शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> क्रीडा >> स्टोरी
जोकोविच, नदाल उपांत्यपूर्व फेरीत
First Published: 20-May-2017 : 03:18:28

रोम : क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदाल आणि द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच यांनी सरळ सेटस्मध्ये विजय नोंदवताना रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली; परंतु स्टॅन वावरिंका याचे मात्र आव्हान संपुष्टात आले.

गतवर्षी अंतिम फेरीत ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरे याला पराभूत करणाऱ्या जोकोविचने स्पेनच्या रॉबर्टो बातिस्ता आगूट याचा ६-४, ६-४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्याला अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रो याच्याशी दोन हात करावे लागतील. मार्टिनने सातव्या मानांकित जपानच्या केई निशीकोरी याच्यावर ७-६, ६-३ असा विजय मिळवला. फ्रेंच ओपनआधी सुरेख लय सापडलेल्या राफेल नदालने क्ले कोर्टवर आपले वर्चस्व राखले. त्याने अमेरिकेच्या १३ व्या मानांकित जॅक सोक याच्यावर ६-३, ६-४ अशी मात केली.

- नदालची पुढील लढत आॅस्ट्रियाच्या आठव्या मानांकित डोमेनिक थीम याच्याशी होईल. थीमने अमेरिकेच्या सॅम क्वेरी याचे आव्हान ३-६, ६-३, ७-६ असे मोडीत काढले.

- नदाल आणि जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्यास ते उपांत्य फेरीत आमने-सामने येऊ शकतात.

बोपन्ना, कुइवास रोम मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत...

रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार पाब्लो कुइवास यांनी फेलिसियानो लोपेज आणि मार्क लोपेज या सातव्या मानांकित जोडीचा पराभव करीत रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

बोपन्ना आणि कुइवास यांनी दुसऱ्या फेरीच्या चुरशीच्या लढतीत या स्पॅनिश जोडीचा ४-६, ७-६, १0-८ असा पराभव केला. १ तास ३९ मिनिटे रंगलेल्या या लढतीत बोपन्ना आणि कुइवास जोडीला ब्रेक पॉइंट प्राप्त करण्याची तीनदा संधी मिळाली; परंतु यापैकी ते एकाही संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत.

त्यांनी पहिल्या सेटमध्ये एकदा आपली सर्व्हिस गमावली. या जोडीची पुढील फेरीतील लढत पीयरे ह्यूज हरबर्ट आणि निकोलस माहूट या चौथ्या मानांकित जोडीशी होईल.

महिला गटात सानिया मिर्झा आणि यारोस्लावा श्वेदोवा ही तृतीय मानांकित जोडी उपांत्यपूर्व फेरीत सारा इरानी आणि मार्टिना ट्रेविसान यांच्याविरुद्ध खेळेल.

- महिला गटात व्हीनस विल्यम्सने ब्रिटनच्या योहाना कोंटा हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-१, ३-६, ६-१ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता तिची पुढील लढत स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजा हिच्याशी होईल. रशियाच्या सातव्या मानांकित स्वेटलाना कुजनेत्सोवा हिला आॅस्ट्रेलियाची क्वॉलिफायर डारिया गावरिलोवा हिच्याकडून २-६, ७-५, ६-४ असा पराभव पत्करावा लागला.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com