सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
आपण सध्या काय करतोय?
First Published: 12-July-2017 : 16:19:26

आपल्याला यशस्वी व्हायचं असतं, पण आपण सतत कारणं सांगतो.. हे नाही, म्हणून ते नाही,

आणि म्हणून अमुक जमलं नाही म्हणत स्वत:सह इतरांना फसवतो. पण जे असं करत नाहीत,

त्यांना भेटा मग कळेल, समाज आणि परिस्थितीच नाही तर नशिबालाही मात देत जिंकता कसं येतं ते..

 

आपण यशस्वी व्हावं, आपलं खूप नाव व्हावं, आपल्याला मानसन्मान मिळावा असं कुणाला वाटत नाही?
- खरं सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना वाटतं की, आपली सारी स्वप्नं सहज पूर्ण व्हावीत. आपण असं काहीतरी ‘हटके’ करून दाखवावं की दुनियेनं आपल्याला सलाम ठोकावा!
आता हे वाटणं गैर आहे का?
तर अजिबात नाही.
ते वाटलंच पाहिजे. 
उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्नंच पूर्ण होतात आणि आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. आपणच आपली प्रेरणा बनतो!
- हल्लीच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशप्रवाह काळात असे प्रेरणादायी मेसेजेसही रोज सकाळी उजाडताच आपल्याला घरपोच, फोनपोच येतात. आपण ते वाचतो, पण खरंच मोटिव्हेट होतो का?
प्रेरणा मिळणं आणि प्रेरित होऊन, झडझडून कामाला लागणं हे शब्द इतके पोकळ नसतात. नुस्ते शब्दांचे खेळ करून आपलं आयुष्यही घडवता येत नाही. त्यासाठी लागते जिद्द, आणि बंद करावी लागते कारणं द्यायची सवय.
आपण कारणं देतो की नाही?
विचारा स्वत:ला!
अनेक कारणं.
मी काय खेड्यातच राहतो, मला काय घरचे नाहीच काही करू देत, मी मुलगी आहे ना, माझ्यावरच सगळी बंधनं, मला इंग्रजी येत नाही म्हणून काही जमत नाही धड. माझी ना उंचीच कमी, माझा ना रंगच मार खातो, मला ना गणितच येत नाही चांगलं.. 
- असं कारणांचं लांबच लांब शेपूट असतं. आणि ही कारणं इतरांना सांगता सांगता आपण ती स्वत:लाही सांगू लागतो. आणि एका टप्प्यानंतर ती आपल्यालाही खरीच वाटू लागतात.
आणि मग आपल्या अपयशाला म्हणा किंवा अपेक्षित यशच न मिळण्याला म्हणा, आपण स्वत:ला नाही तर या कारणांना दोषी आणि जबाबदार धरायला लागतो..
मात्र मनाच्या एका कोपऱ्यात आपल्यालाही माहिती असतं की, ती कारणं किंवा परिस्थिती नाही तर आपणच जे हवं ते करु शकलो नाही. नाही जमलं आपल्याला आपल्याच मर्यादा आणि चौकटी तोडणं!
हे मान्य करणं अर्थातच अवघड असतं. स्वत:चा इगो गोंजारत राहतात अनेकजण, आणि इतरांकडे बोट दाखवतात.
मात्र यशस्वी होतात ती माणसं काय करतात?
त्यांच्यात असं काय असतं की जे आपल्या स्वत:च्या आणि समाजानं किंवा परिस्थितीनं अगदी नशिबानंही लादलेल्या साऱ्या मर्यादा, चौकटी, बंधनं झुगारुन देतात?
कुठून आणतात असं बळ? 
अशी पराकोटीची दुर्दम्य इच्छाशक्ती?
याच प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पान ४ आणि ५ वर जा..
तिथं भेटतील डॉ. सीमा राव.
देशातल्या पहिल्या महिला कमांडो प्रशिक्षक.
आर्मीत अजूनही जिथं महिला कमांडो नाहीत, तिथं एक महिला आर्मीवाल्यांना आणि थेट कमांडोंना कशी काय ट्रेनिंग देत असेल?
- असा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला तर डॉ. सीमा राव यांना भेटा. त्या जगण्याची आणि लढण्याची सहा सूत्रं सांगताहेत.
त्यातलं एक जरी सूत्र आपल्याला नीट आचरणात आणता आलं तरी फार झालं!
आणि तिथंच भेटेल अंकुरही.
गोव्यातल्या एका छोट्याशा गावातला हा मुलगा. वयाच्या ऐन सोळाव्या वर्षी दृष्टी गेली. पण म्हणून तो हरला नाही. नुकतंच कम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सी करून त्यानं ९५ टक्के मार्क मिळवून दाखवलेत.
त्याला कसं जमलं हे?
तेही वाचा..
आणि मग विचारा स्वत:ला, आपण सध्या काय करतोय?
 
 
- आॅक्सिजन टीम
oxygen@lokmat.com
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com