सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> 428 >> स्टोरी
तुमचा जोडीदार ‘डिप्रेस्ट’ आहे? मग तुम्ही त्याच्याशी कसं वागाल?
First Published: 14-July-2017 : 16:58:38

-निशांत महाजन

डिप्रेशन हा शब्द आपण सहज वापरतो. इतका सहज की हल्ली लहान मुलांनाही पटकन बोअर होतं, ते डिप्रेस्ट होतात, हर्ट होतात. आणि मग त्यावर काहीतरी थातूरमातूर चॉकलेट देऊन पालकही तो प्रश्न सोडवतात किंवा सुटला असं मानतात. पण डिप्रेशन ही रोजच्या जगण्यातली गोष्ट हाताळणं इतकं सोपं नाही. आणि त्यातही आपल्या जोडीदाराला डिप्रेशन आलं असेल तर ते समजून घेणं, त्याला काऊन्सिलरकडे नेणं, आणि मुख्य म्हणजे आपलं त्याच्याशी वागणं बदलणं, त्याच्याशी संवादाची रीत बदलणं फार महत्वाचं असतं. अनेकदा घरातल्या माणसांची चूक होते ती इथंच. डिप्रेशन आलेल्या माणसांना समजून घेण्यात अनेकदा जोडीदारच कमी पडतात.

१) मूड जातात अनेकदा डिप्रेशन आलं की, उदास होतात. काहीतरी विचित्र वागतात असं वाटू शकतं. तेव्हा न चिडता, त्याक्षणी नेमके मानसिक चढउतार काय आहेत, हे समजून घेऊन, मन आजारी आहे हे जाणून संबंधित व्यक्तीशी बोलायला हवं. आजारी काही कुणी स्वत:हून पडत नाही, आजारी असणं काही चूक नव्हे त्यामुळे दोष देणं, टीका करणं थांबवावं.

२) डॉक्टरकडे जावं. आपला जोडीदार उपचारासाठी येत नसेल तर आपण जावं, त्याला उपचारासाठी राजी कसं करायचं हे समजून घ्यावं, त्यादिशेनं प्रयत्न करावेत. डॉक्टरकडे नाही ना जायचं, मग जा उडत अशी बेफिकीर वृत्ती असू नये.

३) प्रेम थोडं जास्त करावं. खरंतर ही आपल्या प्रेमाचीच परीक्षा असते. मायेनं मनं जिंकता येतातच. मग आपल्याच माणसावर थोडं जास्त प्रेम करण्यात काही चूक नाही.

 

४) टोचून बोलू नये. आपल्या नकळतही तो आपला एक स्वभाव असतो. आपण इतरांना तिरकं, टोचून, टोमणे दिल्यागत बोलतो. तसं आपल्याला बोलायचं नसतं, पण आपणही रागाच्या भरात ते बोलतोच. म्हणून तसं करणं टाळावं.

५) भांडू नये. भांडणाचे प्रसंग येतातच. पण संयम धरावा. आणि शब्दानं शब्द वाढवण्यापेक्षा शांततेनं संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.

६) आर्थिक कटकटी होतात. पैसे कमी पडतात. त्यानं चिडचिड होते. त्यावर काही मार्ग निघतो का पहावं. त्रागा करुन, भांडून आर्थिक प्रश्न कुणाचेही सुटत नाही.

७) डिप्रेशन हा आजार बरा होतो, वेळीच त्यावर उपचार सुरु करण्याचे प्रयत्न मात्र करायला हवेत.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com