सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> क्रीडा >> स्टोरी
फायनलची संधी कोणाला?
First Published: 19-May-2017 : 03:04:58

बंगळुरू: दोन वेळेचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१०च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज शुक्रवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध लढणार आहे. या लढतीचा विजेता २१ मे रोजी रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध फायनलसाठी पात्र ठरेल.

केकेआरचा मुंबईविरुद्ध जय-पराजयाचा रेकॉर्ड ५-१५ असा आहे, यंदा साखळीतील दोन्ही सामन्यांत केकेआर पराभूत झाला होता. मुंबईने पहिल्या सामन्यात केकेआरला एक चेंडू, तसेच चार गडी शिल्लक राखून नमविले होते. मुंबईला २४ चेंडंूत ६० धावांची गरज होती. हार्दिक पंड्याने ११ चेंडंूत २९ धावा ठोकल्या. दुसऱ्या साखळी सामन्यात मुंबईने केकेआरला पुन्हा ९ धावांनी धूळ चारली.

मुंबई संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये पुण्याकडून पराभूत झाला आहे. केकेआरने काल हैदराबादचा डकवर्थ-लुईस नियमानुसार सात गड्यांनी विजय साजरा केला. मुंबई आणि केकेआर याआधी दोन-दोन वेळा आयपीएल जेतेपदाचे मानकरी ठरले आहेत. रविवारी हैदराबाद येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात खेळण्यासाठी दोन्ही संघ हा सामना जिंकण्यास प्रतिष्ठा पणाला लावतील.

मुंबईच्या फलंदाजांनी यंदा सरस कामगिरी केली. लेनडल सिमन्स आणि पार्थिव पटेल यांच्याकडून चांगली सलामी मिळाली. कर्णधार रोहित शर्मा, अंबाती रायुडू आणि किरॉन पोलार्ड हे देखील धावा काढण्यात यशस्वी ठरले. हार्दिक व कुणाल पंड्या यांनीही लक्ष वेधले.

साखळीत दहा विजय नोंदविणारा मुंबई शानदार फॉर्ममध्ये आहे. पुण्याकडून मिळालेला पराभव विसरून नव्या उत्साहाने खेळण्यास संघ सज्ज झाला आहे. गोलंदाजीत या संघाकडे लसिथ मलिंगा आणि न्यूझीलंडचा मिशेल मॅक्लेनघन हे हुकमी एक्के असून डेथ ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह कमालीचा मारा करतो. (वृत्तसंस्था)

उभय संघ यातून निवडणार

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, जोस बटलर, श्रेयस गोपाल, कृष्णप्पा गोथाम, एसेला गुणरत्ने, हरभजन सिंग, मिशेल जॉन्सन, कुलवंत के, सिद्धेश लाड, मिशेल मॅक्लेनघन, लसिथ मलिंगा, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, निकोलस पूरान, दीपक पुनिया, नीतिश राणा, अंबाती रायुडू, जितेश शर्मा, कर्ण शर्मा, लैंडल सिमंस, टिम साउदी, जगदीशा सुचित, सौरभ तिवारी, विनय कुमार.

कोलकाता नाईट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), डेरेन ब्राव्हो, ट्रेंट बोल्ट, पीयूष चावला, नाथन कूल्टर नाईल, कोलिन डे ग्रॅण्डहोम, ऋषी धवन, सायन घोष, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, ईशांक जग्गी, कुलदीप यादव, ख्रिस व्होक्स, ख्रिस लीन, सुनील नारायण, मनीष पांडे, युसूफ पठाण, अंकित राजपूत, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा, उमेश यादव.

- केकेआरसाठी ख्रिस लीन, कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी सातत्याने धावा केल्या. सुनील नारायणकडून डावाचा प्रारंभ करणारे केकेआरसाठी लाभदायी ठरले आहे. गंभीरने स्वत: ४८६, तर मनीष पांडेने ३९६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ख्रिस व्होक्सने १७ आणि उमेश यादवने १६ गडी बाद केले आहेत.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com