सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> 428 >> स्टोरी
पावसाळ्यात उत्तराखंडमधील ही 5 ठिकाणं आवर्जून टाळा. निसर्गसौंदर्य भरभरून असलं तरी जीवाला धोकाही तितकाच आहे!
First Published: 15-July-2017 : 13:31:02

 

- अमृता कदम

देवभूमी उत्तराखंडला तीर्थक्षेत्रं आणि निसर्गसौंदर्य या दोन्ही गोष्टींमुळे कायमच पर्यटकांची गर्दी असते. पण उत्तराखंडला भेट द्यायची असेल तर योग्य सीझन कोणता हेदेखील माहित असणं गरजेचं आहे. नाहीतर इथल्या लहरी निसर्गामुळे पर्यटनाच्या आनंदापेक्षा आपत्तीला तोंड द्यावं लागू शकतं. विशेषत: पावसाळ्यात इथल्या काही ठिकाणी फिरायला जाणं हे धोकादायक आहे. उत्तराखंड पर्यटन विभागाकडून इथल्या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीसंदर्भात काही विशेष सूचना जाहीर केल्या जात नाहीत. आणि प्रत्यक्ष उत्तराखंडला जाऊन आलेल्या लोकांचे अनुभव आपण गांभीर्याने घेतोच असं नाही.

जास्त जोराचा पाऊस झाला तर नैनितालहून बाहेर पडण्याचे महत्त्वाचे मार्ग बंद होतात. नैनिताल-कलदुंगी आणि नैनिताल बायपास पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. प्रचंड वेगानं कोसळणारे धबधबे आणि उतारावरु न कोसळणाऱ्या दरडींमुळे या मार्गांवर अडथळे निर्माण होतात. उत्तराखंडची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच अवलंबून असल्यानं आणि चार वर्षांपूर्वी केदारनाथ प्रलयानंतर अधिकारी आणि रेस्क्यू टीम ही कायमच दक्ष असली , स्वत: मुख्यमंत्री पर्यटनस्थळांच्या सुरक्षेसंदर्भाचा आढावा घेत असले तरी पावसाळ्यात उत्तराखंडमधल्या काही ठिकाणांना भेटी देणं टाळणंच इष्ट!

चोप्टा

निसर्गसौंदर्य आणि हिमालयाचं होणारं दर्शन यांमुळे पर्यटक चोप्टाला आवर्जून भेट देतात. मात्र चोप्टाला जाणारा मार्ग हा उकीमठवरून जातो आणि पावसाळ्यामध्ये इथे भूस्खलनाचा धोका असतो.

 

वान व्हिलेज

समुद्रसपाटीपासून 8000 फूट उंचीवर वसलेलं हे छोटंसं गाव चामोली जिल्ह्यामध्ये आहे. ट्रेकिंगसाठी उत्तराखंडमध्ये येणाऱ्या ट्रेकर्ससाठी हा एक महत्त्वाचा बेस कॅम्प आहे. इथे आलीचं कुरण, रूपकुंडचा गोठलेला तलाव, बेदनीचं कुरण, होमकुंडचा ट्रेक अशी आकर्षणं आहेत. मात्र भूस्खलन, रस्ते खचणं यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पावसाळ्यात वानला भेट देण्याचा धोका न पत्करलेलाच चांगला.

 

कॉर्बेट धबधबा

गेल्या काही वर्षांपासून कॉर्बेट धबधबा उत्तराखंडमधलं महत्त्वाचं पर्यटनस्थळं म्हणून विकसित होत आहे. हा धबधबा कॉर्बेट नॅशनल पार्कच्या अगदी जवळ आहे. हे पार्क मान्सूनमध्ये बंद राहते. पण पर्यटक धबधब्याला आवर्जून भेट देतात. धुवाँधार पावसामुळे पाण्याची पातळी धोकादायक पद्धतीनं वाढत असल्यानं इथले स्थानिक मान्सूनमध्ये या धबधब्याला भेट न देण्याचाच सल्ला देतात.

द्रोणागिरी ट्रेक

यावर्षीच्या सुरूवातीलाच उत्तराखंड पर्यटन विभागानं द्रोणागिरी ट्रेकला ‘ट्रेक आॅफ द इयर’ म्हणून घोषित केलं आहे. गढवाल रांगांमध्ये वसलेला हा द्रोणागिरी पर्वत साहसाची, थ्रीलिंग अनुभवाची हौस असलेल्यांना नेहमीच खुणावतो. समुद्रसपाटीपासून या ठिकाणाची उंची 22000 फूट इतकी आहे. पण तुम्ही कितीही साहसी असला तरी द्रोणगिरीला जाण्यापूर्वी तुमच्या साहसाला आवर घाला. कारण भूस्खलन आणि पर्वतरांगातून अत्यंत वेगानं वाहणाऱ्या छोट्या-छोट्या नद्यांनी हा ट्रेक अतिशय धोकादायक ठरु शकतो.

 

धरचुला

हे गाव भारत-नेपाळ बॉर्डरला अगदी लागून आहे. पिठोरागढ जिल्ह्यात वसलेलं हे ठिकाण निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांसाठी जणू नंदनवनच आहे. पण मान्सूनमध्ये इथे भेट देणं हे जाणूनबुजून धोका पत्करण्यासारखं आहे. कारण पावसाळ्यात पिठोरागढ राष्ट्रीय महामार्ग वारंवार बंद होतो. शिवाय वाहनांवर मातीचे ढिगारे किंवा कड्यांचे अवशेष कोसळ्याचीही शक्यता असते.

 

पावसाळ्यात साहस टाळाच!

 

पावसाळ्यात हटके डेस्टिनेशन निवडून ट्रीप प्लॅन करण्याचा कल आजकाल वाढत आहे. विशेषत: तरूणाईला साहसाला आव्हान देणाऱ्या ठिकाणांना भेट देण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. मात्र आपल्या आनंदाबरोबरच स्वत:ची सुरक्षितताही महत्त्वाची असते हे लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणूनच पावसाळ्यात ट्रीप प्लॅन करताना कुठे जायचं हे नक्की करण्याबरोबरच कुठे जायचं नाही हे ठरवणंही अत्यंत आवश्यक आहे. या मान्सूनला तुम्ही वेगळ्या ठिकाणी जायचं म्हणून उत्तराखंडची निवड करत असाल तर आधी इथल्या ठिकाणांची, भौगोलिक परिस्थितीची आणि हवामानाची माहिती घेऊनच ठिकाणं निश्चित करा.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com