मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> क्रीडा >> स्टोरी
पुणे-मुंबई अंतिम लढाई
First Published: 20-May-2017 : 03:25:44
Last Updated at: 20-May-2017 : 03:29:19

क्वालिफायर २ : केकेआरचा ६ विकेटसनी धुव्वा

बंगळुरु : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर रोहित शर्मा व कृणाल पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या सत्राची अंतिम फेरी गाठताना कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान १४.३ षटकातंच ६ विकेट्स राखून संपुष्टात आणले. विजेतेपदासाठी मुंबई रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुध्द भिडणार असून यासह यंदाच्या सत्रात चौथ्यांदा क्रिकेटप्रेमींना ‘महाराष्ट्र डर्बी’चा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

अंतिम फेरीतील थेट प्रवेश हुकल्यानंतर क्वालिफायर २ मध्ये खेळावे लागलेल्या बलाढ्य मुंबईने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्वेषाने गोलंदाजी करताना तुल्यबळ कोलकाता नाइट रायडर्सचा डाव १८.५ षटकात १०७ धावांमध्ये संपुष्टात आणला. फिरकी गोलंदाज कर्ण शर्माने चार महत्त्वाचे फलंदाज बाद करुन कोलकाताच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तब्बल ५८ चेंडू निर्धाव टाकत मुंबईकरांनी कोलकाताला जखडवून ठेवले. या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकरांचा डावही सहाव्या षटकात ३ बाद ३४ धावा असा अडचणीत आला. परंतु, कर्णधार रोहित शर्मा आणि कृणाल यांनी ५४ धावांची निर्णायक भागीदारी करुन मुंबईला विजयी मार्गावर आणले. १३व्या षटकात नॅथन कुल्टर - नाइलने रोहितला बाद केले. रोहितने २४ चेंडूत २६ धावा केल्या. यानंतर, कृणाल (३० चेंडूत नाबाद ४५ धावा) आणि केरॉन पोलार्ड (नाबाद ९) यांनी मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, कर्ण शर्माने १६ धावांत ४ आणि जसप्रीत बुमराहने ७ धावांत ३ बळी घेत कोलकाताचा डाव १०७ धावांमध्ये गुंडाळला. दुसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहने ख्रिस लीनच्या रुपाने कोलकाताला पहिला धक्का दिल्यानंतर त्यांच्या फलंदाजीला गळतीच लागली. यानंतर कोलकाताच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने बघता बघता त्यांची सातव्या षटकात ५ बाद ३१ अशी केविलवाणी अवस्था झाली. इशांक जग्गी - सुर्यकुमार यादव यांनी सहाव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करुन संघाला सावरले. परंतु, कर्णने जग्गीला बाद केले. त्याने ३१ चेंडूत २८ धावा केल्या. यानंतर, पुढील २० धावांत उर्वरीत फलंदाज बाद करत मुंबईकरांनी कोलकाताला झटपट गुंडाळले. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाइट रायडर्स : १८.५ षटकांत सर्वबाद १०७ धावा (सुर्यकुमार यादव ३१, इशांक जग्गी २८; कर्ण शर्मा ४/१६, जसप्रीत बुमराह ३/७, मिशेल जॉन्सन २/२८) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १४.३ षटकात ४ बाद १११ धावा (कृणाल पांड्या नाबाद ४५, रोहित शर्मा २६; पियुष चावला २/३४)

आमचा संघ वन मॅन आर्मी नाही, हेच या विजयावरुन सिध्द होते. अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग कठीण बनला असला तरी आम्ही घाबरलो नव्हतो. गोलंदाजांनी आज विजयाचा पाया रचला. आता विजेतेपदासाठी फक्त एक अडथळा पार करायचा आहे.

-रोहित शर्मा, कर्णधार मुंबई इंडियन्स

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com