सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> व्यापार >> स्टोरी
ग्राहकांकडील मोडीचे सोने व जुन्या वाहनांवर जीएसटी नाही
First Published: 15-July-2017 : 00:03:41

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत सोन्याच्या मोडीवर लावण्यात आलेला ३ टक्के जीएसटी कर सामान्य व्यक्तींनी विकलेल्या सोन्याला लागू होणार नाही. त्याचप्रमाणे, अशा प्रकारच्या जुन्या वाहनांनाही कोणताही कर लागणार नाही, असा खुलासा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. तथापि, एखाद्या अनोंदणीकृत पुरवठादाराने नोंदणीकृत व्यावसायिकास अशा प्रकारचे मोडीचे सोने विकले असल्यास, त्यावर ३ टक्के जीएसटी लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एखादा सामान्य नागरिक जेव्हा आपल्याकडील जुने सोने विकतो, तेव्हा तो व्यवसाय करीत नसतो. त्यामुळे हे सोने व्यावसायिक पुरवठा या संज्ञेला पात्र ठरत नाही. याच कारणामुळे त्यावर कर लागणार नाही. एखाद्या नागरिकाने आपल्याकडील जुने सोने एखाद्या सराफास विकल्यास, हा व्यवहार कलम ९(४)च्या तरतुदीअंतर्गत येत नाही. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत अशा खरेदीवर सराफाला कोणताही कर भरावा लागणार नाही. हा व्यवहार जीएसटीनुसार विचारणीय असला, तरी त्यावर कर लागणार नाही कारण सामान्य नागरिक हा काही व्यवसायिक नसतो.

हेच तत्त्व जुन्या वाहनांनाही लागू होईल. जुन्या कार अथवा दुचाकी वाहनांच्या विक्रीवरही जीएसटी लागणार नाही, असे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

हसमुख अधिया यांच्या वक्तव्यानंतर सराफा बाजारात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने

खुलासा करणारे निवेदन जारी

केले आहे. सरकारच्या निवदेनानुसार, ९ (४) कलमातील तरतूद व्यावसायिकांसाठी आहे. सामान्य नागरिक हे व्यावसायिक नसतात, त्यामुळे ती त्यांना लागू नाही.

>सोने २९ हजारांच्या खाली

येथील सराफा बाजारात सोने १९0 रुपयांनी घसरून २८,८६0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. जागतिक बाजारातील नरमाई आणि स्थानिक बाजारातील कमी झालेली मागणी यामुळे सोने घसरले. चांदीही ६00 रुपयांनी घसरून ३७,४00 रुपये किलो झाली. औद्योगिक क्षेत्रातील मागणी घटल्याचा फटका चांदीला बसला. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.१0 टक्क्याने घसरून १,२१६.१0 डॉलर प्रति औंस झाले.

बुधवारी केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अधिया यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की, सराफा व्यापाऱ्याने ग्राहकांकडून जुने सोने खरेदी केल्यास, त्यावर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत ३ टक्के जीएसटी लागेल. असे व्यवहार केंद्रीय जीएसटी कायद्याच्या कलम ९(४)च्या कक्षेत येतात. या कलमानुसार एखाद्या अनोंदणीकृत पुरवठादाराने नोंदणीकृत व्यावसायिकास करपात्र वस्तू विकल्यास, त्यावरील कर नोंदणीकृत व्यावसायिकास भरावा लागतो.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com