शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> क्रीडा >> स्टोरी
भारतीय महिलांचा सलग चौथा पराभव
First Published: 20-May-2017 : 03:20:13

हॉकी मालिका : न्यूझीलंडचा ०-३ ने सहज विजय

हॅमिल्टन : उत्तरार्धात कडवे आव्हान सादर केल्यानंतरही भारतीय महिला संघाला न्यूझीलंड दौऱ्यात शुक्रवारी सलग चौथ्या पराभवाचे तोंड पहावे लागले. यजमान संघाने हा सामना ३-० ने सहज जिंकला. न्यूझीलंडचा हा चौथा विजय आहे. आधीचे तिन्ही सामने ४-१, ८-२, ३-२ अशा फरकाने जिंकणारा हा संघ पाचव्या सामन्यात ‘क्लीन स्वीप’च्या इराद्याने खेळेल.

भारताने आज आक्रमक सुरुवात केली. तथापि, न्यूझीलंडच्या भक्कम बचावफळीपुढे भारतीय खेळाडूंची डाळ शिजली नाही. दरम्यान, १४ व्या मिनिटाला न्यूझीलंडला संधी मिळताच राचेल मॅकेनने संघाला आघाडी मिळवून दिली. प्रतिस्पर्धी गोल होताच भारतीय संघ दडपणात आला. न्यूझीलंड संघाने मात्र याचा लाभ घेत वर्चस्व गाजविले. १७ व्या मिनिटाला यजमान संघाने आणखी एक गोल नोंदवित आघाडी २-० अशी केली.

भारताने प्रत्युत्तरात हल्ले केले खरे पण मोक्याच्या क्षणी चुकल्यामुळे गोल नोंदविण्यात यश येऊ शकले नाही. दुसरीकडे २६ व्या मिनिटाला राचेलने स्वत:चा दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला.

यामुळे मध्यंतरापर्यंत न्यूझीलंड संघ ३-० ने पुढे होता. उत्तरार्धातील दोन्ही क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने भारतीय गोलफळीवर वारंवार हल्ले केले. पण गोलकिपर रजनीने त्यांचे सर्व हल्ले शिताफीने परतवून लावताच भारतावर आणखी गोल होऊ शकले नाहीत. (वृत्तसंस्था)

हॉकीपटू नवज्योतने गाठले सामन्यांचे शतक

भारतीय महिला हॉकी संघाची मधल्या फळीतील खेळाडू नवज्योत कौर हिने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यादरम्यान स्वत:च्या सामन्यांचे शतक पूर्ण केले. नवज्योतने २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नेपियरमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीत पदार्पण केले होते. कुरुक्षेत्र येथे जन्मलेल्या नवज्योतने ज्युनियर आशिया कप आणि नेदरलँडमधील २१ वर्षे गटाच्या स्पर्धेत चमकदार कामगिरीसह सीनियर संघात स्थान पटकविले होते. त्यानंतर ती भारतीय संघात कायम राहिली. या दरम्यान नवज्योतने विश्व हॉकी लीगची उपांत्य फेरी, १७ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा, २०१६ रिओ आॅलिम्पिक, चौथी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी, तसेच महिला हॉकी विश्व लीगमध्ये दोनदा भाग घेतला.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com