सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
साबुदाण्याची खिचडी
First Published: 12-July-2017 : 16:16:57

आज नास्त्यासाठी आज्जीच्या ‘माझ्या नतुल्यांसाठी माझ्या पाककृती’ वहीतल्या पान क्र . ९ वरची साबुदाण्याची खिचडी. 

साहित्य : एक वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट, ५-६ मिरच्या, कढीपत्ता, जिरे, तूप, मीठ, लिंबू आणि एक रात्र आधी भिजवलेले साबुदाणे. एका पातेल्यात साबुदाणे घ्या. (दोन जणांसाठी दीड वाटी पुरे.) साबुदाणे भिजून वर एक पेर उरेल एवढे पाणी घाला. एक चमचा मीठ घालून पाणी ढवळा. अर्ध्या तासानंतर पाणी काढून पातेले झाकून ठेवा. सकाळी साबुदाणे ओलसर मोकळे असतील.)

येस्स! साबुदाणे काल रात्री दुकानातून आणले तसे हातोहात भिजवून झाले आहेत. बाकी सारं साहित्यदेखील जमवलंय. पुढची कृती अगदीच सोपी दिसतेय... 

कढई तापल्यावर तीत दोन चमचे तूप घाला. तूप पुरेसे गरम झालेले दिसले की त्यात जिरे, मिरच्यांचे काप व कढीपत्ता घाला. हे मिश्रण थोडा वेळ तडतडू द्या. 

जरा जास्तच तडतडतंय का हे? - कढई काळी झाली एकदम - जास्त गरम झाली वाटतं. 

श्या: - पुढे काय?

कढई मंद आचेवर ठेवून ओले साबुदाणे टाका. दाण्याचा कूट व चवीनुसार मीठ टाका. मिश्रण नीट एकजीव करा. वरून अर्धे लिंबू पिळा. 

‘एकजीव’ म्हणजे?

साबुदाण्यांना चहूबाजूंनी समान जाडीचा कूट लागेल असे पहा. नीट कालवत राहिल्यास - लवकरच मिश्रण साबुदाण्याचा पांढरा रंग सोडून कुटाचा तपकिरी रंग धारण करेल.

हं! बाप रे, हे वाटतं तेवढं सोप्पं नाहीये. सगळंच फिरतंय कढईत! एकाग्रता हवी. दंडात शक्तीपण! एवढ्यातच हात दुखून कसं चालेल? अजूनही साबुदाणे पांढरेच आहेत. 

५ ते १० मिनिट मंद आचेवर मिश्रण परतल्यानंतर चमच्याने साबुदाणा टेचून पहा. तो दबला गेला तर खिचडी खाण्यासाठी तयार आहे. 

हो, साबुदाणा दबला तर जातोय छान. जरा चव पाहूयात. 

तसं जमलंय खरं. पण आज्जी करते तेवढी मऊ नाही लागत आहे ही खिचडी. का बरं? काही टाकायचं राहून गेलं का? 

पाहू नंतर. आत्ता हे जे आहे ते खिचडी म्हणून खाता येईल नक्कीच. भूक लागलीय कधीची!

- प्रसाद सांडभोर xprsway@gmail.com 

 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com