शनिवार २४ जून २०१७

Menu

होम >> व्यापार >> स्टोरी
न्यूझीलंडमधील नोकऱ्याही कठीण
First Published: 21-April-2017 : 02:25:12

वेलिंग्टन : अमेरिका आणि आॅस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडनेही विदेशी नागरिकांसाठी नोकरीविषयक व्हिसाचे नियम कठोर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. न्यूझीलंडमधील विदेशी कर्मचाऱ्यांची संख्या सध्या सार्वकालिक उच्च पातळीवर गेली आहे. ही संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय सरकारने

जाहीर केला आहे. या निर्णयाचा भारतीय नोकरदारांना फटका बसणार आहे.

कुशल कामगारांचा व्हिसा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आॅस्ट्रेलियाने घेतला आहे, तसेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाचे नियम बदलण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंड सरकारने विदेशी नागरिकांच्या नोकऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी व्हिसा नियम कठोर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

न्यूझीलंडचे इमिग्रेशन मंत्री मायकेल वूडहाऊस यांनी सांगितले की, कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात विदेशी कर्मचाऱ्यांची भरती

केल्यामुळे स्थानिक नागरिकांना नोकऱ्या मिळणे कठीण झाले

आहे. आम्ही ‘किवीज फर्स्ट’ (न्यूझीलंडच्या नागरिकांना किवीज ही संज्ञा वापरली जाते.) या धोरणाला बांधील आहोत. त्यासाठी आम्ही कुशल कामगारांसाठीच्या व्हिसाविषयक नियमांत बदल करीत आहोत.

नव्या नियमानुसार कुशल कामगार या संज्ञेला पात्र

होण्यासाठी त्यांना न्यूझीलंडमधील (मेडन इन्कम) किमान सरासरी वेतन देणारी नोकरी मिळवावी लागेल. उच्च कुशल कामगार या संज्ञेला प्राप्त होण्यासाठी विदेशी कामगारांना किमान सरासरी वेतनाच्या १५0 टक्के वेतन देणारी नोकरी मिळवावी लागेल. या नियमांत इतरही काही बदल करण्यात आले आहेत. कमी कुशलता असलेल्या कामगारांना तीन वर्षांसाठीच व्हिसा मिळेल, या नियमाचा त्यात समावेश आहे.

वूडहाऊस म्हणाले की, नियमातील बदलामुळे विदेशी कामगारांची संख्या कमी होईल. तसेच न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या कामगारांची गुणवत्ताही सुधारेल. (वृत्तसंस्था)

इमिग्रेशन नियमांत बदल करण्याची न्यूझीलंडची ही गेल्या सहा महिन्यांतील दुसरी वेळ आहे. फेब्रुवारीतील आकडेवारीनुसार, न्यूझीलंडमधील विदेशी कामगारांची संख्या ७१,३00 आहे. न्यूझीलंंडच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत

हा आकडा १.५ टक्के आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या ४.८ दशलक्ष आहे. न्यूझीलंडमध्ये

चीन, भारत आणि ब्रिटन येथील कामगारांची

संख्या अधिक आहे. त्यातही विदेशी कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये भारतीयांचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या आसपास आहे. न्यूझीलंडमधील किमान वार्षिक सरासरी वेतन ४९ न्यूझीलंड डॉलर (३४,४00 अमेरिकी डॉलर) आहे.

आॅस्ट्रेलियाने नागरिकत्व नियमही केले कठोर

मेलबर्न : विदेशी नोकरदारांसाठीचा ४५७ व्हिसा हा कार्यक्रम गुंडाळल्यानंतर आता आॅस्ट्रेलियाने नागरिकत्वविषयक नियम कठोर केले आहेत. आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबूल यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

आॅस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज करणारा नागरिक किमान चार वर्षांपासून कायमस्वरूपी आॅस्ट्रेलियात राहत असला पाहिजे, असे बंधन नव्या नियमात घालण्यात आले आहे. आधी ही अट तीनच वर्षांची होती.याशिवाय त्याने आॅस्ट्रेलियन मूल्यांचा स्वीकार केला असला पाहिजे. अर्जदाराने आॅस्ट्रेलिन मूल्यांचा स्वीकार केला आहे की नाही, हे ठरविण्यासाठी त्याला एक इंग्रजी परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत महिला, मुले, बालविवाह, स्त्रियांचे लिंग विच्छेदन, घरगुती हिंसा याच्याशी संबंधित प्रश्न असतील, असे टर्नबूल यांनी सांगितले.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com