सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> 428 >> स्टोरी
पावसाच्या आगमनाने पिकनिक मूड!
First Published: 17-July-2017 : 01:47:25

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे झोपी गेलेले ट्रेकर्स आणि पिकनिकचे आयोजन करणारे मुंबईकरही खडबडून जागे झाले आहेत. बऱ्याच मुंबईकरांनी रविवारी पावसाचा मनमुराद आनंद लुटला असून बहुतेकांनी पुढील शनिवार व रविवारचे जोरदार नियोजन केले आहे.

मुंबईसह नजीकच्या परिसरांत पावसाळ्यात गर्दी नसलेले ठिकाण शोधणे मुश्कीलच आहे. शहराजवळ असलेले अनेक लहान मोठे किल्ले, धबधबे, गुंफा, अभयारण्ये ही भटकंती करणाऱ्यांसाठी पर्वणी ठरतात. त्यात आठवड्याभरात झालेल्या पावसाने गळ्यात कॅमेरा लटकवूून छायाचित्रे काढणाऱ्या हौशानवशा छायाचित्रकारांसह गिरिमित्र, दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्स यांना अनेक ठिकाणे खुणावू लागली आहेत. त्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कपासून कर्नाळा पक्षी अभयारण्य अशा राष्ट्रीय उद्यानांपासून राजमाची, माहुली, लोहगड, विसापूर अशा गडकिल्ल्यांचा समावेश आहे. काही चुकलेली पावले कोहोज, कान्हेरी, गणपती गडद, कोंडाणे, भाजे अशा गुंफा आणि लेण्यांकडेही वळतात.

अशोका वॉटरफॉल्स-

मुंबईकरांना एका दिवसात करता येणारे मान्सून डेस्टिनेशन म्हणजे अशोका वॉटरफॉल. मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाट सुरू झाल्या-झाल्याच मोखाडाकडे जाणाऱ्या मार्गावर हा धबधबा आहे. डोंगरकडा आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ यामुळे येथे पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईकर गर्दी करत आहेत. नयनरम्य असलेला हा परिसर पावसाळा सुरू झाला की मुंबईकरांना खुणावू लागतो. मुंबईजवळ असलेल्या धबधब्यांपैकी सर्वात जास्त गर्दी खेचणारा धबधबा म्हणता येईल.

तुंगारेश्वर : वसई रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील एक ते दीड तासाच्या अंतरावर तुंगारेश्वर ठिकाण आहे. इथे प्राचीन शिव मंदिर आहे. हा काहीसा भाग डोंगराळ असून नदीचा खळखळाट पर्यटकांना स्पॉटपर्यंत घेऊन जातो. दरम्यान, ट्रेकिंगचाही आनंद लुटता येतो. रस्त्यामध्ये येणारे छोटे-छोटे सेल्फी घेण्यास भाग पाडतात. शिव मंदिराच्या आवारात पर्यटकांना पेटपूजेची व्यवस्था आहे. शिवमंदिराला नदीचा वेढा असून पावसाळ्यात येथील दृष्य काही औरच असते.

रबाळे गवळीदेवी धबधबा-

मुंबईकरांना अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गवळीदेवी धबधब्यावर मुंबईकर गर्दी करत आहेत. मुंबईच्या शेजारी असलेल्या नवी मुंबईतील रबाळे भागात हा धबधबा आहे. घणसोली आणि रबाळे या दरम्यान असलेल्या औद्योगिक पट्ट्यात हा धबधबा आहे. या धबधब्यात जाण्यासाठी घणसोली स्थानकापासून रिक्षाची तसेच ठाणे व इतर परिसरातून नवी मुंबई महापालिकेच्या बसेसही उपलब्ध आहेत.

कोंडेश्वर - बदलापूर -

पावसाळ्यात निवांत स्पॉट शोधत असाल, तर बदलापूरचे कोंडेश्वर हे उत्तम ठिकाण म्हणता येईल. आजही निसर्गाची देणगी असलेल्या या ठिकाणाकडे पर्यटकांची पाठ दिसते. त्यामुळे त्या ठिकाणी जाणाऱ्या मोजक्या पर्यटकांना निवांतपणे मजा लुटता येते. या ठिकाणचा सुंदर धबधबा निसर्गाचे वरदान म्हणता येईल. ओहोळच्या किनाऱ्यावर महादेवाचे मंदिर हे कोंडेश्वराचे वैशिष्ट्य आहे. डोंगर कपारीतून वाहणारे झरे आणि धुक्याची दुलई पांघरलेले डोंगर हे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. बदलापूर रेल्वे स्थानकाहून रिक्षाने या ठिकाणी पोहोचता येते.

किल्ल्यांवर जाताना...

मुंबईच्या नजीक ठाणे, कर्जत आणि लोणावळा परिसरात अनेक गडकोट किल्ले आहेत. विसापूर, लोहगड, राजमाची, पेब, माहुली अशा सोप्या चढण असलेल्या किल्ल्यांकडे पर्यटकांसह ट्रेकर्सची पावले

वळत आहेत. सहकुटुंब चढाई करता येईल, अशी किल्ल्यांची रचना आहे. मात्र तरीही सावधानता बाळगल्यास पिकनिकचा आनंदही लुटता येईल.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com