सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> 428 >> स्टोरी
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जाहीर केली सुरक्षित देशांची यादी. या यादीतल्या 10 देशात तुम्ही बिनधास्तपणे सहलीचा प्लॅन करू शकता!
First Published: 17-July-2017 : 18:36:41

- अमृता कदम

कोणत्याही अनोळखी ठिकाणी प्रवासाला जायचं म्हणजे सर्वांत महत्त्वाची असते सुरक्षितता. त्यातून जर तुम्ही परदेशात फिरायला जात असाल तर नवीन भाषा, नवीन लोकांमध्ये आपण सुरक्षित असू की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे बरेच जण ट्रॅव्हल कंपन्यांसोबतच जाण्याचा मार्ग स्वीकारतात. पण ट्रॅव्हल कंपनीबरोबर फिरताना कदाचित एखादं ठिकाण एक्सप्लोअर करण्यावर मर्यादा येऊ शकतात. म्हणूनच मनात कोणत्याही शंका-कुशंका न बाळगता फिरायला जायचं असेल तर जगातल्या सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देशांना भेटी देण्याचा आॅप्शन तुमच्याकडे आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने सर्वांत सुरक्षित देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दहा देशांचा समावेश आहे. या दहा देशांना तुम्ही बिनघोरपणे भेट देऊ शकता आणि पर्यटनाचा आनंद लुटू शकता.

 

1) फिनलंड

जगातल्या सुरक्षित देशांच्या यादीत फिनलंडचा क्र मांक सर्वांत प्रथम आहे. फिनलंडमध्ये तुम्हाला प्रचंड अशा भौगोलिक विविधतेचं दर्शन घडतं. स्वच्छ, नितळ असे बाल्टिकचे समुद्रकिनारे आणि घनदाट जंगलं. एक दोन नव्हे तर तब्बल 30 नॅशनल पार्क या छोट्याशा देशात आहेत.

 

 

2) कतार

गेल्या काही दिवसांमध्ये कतार हा देश राजकीय अस्थिरता अनुभवत आहे. मात्र इथलं पर्यटन हे या राजकीय घडामोडींपासून दूरच आहे आणि अत्यंत सुरक्षितही आहे. कतारमधलं सर्वांत मुख्य आकर्षण म्हणजे या देशाची राजधानी दोहा. इथल्या मशीदी, म्युझियम्स, वाळंवटी टेकड्या आणि बरंच काही पर्यटकांना कतारकडे खेचून आणतं. कतारमध्ये तुम्ही म्यझिअम आॅफ इस्लामिक आर्ट, अल वाकरा म्युझियम, अल-जसासिया कार्व्हिंग्ज, गोल्डन मॉस्क, कतारा मॉस्क या ठिकाणांना भेटी देऊ शकता. त्याचबरोबर इथल्या डेझर्ट सफारीचाही आनंद घेऊ शकता. कतारची ट्रीप तुम्ही वर्षभरात केव्हाही प्लॅन करु शकत असला तरी या देशाला भेट देण्याचा सर्वांत योग्य काळ आहे नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ.

 

 

3) रवांडा

अजूनही हा देश प्रसिद्ध टूरिस्ट डेस्टिनेशन बनला नसला तरी निसर्गसौंदर्यानं नटलेला रवांडा तुम्हाला नक्कीच अविस्मरणीय अनुभव देऊ शकतो. इथले नॅशनल पार्क, वॉटर स्पोर्ट्स, इथल्या आदिवासी संस्कृतीचा परिचय करु न देणारे म्युझियम्स, आर्ट सेंटर्स या छोट्याशा देशात तुम्हाला अजिबात बोअर होऊ देत नाहीत. व्होलकॅनो नॅशनल पार्क, किगली जिनोसाइड मेमोरियल, इनेमा आर्ट सेंटर, अकागेरा नॅशनल पार्क ही रवांडातली प्रमुख पर्यटनस्थळं. शिवाय तुम्ही बनाना ज्युस मेकिंग सेंटरला भेट देऊन तुम्ही स्थानिक लोकांसोबत ज्यूसही बनवू शकता. रवांडाची ट्रीप प्लॅन करायची असेल तर जून ते सप्टेंबर हा आयडिअल पिरिअड आहे.

 

4) सिंगापूर

आशियातल्या बेस्ट शॉपिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणजे सिंगापूर. सिंगापूर ही आजकाल अनेक भारतीय पर्यटकांची परदेशी पर्यटनासाठीची पहिली पसंती आहे. सिंगापूरचं झगमगीत वैभव, नाइट लाइफ ही त्यामागची कारणं आहेतच पण त्यासोबतच इथे गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या घटना या अत्यंत तुरळक होतात. सिंगापूरमधली पोलिस व्यवस्था ही अत्यंत विश्वासार्ह आहे. मरिना बे सॅण्डस, चायना टाऊन, समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बागा, लिटिल इंडिया आणि अरब स्ट्रीट सिंगापूरमध्ये तुम्हाला पर्यटनाचा पुरेपूर आनंद देतात.

5) नॉर्वे

‘मध्यरात्रीच्या सूर्याचा देश’ म्हणून नॉर्वे ओळखला जातो. निसर्गसौंदर्यासोबतच इथली कायदा आणि सुव्यवस्थाही नॉर्वेला जगातल्या सर्वांत सुरक्षित पर्यटनस्थळांपैकी एक बनवतं. इथल्या पोलिसांची विश्वासार्हता ही जगातली पाचव्या क्र मांकाची आहे. विशाल, हिमाच्छादित पर्वतरांगा, निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाणारे नॉदर्न लाइट्स, आर्क्टिक सर्कल, अटलांटिक ओशन रोड, नॅशनल पार्क, म्युझिअम्स. नॉर्वेमध्ये नैसर्गिक पर्यटनस्थळांसोबतच कला, इतिहास यांचाही आस्वाद घेता येतो. इथे प्रत्येक सीझन तुम्हाला काहीतरी वेगळा नजारा दाखवतो. पण जर मध्यरात्रीच्या सूर्याचा अनोखा चमत्कार पाहायचा असेल तर तुम्हाला जून ते आॅगस्टदरम्यान नॉर्वेला भेट द्यावी लागेल.

6) हाँगकाँग

परवडणाऱ्या तिकिटदरांमुळे आणि अगदी पाच-सहा दिवसांत होणाऱ्या आटोपशीर ट्रीपमुळे हाँगकाँग भारतीय पर्यटकांचं पसंतीचं पर्यटनस्थळं आहे. इथे तुम्ही हाँगकाँग डिस्नेलॅण्ड, द पीक, जायंट बुद्धा, स्टॅनली मार्केट, मरे हाऊस आणि अव्हेन्यू स्टार्स या प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देऊ शकता. आणि तेही अगदी निर्धास्तपणे. कारण हाँगकाँगमध्ये गुन्हेगारीचा दर अतिशय कमी आहे. हाँगकाँगला जाण्याचा सर्वांत योग्य कालावधी म्हणजे मार्च-एप्रिल आणि आॅक्टोबर- नोव्हेंबर.

7) स्वित्झर्लंण्ड

बॉलिवूड मूव्हीजच्या कृपेनं स्वित्झर्लंड हे भारतीयांचं अगदी ड्रीम डेस्टिनेशन बनलं आहे. रोमॅण्टिक नैसर्गिक नजाऱ्यांसोबतच तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा बोनसही मिळतो. आल्प्सच्या पर्वतरांगा, रहाईन फॉल, ओल्ड टाऊन बर्न, लेक लुझर्न, द मॅटरहॉर्न ही स्वित्झर्लंण्डमधली आकर्षणं. भारतातल्या गरमीला, इथल्या गजबजाटाला आणि रोजच्या धकाधकीला कंटाळालात की स्वित्झर्लंण्डला जाण्याचा विचार करु शकता. तोच या देशाला भेट देण्याचा बेस्ट पीरियड आहे असं समजा.

8) ओमान

आखाती देशांपैकी एक असलेल्या ओमान हा जगातल्या त्या देशांपैकी आहे जिथे दहशतवादाच्या सर्वांत कमी घटना घडतात. त्यामुळेच ओमान जगातल्या सर्वांत सुरक्षित देशांपैकी एक आहे. ओमानमध्ये तुम्ही ग्रॅण्ड मॉस्क, मूत्राह स्यूक(मार्केट), सुलतानाचा राजवाडा, नॅशनल म्युझियम, निझवा स्यूक (मार्केट), बाहला फोर्ट या ठिकाणांना भेट देऊ शकता. आॅक्टोबर ते एप्रिलदरम्यान तुम्ही ओमानची ट्रीप प्लॅन करु शकता.

9) आइसलॅण्ड

आइसलॅण्ड हा जगातली तिसऱ्या क्र मांकाचा सर्वांत सुरक्षित देश आहे. त्यामुळेच अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पावलं आवर्जून आइसलँण्डकडे वळतात. ब्लू लगून, ग्रेट गेसर, ब्लॅक सँड बीच, ग्लेशिअर्स, वॉटरफॉल्स, व्हेल वॉचिंगसोबतच इथली सर्वांत आकर्षक गोष्ट आहे नॉदर्न लाइट्स. प्रकाशाच्या खेळाचा हा नैसर्गिक चमत्कार पहायचा असेल तर फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबर-आॅक्टोबर हे अत्यंत योग्य महिने आहेत.

10) संयुक्त अरब अमिरात

स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसोबतच उत्तमोत्तम खाद्यपदार्थ आणि शॉपिंगसाठीही संयुक्त अरब अमिरात प्रसिद्ध आहे. इथली कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत कडक असल्यामुळेच पर्यटनासोबतच बिझनेस ट्रीपसाठीही अनेक जण संयुक्त अरब अमिरातीचा पर्याय विचारात घेतात. शुभ्र वाळूचे किनारे आणि नीलमण्यांसारखं पाणी असलेला समुद्र पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतात. शॉपिंगसाठी देर मार्केट, बूर्ज खलिाफासारखी ठिकाणं, शेख झायेद मॉस्क, शारजाह आर्ट म्युझिअम...संयुक्त अरब अमिरातीमध्ये तुमचा वेळ कसा जातो, हे तुम्हालाही कळणार नाही. सप्टेंबर ते मार्च या देशाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे.

 

 

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com