४  लाख ४४ हजार ८१९ 
    मतदान केंद्रे - ७ हजार ३८४ 
    त्यापैकी तात्पुरती मतदान केंद्रे - २ हजार ३२ 
    मनुष्यबळ : ४० हजार ६१५ 

१८ ते १९ वयोगटांतील नवमतदार 
    एकूण नवमतदार - ८४ हजार 
    पुरुष नवमतदार - ४८ हजार ४४० 
    महिला नवमतदार - ३६ हजार ७६३ 
    ट्रान्सजेंडर - ५ 

Web Title: 2,728 voters in the suburbs will exercise their rights from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.