शनिवार २४ जून २०१७

Menu

होम >> व्यापार >> स्टोरी
अनेकांचे बँक खात्यावरील पैसे होत आहेत लंपास
First Published: 21-April-2017 : 02:19:31

चेन्नई : मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा हत्यारासारखा वापर करून एचडीएफसी बँकेच्या सात ग्राहकांचे ३.९९ लाख रुपये खात्यावरून लंपास करण्यात आले आहेत. चेन्नईतील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या तीन ग्राहकांनीही अशीच तक्रार केली आहे. या घोटाळ्यात दूरसंचार कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे.

सूत्रांनी सांगितले की, आरोपींनी सगळ्या फसवणूक प्रकरणात एकच मोडस आॅपरेंडी वापरली आहे. कर्मचाऱ्यांना फोन करून ते आपण रिझर्व्ह बँक अथवा अन्य बँकेचे अधिकारी असल्याचे सांगतात. खरेपणा वाटावा यासाठी प्रथम ते ग्राहकांना एक आॅटोमेटेड मेसेज ऐकवतात. त्यात सांगितले जाते की, ‘स्टेट बँक आॅफ इंडिया आपल्या ग्राहकांचे एटीएम पिन, अथवा सीव्हीव्ही क्रमांक विचारीत नाही, आमच्या प्रतिनिधींशी हे क्रमांक सामायिक करू नका.’ त्यानंतर आरोपी ग्राहकांना *१२१# या क्रमांकावर ई-केवायसीसाठी आधार तपशील एसएमएस करायला सांगतात. एसएमएस येताच आरोपी ब्लँक सिम कार्डचा वापर करून ग्राहकाचा मोबाइल क्रमांक पोर्ट करून घेतात. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओपीटी हस्तांतरित केली जाते, त्याप्रमाणे बँक खात्यावरील पैसा वळवून घेतला जातो.

या प्रकरणी एचडीएफसी बँकेने चेन्नईत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चेन्नईच्या सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक डी.आर. अनबरसन यांनी सांगितले की, आरोपी बनावट कागदपत्रांचा वापर करून ड्युप्लिकेट सिमकार्ड मिळवितात व खात्यावरील पैसे लंपास करतात. त्यासाठी ते आपले ओरिजनल सिमकार्ड हरवल्याचे कंपन्यांना सांगतात. मूळ सिमकार्डधारकांचा मोबाइल क्रमांक डीअ‍ॅक्टिव्हेट होतो व आपले पैसे लंपास करण्यात आल्याचे त्यांना खूप उशीर होईपर्यंत कळतच नाही.

सूत्रांनी सांगितले की, पैसे हस्तांतरित करण्यासाठी आरोपींकडे मूळ ग्राहकांचा बँक खाते क्रमांक अथवा नेट बँकिंग आयडी असणे आवश्यक आहे. तो त्यांना कुठून मिळतो, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही. काही बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बँकांच्या डस्टबीनमधील चेक अथवा पेमेंट स्लिपांमधून हा तपशील आरोपी मिळवीत असावेत. लोक या स्लिपा चुरगळवून डस्टबीनमध्ये टाकतात. अनेकदा स्लिपांवर खाते क्रमांक, पॅन क्रमांक आणि फोन क्रमांक नोंदवलेला असतो. याशिवाय नोटाबंदीच्या काळात बँकांत गर्दी झाली होती. याचा फायदा घेऊन काही तोतये आपण बँक अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना स्लिपा भरून देण्याचे काम करीत असावेत, असा संशय आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com