सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
काणकोणचा अंकुर
First Published: 12-July-2017 : 16:02:45
Last Updated at: 12-July-2017 : 16:12:48

 

वयाच्या १५-१६ व्या वर्षी  त्याला कमी दिसू लागलं. उपचार झाले,  पण तरीही १८-१९ वर्षांचा होता होता त्याची दृष्टी गेली. पण म्हणून तो हरला नाही. त्यानं जिद्दीनं शिक्षण पूर्ण केलं आणि नुकताच 

तो बीएस्सी कम्प्युटर सायन्स ९५ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालाय. त्याची ही गोष्ट.

 

उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला गेले होते. लोकल टीव्हीवरील एका बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं. अंकुर काणकोणकर नावाच्या एका दृष्टी गमावलेल्या मुलाने बी.एस्सी. (फायनल) मध्ये ९४.५ टक्के मार्क्स मिळवले होते. त्याचं हे यश श्रेष्ठ आणि नजरेत भरणारं असल्यानं त्याचं कौतुक करावं या उद्देशानं मी त्याला भेटायला गेले. 
कर्नाटक बॉर्डरजवळ असलेल्या काणकोण येथील त्याच्या घरी मी पोहचले. गप्पांच्या ओघात मिळालेली माहिती अशी की, अंकुर हे त्याच्या आई-वडिलांचं एकुलतं एक व उतरत्या वयात झालेलं अपत्य. दोघं सरकारी नोकरीत. परिस्थिती मध्यमवर्गीय. अभ्यास, खेळ सगळ्यात अंकुर हुशार. मात्र १५-१६ वर्षांचा असताना अंकुरला रात्री कमी दिसू लागलं. त्याच्या आजाराची ही सुरुवात होती. आई- वडिलांनी अजिबात दुर्लक्ष न करता त्याला शंकर नेत्रालय चेन्नई, एल. के. प्रसाद हॉस्पिटल हैदराबाद, पुण्यातील प्रसिद्ध वैद्य, बडोदा येथील एका हॉस्पिटलमध्ये असे अनेक उपचार केले. आपला मुलगा बरा व्हावा या आशेनं सारे उपाय करून पाहिले.
इकडे शिक्षणही सुरू होतं. दहावीत त्याला स्वबळावर ८५ टक्के मार्क मिळाले. त्याच्या आवडीनुसार त्यानं अकरावीत सायन्स घेतलं. बारावीला तो फर्स्ट क्लास मिळवून पास झाला. फोंडा येथे फार्मसीला अ‍ॅडमिशन घेतली. नवीन जागा, नवीन मित्र, नवीन विषय ह्यात तो रमतो न रमतो तोच त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्याची दृष्टी पूर्णपणे गेली. पण आपल्या रिटायर्ड आईवडिलांना ही गोष्ट कळून दु:ख होऊ नये म्हणून तो धडपडत होता. सगळं येत असूनही काय लिहितोय आणि कुठे लिहितोय हे त्याला दिसत नव्हतं. परिणामी तो फार्मसीच्या दुसऱ्या वर्षी नापास झाला.
सगळ्यांसाठी ही गोष्ट धक्का देणारी होती. आई-वडिलांनी आपल्या आयुष्यातील बरीचशी पुंजी खर्च केली. मात्र सध्यातरी भारतात त्याच्या आजारावर काही इलाज नाही असं कळलं. ते दोघे खूप हताश झाले. अंकुरही डिप्रेशनमध्ये गेला. अशाच हताश अवस्थेत २-३ वर्षं गेली. अंकुरचं शिक्षण पूर्णपणे थांबलं होेतं. आता पुढचं आयुष्य अंधकारमय आहे असं वाटत असतानाच नेट सर्फिंग करताना त्याला दिल्लीतील एका अंध मुलाबद्दल कळलं. कार्तिक सोहनी त्याचं नाव. अंध असूनही त्यानं सीबीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. तो करू शकतो तर मी का नाही असं वाटून आता अंकुर जिद्दीला पेटला.
खेड्यात राहत असूनही व शहरातील सुविधा नसूनही त्याने बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स करायचं ठरवलं. त्याला मडगाव येथील चौगुले कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यायची होती. सुरुवातीला प्राचार्य त्याला अ‍ॅडमिशन द्यायला तयार नव्हते. जिद्दीला पेटलेला अंकुर पणजी येथे युनिव्हर्सिटीमध्ये व्हाइस चॅन्सलरना भेटला. अपंगांकरिता असलेल्या सवलती व नियम त्याने वेबसाइटवर जाऊन, दाखवून पटवून दिले. त्यानंतर त्याला चौगुले कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मान्य करण्यात आली. आता पुन्हा प्रश्न आला. बी.एस्सी. (कॉम्प्युटर) करायचं तर बारावीला मॅथ्स कम्पलसरी होतं. फार्मसी करायचं म्हणून त्यानं मॅथ्स सोडलं होतं. मॅथ्स आवडतंही नव्हतं फार. त्याला मॅथ्स शिकवण्यासाठी शिक्षकही मिळेना. आई प्रमिलानं यातून मार्ग काढला. ती घरातील सर्व कामे आटोपून अंकुरचा अभ्यास घेऊ लागली. त्याला वाचून दाखवणं, सूत्र पाठ करवून घेणं सुरू झालं. अंकुर मॅथ्स व कॉम्प्युटर सायन्स घेऊन पुन्हा एकदा बारावी परीक्षा पास झाला.
बारावीपर्यंत म्हणजे आता परत अकरावी व बारावी त्याने राइटर घेतला. त्यानंतरची तीनही वर्षे (सहा सेमिस्टर) त्यानं एनव्हीडीए (नॉन व्हिजुएल डेस्कस टॉप अ‍ॅसेस) हे सॉफ्टवेअर वापरून पेपर लिहिले, जे तो स्वत:च वापरून शिकला. बी.एस्सी.ला त्याने ९५.५ टक्के मार्क्स मिळवले. जे कॉलेज त्याला अ‍ॅडमिशन नाकारत होते त्याच कॉलेजसाठी आता अंकुर अभिमान/शान ठरला आहे. आता त्यानं मनाने खूप उभारी धरली आहे. आई-वडील, कुटुंब, त्याचा गाव आणि संपूर्ण गोवा ह्यांना त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. त्याचे सतत कुठेतरी सत्कार होत असतात. पण मी विशेष काही केलं नाही, असं त्याचं म्हणणं आहे.
आता अंकुरला इथेच थांबायचं नाहीय. त्याला मास्टर्स करायचं आहे. त्यानंतर डॉक्टरेट मिळवायची आहे. आपल्यासारख्या मुलांसाठी काम करायचे आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करायचे आहे. दृष्टी नाही म्हणून मागे न राहता त्यांनीही समाजात ताठ मानेनं वावरावं असं त्याला वाटतं. त्याला शिकवण्याची खास खुबी आहे. आपल्या डोळस मित्रांनाही तो अभ्यासात मदत करतो. मित्रही त्याला योग्य ती साथ देतात. आपल्याबरोबर फिरायला, सिनेमाला, हॉटेलमध्ये, पिकनिकला घेऊन जातात. तोही आताच्या पिढीसारखा कम्प्युटर व मोबाइलवेडा आहे. 
मस्त जगतो आहे. जे आयुष्य समोर आहे, त्यात आनंदानं नवे रंग भरतो आहे. अंकुरकडून हे जिद्दीचे रंग अगदी शिकण्यासारखेच आहेत.
 
- आरती नाडकर्णी
ratinadkarni@gmail.com
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com