सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
... मना, ऐक ना!
First Published: 12-July-2017 : 16:10:00

 

- प्राची पाठक

 डीताप आला किंवा रस्त्यात पाय घसरून पडलो तर आपण किती सहज डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो. तेव्हा विचार करतो का, लोक काय म्हणतील, मला हसतील का, गॉसिप करतील का? नाही ना? मग मनाला काही दुखलं, मन हळवं झालं, कुणाशी तरी बोलायला हवं, ऐकणारा एखादा सुरक्षित कान मिळायला हवा असं वाटत असेल तर मनाच्या डॉक्टरकडे का जात नाही?

 

‘समुपदेशकाकडे जा’ असं हल्ली अनेकदा वरचेवर सांगण्यात येतं. वाचण्यात येतं. अनेक लोक बोलू लागले की समुपदेशकाकडे किंवा मनाच्या डॉक्टरकडे गेलात म्हणजे काही कोणी लगेच वेडा ठरत नसतो. पूर्वी जितके गूढ वलय याभोवती होते, तितके आता राहिलेले दिसत नाही. अनेक जण अगदी सहज सांगतातदेखील की मला समुपदेशकाकडे म्हणजेच कौन्सिलरकडे जावं लागलं. काही जण काही काळ सायकॅट्रिस्टच्या सल्ल्यानुसार काही औषधंसुद्धा घेतात. त्याहीविषयी मनमोकळं, खुलेपणानं बोलतात. असं केलं म्हणजे ते काही ‘डोक्यावर पडलेले’ नसतात. मुळात, कुणालाही अशा प्रकारे हिणवताना, लेबल लावताना विचार केला जायला हवा. ती संवेदनशीलता न बाळगता गॉसिप करणाऱ्या लोकांच्याच समजुतीबद्दल प्रश्न उभे राहतात.

आपल्याला आपल्या आयुष्यात काही गोष्टी असह्य होत आहेत आणि त्याबद्दल आपल्याला मदत घेणं गरजेचं आहे, कुठेतरी सुरक्षित कान मिळणं गरजेचं आहे हे समजून तसं करायला न लाजणारे, न घाबरणारे लोक आजूबाजूला वाढत आहेत.
कोणी कुणाला केवळ समुपदेशकाकडे गेला म्हणून वेडा ठरवत असेल, तर विरोध करणारे समंजस लोकदेखील आहेत. सायकॅट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट यातला फरकदेखील वरचेवर माहीत असतो आता लोकांना. तरीही आपल्यावर, आपल्या आजूबाजूला कुणावर वेळ आली की आपण घाबरतोच. ‘नकोच बाबा तो शिक्का’ असा आपला स्टॅण्ड असतो. तो पर्याय सोडून काहीही ट्राय करायला आपण तयार होतो.
अगदी आॅनलाइन टेस्ट देतो. लपून छपून किंवा उघड भविष्य वगैरे वाचू लागतो. ‘सगळं कसं छान होणार आहे’, असा आधार आपण कुठेतरी शोधत राहतो. कुणी बाबा-बुवा ट्राय करतात. तरुण मुलं अचानक खूप भाविक होतात. देवदर्शनाला पायी जाऊ लागतात. उपास तापास सुरू करतात. स्वत:ची पत्रिका घेऊन फिरतात. कुठेतरी नादी लागतात. कुणात मैत्री शोधतात. कोणाला तरी आयडॉल करतात. वरवर आधार देणाऱ्या व्यक्तीला आपलं सर्वस्व मानू लागतात. तसा आधार किंवा ऐकून घेणारा कान घरात मिळत नसेल, तर घरातल्यांचा रागराग करतात.
कुठेतरी निघून जावंसं वाटणं, कोणीच समजून घेत नाहीत असं वाटणं, जगावंसं न वाटणं, मी आता माझ्या जिवाचं काहीतरी करून घेईन अशा धमकीवजा सूचना कराव्याश्या वाटणं, इतकं प्रेशर आहे की मी फुटून जाईन अशी भावना, खूप टेन्शन आहे असं वाटणं, एकटेपणा जाणवणं, झोप उडणं किंवा खूप झोपणं, भूक कमी-जास्त होणं या आणि अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. त्यांचं गांभीर्य आपल्याला कळेलच असं नाही. नेमकं हे का आणि काय होतं तेही समजेलच असं नाही. कदाचित ही केवळ समुपदेशन करून बदलणारी लक्षणं नसतीलदेखील. दृष्टिकोन बदलला, समस्यांविषयी योग्य व्यक्तीकडे बोलले तर मार्ग दिसू लागतात. पण काय, कसं, कोणी आणि केव्हा हेही आपल्याला नीटसं माहीत नसतं. आणि म्हणूनच अशा प्रसंगात टाळाटाळ न करता समुपदेशकाकडे लगेच जायला हवं. 
मनाचा अलार्म वाजलेला असतो तेव्हा त्याला आधार हवा असतो. डागडुजी हवी असते. ब्रेक हवा असतो. ती फट वाढायच्या आत सांधली गेली पाहिजे. शरीर थकलं तर आपण आराम करतो. झोप काढतो. मस्त गरम पाण्यानं अंघोळ करतो. ताजेतवाने होतो. शरीराची स्वच्छतादेखील आपण राखत असतो. त्याला सजवतो. भारीतले कपडे, गॉगल, शूज, महागडी घड्याळं असं सगळं वापरतो. आवडीचे पदार्थ खातो. खिलवतो. 
पण मन प्रसन्न राहण्यासाठी आपण काय करतो? विचारणार का हा प्रश्न स्वत:ला?
मनाची आणि शरीराची दुखणी वेगवेगळी असतात. पण तरीही मनाच्या डॉक्टरकडे, समुपदेशकाकडे, कौन्सिलरकडे जाणंही अगदी सर्दीताप आल्यावर डॉक्टरकडे जातो तितकंच सोपं असायला हवं. 
रस्त्यात आपण कुठे धडपडतो. हाता-पायाला दुखापती करून घेतो. त्याच्या गांभीर्यानुसार चटकन जवळचा डॉक्टर गाठतोच की नाही? की हाता-पायाचे सौंदर्य कसं राखावं असे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला ‘कर रे बाबा मला मदत, मला अपघात झालाय रस्त्यात’ असे लिहून उत्तराची वाट बघत बसतो? बरे, असे पुस्तक लिहिणारी व्यक्ती डॉक्टर असेलदेखील, पण त्याला तुम्हाला मदत करणं शक्य असेल असं नाही. अंतर खूप जास्त असेल. तो प्रॅक्टिस न करणारा तज्ज्ञ असेल. अशावेळी आपल्याला चटकन आपल्या परिसरात कोण मदत करू शकेल, असा विचार करू की नाही आपण?
तसंच हे सारं.
मनाला दुखतंय. बरं नाही. मानसोपचारतज्ज्ञाकडे जा, कौन्सिलरला भेटा. मनावर उपचार करून घ्या. त्यात काही अवघड नाही!!
 
हेल्पलाइन आहे का?
कौन्सिलरकडे जायचं, पण त्याचवेळी योग्य समुपदेशक कौन्सिलर निवडणं हेदेखील महत्त्वाचंच आहे. पण आपल्या गरजेनुसार आणि इमर्जन्सीनुसार आपल्याकडे असलेले पर्याय निवडून तातडीचे निर्णय घेणंही आवश्यकच असते. थांबून राहू नका. कोणीतरी मदत करेल, असे खोळंबून बसू नका.
समुपदेशकाकडे जाणे टाळू नका. आपण आपल्या आयुष्याची स्टोरी केवळ आपल्या दृष्टीने लिहिणार आणि त्यावर फक्त ती वाचून कोणी रेडिमेड उत्तरे देणार, चटकन आपले प्रश्न सुटणार असंही होत नसतं. 
प्रश्नांचा गुंता नीट समजून घ्यावा लागतो. मला कोणीच नाही मदतीला, असं असहायदेखील वाटून घेऊ नका.
हेल्पलाइन नंबर्स जवळ असू द्या.
आपण फेसबुक-ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप एकूणच इंटरनेट वापरात आघाडीवर असतो. आणि अशी हेल्पलाइन शोधायची वेळ आली, तर मला काहीच माहीत नाही, माझ्या घराजवळ काही नाही, माझ्याकडे नेट नाही, मला घरातून बोलता येणार नाही ही आणि अशी सर्व उत्तरे तयार ठेवतो. 
कोणी एखाद्या हॉस्पिटलची किंवा संस्थेची हेल्पलाइन सुविधा अगदी हातात आणून दिली तरी आपण हजार प्रश्न त्यात उभे करतो. प्रश्न पडणे ही छानच गोष्ट आहे. त्याबद्दल माहितीदेखील मिळविता येते. पण आधी तशी धडपड करायची तयारी असावी लागते.
 

prachi333@hotmail.com ( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com