सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
..अब दिल्ली दूर नहीं!
First Published: 12-July-2017 : 16:15:31

 - शिवराज सुभाष सुलगुडे

लातूरहून निघालो तेव्हा भुसार मालाचं दुकान टाकायचं होतं. पण फार्मसी केलं. मग पायाला चाकं लागली. अमरावती, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, नाशिक, गुडगाव असं नोकरी नेईल तिथं गेलो. आणि मग पोहचलो यूपीएससीमार्फत थेट दिल्लीत. हे सारं होईल असं कधी वाटलंही नव्हतं..

 

मी लातूरचा. एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील जन्मलो. वाढलो. घरामध्ये कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती. भविष्यात केवळ शिक्षण हीच आपली संपत्ती असेल, या संकल्पनेतून शिक्षण घेऊन नोकरी करावी असं लहानपणापासून वाटायचं. पण नेमकं कोणतं शिक्षण, ुकिती शिकायचं, कोणती नोकरी, कोणते शहर, किती पगार याबाबत कधी विचारच केला नाही.
बारावीपर्यंत शिक्षण लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजमधून विज्ञान शाखेत पूर्ण केलं. चांगले मार्क मिळाले. पण पुढील शिक्षण न घेता लवकर पैसे कमवून कुटुंबास हातभार लावावा या उद्देशानं लातूर येथील आडत मार्केटमधे भुसार दुकान चालू करण्याचं ठरवलं. त्यानुसार चुलत भावाच्या भुसार दुकानावर काम शिकण्यासाठी जाऊ लागलो. सर्व काही सुरळीत चालू होतं. पण अचानक एके दिवशी वडिलांचे मित्र व चनबसवेश्वर फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य पोस्ते सरांच्या सल्ल्यानुसार फार्मसी डिप्लोमाला प्रवेश घेतला. त्यावेळेस ठरवलं की आता या संधीचं सोनं करायचं. नाहीतर परत भुसार दुकान चालवावं लागेल. त्याच भीतीपोटी चांगला अभ्यास केला. ८३ टक्के गुण प्राप्त करून पुढील पदवी शिक्षणासाठी शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय अमरावती इथं प्रवेश मिळवला. घरातून निघताना डोळ्यांमध्ये अश्रू होते, परंतु ते आई-वडिलांपासून लपवण्याइतपत शहाणपण आलं होतं. अमरावतीला आलो. शहर तसं स्वच्छ, सुंदर. मले, तुले, काय लेका यांसारखे शब्द आपुलकीचे वाटायला लागले. जिवाला जीव देणारे मित्रही याच शहराने दिले. रंगारकर काका- काकूंच्या स्वरूपात आईवडिलांसारखे घरमालकही मिळाले. पण तरीही भुसार दुकानाची भीती मनात होतीच. अभ्यास जोरात करत होतो. अमरावती विद्यापीठात द्वितीय क्रमांक व गेट परीक्षेत भारतामधे ४१ वा क्रमांक मिळवून मुंबईच्या इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर (एम.फार्म.)साठी प्रवेश मिळवला.
मुंबईत आलो. ती गर्दी, ती लोकल, ते धावणं कसं जमणार याची काळजी होती. परंतु कॉलेजच्या आवारात असलेल्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाल्यामुळे गर्दी आणि लोकल यांची ओळख काही फारशी झालीच नाही. मात्र या शहरानं एक आत्मविश्वास दिला. भुसार दुकानी जाण्याची भीती जणू काही पळूनच गेली होती. पुढे कॉलेज कॅम्पस प्लेसमेंटमधून मायलन नावाच्या प्रसिद्ध औषध कंपनीमधे हैदराबाद येथे नोकरी मिळाली.
हैदराबादला गेलो. रोजच्या नास्त्यामधील पोहे, उपमा यांची जागा इडली डोसा, उत्तप्पा-सांबरने घेतली. भाकरी-पोळीची जाग लेमन राइस, फ्राइड राइस, कर्ड राइस, मसालेदार रस्सम व चटण्यांनी घेतली. आई व वहिनीच्या हातचं न मिळणारं जेवण आपण परराज्यात असल्याची जणू जाणीव करून देत असे. कराची बिस्किटं, सिने अभिनेत्यांची मोठी मोठी बॅनर, हुसैनसागर तलाव, लूंबिनी पार्क, रामोजी फिल्मसिटी, चारमिनार, गोवलकोंडा किल्ला पाहत हैदराबादशी ओळख झाली. पण लवकरच माझी बदली नाशिकला झाली. परत महाराष्ट्रात येण्याचा आनंद काही वेगळाच होता. पण हा आनंद काही जास्त काळ टिकू शकला नाही.
हरियाणातील गुडगाव येथील रेनबॅक्सी कंपनीमधे मी रुजू झालो. परराज्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला. यावेळी मात्र खऱ्या अर्थानं परराज्यात आल्याची भावना वाटू लागली. परंतु जय-वीरूसारखी मैत्री जपणारे मित्र हे चित्रपटाच्या दुनियेबाहेर वास्तविक जीवनात पण असतात हे मला गुडगावनं दाखवून दिलं. लहानपणी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणारे पंतप्रधान टीव्हीवर बऱ्याच वेळेस पाहिले होते, पण प्रत्यक्षात तेच भाषण पाहताना डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. 
मात्र करिअरचा वेध घेत पुन्हा गुडगाववरून बेंगळुरूला गेलो. जीवनाच्या याच वळणावर पुढील प्रवासात साथ देण्यासाठी हवी असणारी जोडीदार मिळाली. आपला मुलगा ‘सरकारी अधिकारी’ व्हावा अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. सुदैवानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील (सीडीएससीओ) मध्ये औषध निरीक्षक या पदासाठी यूपीएससीमार्फत माझी निवड झाली.
आणि मी पोहचलो राजधानी दिल्लीत.
दिल्ली मुख्यालयात सध्या कार्यरत आहे.
भुसार दुकानात काम करत असताना कधी स्वप्नातसुद्धा विचार आला नाही की आपल्या आयुष्याचा पुढील प्रवास हा इतका रोमांचक व उज्ज्वल असेल. केवळ मिळालेली संधी व परिश्रम यांची सांगड घालून मिळालेलं हे यश आहे. या यशाच्या पायाभरणीत माझी आई, वडील, बायको, भाऊ, बहीण, वहिनी, नातेवाईक, मित्रपरिवार या साऱ्यांची सोबत होती म्हणून हे सारं जमलं. या सगळ्या प्रवासात मी विविध राज्य फिरलो आणि विविध लोकांच्या सहवासात आलो. देशाची ओळख झाली..
आणि पुढचा प्रवास प्रत्येकवेळी नव्यानं सुरूच राहिला.
 
 
( लेखकाचे मूळ गाव लातूर, सध्या औषध निरीक्षक, एफडीए भवन, नवी दिल्ली येथे कार्यरत)
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com