सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
लढायचं!
First Published: 12-July-2017 : 15:59:38

भारतात अजून महिला कमांडो नाहीत;पण कमांडोंना प्रशिक्षण मात्र एक महिला देते. आपल्या क्षमता कुठल्याच मर्यादांच्या चौकटीत न कोंबता अखंड मेहनत, जिद्द आणि कठोर शारीरिक-मानसिक फिटनेस यांच्या जोरावर थेट आर्मीला ट्रेनिंग देण्याचं बळ कमावणाऱ्या एका जिद्दीची गोष्ट.

 

देशासाठी काही करायचं असेल तर त्यासाठी सीमेवर जाऊन लढावं लागतं असं नाही. आणि देशभक्ती म्हणजे क्रिकेट मॅचेसच्या वेळेस उफाळून येणारी भावनाही नाही. आपल्यात जे काही कौशल्य आहे त्याचा वापर देशासाठी करणं यातूनही देशसेवा घडू शकते. आणि त्यालाही देशभक्तीच म्हणतात.
डॉ. सीमा राव गेल्या २० वर्षांपासून हेच करत आहेत. त्या भारतातील पहिल्या महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. आजपर्यंत भारतीय लष्करातल्या एनएसजी ब्लॅक कॅट्स, मार्कोस, गरुड, पॅराकमांडोज, बीएसएफ, आर्मीचे लढाऊ प्रशिक्षण वर्ग आणि कमांडो विंग्ज मिळून १५,००० सैनिकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. वर्षातले आठ महिने डॉ. सीमा राव अशा प्रशिक्षणांसाठी सैनिक, कमांडोज यांच्यासोबत कधी जंगलात, तर कधी डोंगरावर, कधी भाजून काढणाऱ्या उन्हात, तर कधी हातात शस्त्रही धरता येत नाही अशा गोठवणाऱ्या थंडीत प्रशिक्षण देण्यासाठी तयार असतात. 
हे सारं प्रशिक्षण एकप्रकारचं मानसिक ट्रेनिंगही असतं. मनाच्या कणखरपणाचं, निर्णयक्षमतेचं आणि प्रसंगावधानाचंही. डॉ. सीमा राव जगण्याचंही हेच सूत्र मांडतात. वयाच्या १६ व्या वर्षापासून स्वत:च्या संदर्भातही हेच सूत्र अंमलात आणून त्यांनी आपल्या मनातली भीती, संकोच, द्विधावस्था यावर मात केली. आणि महिला कमांडो प्रशिक्षक होण्याचं एक ध्येय गाठलं. 
अलीकडेच नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या भेटल्या. तेव्हा कळत गेली एका कमांडोचीच मानसिकता. खरंतर इतर कोणाही तरुण-तरुणींसारखं त्यांचं आयुष्य होतं. मात्र स्वत:च्या बळावर आणि हिमतीवर त्यांनी ‘विकनेस टू स्टे्रन्थ’ हा प्रवास केला. या प्रवासात त्यांची जगण्याची आणि आवाहनांना तोंड देण्याची सूत्रं पक्की होत गेली. रायफल शूटिंग प्रशिक्षणात त्यांनी ‘डॉ. राव सिस्टिम आॅफ रिफ्लेक्स फायर’ (जलद गतीनं फायरिंग करणं) नावाची स्टाइल डेव्हलप केली. तसंच जगण्याला प्रेरणा देतील अशी काही सूत्रंही त्या सांगतात. ठरवलं तर कुणाही सामान्य माणसाचा प्रवास असामान्य होऊ शकतो हे वाक्य एरवी पुस्तकी वाटतं. पण त्याचा खरा अर्थ काय, हे डॉ. सीमा यांना भेटलं की उलगडतं. म्हणूनच त्यांनी सांगितलेली ही सहा सूत्र त्यांच्याच शब्दात. विकनेस टू स्टे्रन्थचा हा प्रवास त्यांनी कसा केला, हे समजून घेत काही गोष्टीही शिकता येतील.. 
१. पटत नाही? - पेटून उठा
 
शाळेत पाचवी-सहावीत असताना सीनिअर मुलं मुली चिडवायचे, बळजबरीनं डबा हिसकावून खायचे. खूप अपमान झाल्यासारखं वाटायचं. मग एके दिवशी ठरवलं, विरोध करायचा. जसं ठरवलं तसं वागले. मला हे आवडत नाही हे ठामपणे सांगून टाकलं. मग नाही झाली हिंमत कोणाची रॅगिंग करण्याची. पटत नाही त्याला ‘नाही’ म्हणण्याची भीड चेपली.
पण आपल्या मनातल्या भीतीला हात घालणारे प्रसंग फक्त शाळा-कॉलेजात, रस्त्यावर एकटं दुकटं असतानाच येतात असं नाही. सोबत खंबीर पुरुष असतानाही येतात. एकदा नवऱ्यासोबत मुंबई समुद्रकिनाऱ्यावर मार्शल आर्टचं टे्रनिंग करत होते. तीन-चार जणांची टवाळ टोळी माझ्यावर नको त्या कमेंट करत होती. पण आम्ही टे्रनिंग थांबवलं नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आमचं काम करत राहिलो. टे्रनिंग संपल्यानंतर घरी जायला निघालो तर ते टोळकं रस्त्यात हजर. नवरा माझ्याजवळ येऊन म्हणाला की, ‘तुला जे शिकवलं ते वापरून बघण्याची वेळ आली आहे. मी घरी जातो, तू निपटून घरी ये.’ असं म्हणून तो सरळ घरी निघून गेला. मी घाबरले होते. तरी मी सरळ जाण्याचं ठरवलं. पण तिघांपैकी एक सरळ समोर आला. मी खालची मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं. तेव्हा त्याच्या डोळ्यातले ते भाव आणि त्याची बॉडी लॅँग्वेज माझ्यासाठी इतकी अपमानजनक होती की मी मनातून पेटून उठले आणि सरळ त्याच्या एक कानफटात मारली. दुसऱ्यानं सरळ माझ्यावर चाकू उगारला. मग मी शिकलेली मार्शल आर्ट सोबत होतीच. तोपर्यंत लोकं जमले आणि ते तिघे शेपूट घालून पळाले. स्वत:च्या मनातल्या भीतीशी, संकोचाशी स्वत:चं लढायचं असतं हे त्या दिवशी शिकले.
भीती, संकोच फक्त माणसांबद्दल असतो असं नाही, तर शिकण्याच्या, स्वत:ला आजमावून बघण्याच्या टप्प्यातही मनातली ही भीती, संकोच नवं काही शिकण्यापासून रोखू शकते. मी आणि नवरा आम्ही दोघं शूटिंगचं प्रशिक्षण घेत होतो. प्रशिक्षण संपलं. आम्ही निवांत सफरचंद खात बसलो होतो. नवऱ्यानं अचानक सफरचंद स्वत:च्या डोक्यावर ठेवून मला बंदूक रोखून नेम धरायला सांगितला. ‘हा कसला जोक’ म्हणून त्याला टाळू पाहत होते. पण त्यानं सांगितले की, ‘मोठी शूटर आहेस ना, मग हे आव्हान स्वीकार.’ थोडं थांबले. एक मन म्हणत होतं नाही आणि एक म्हणत होतं कर. मी दुसऱ्या मनाचं ऐकलं आणि नेम धरला. एकाच नेमात सफरचंदाचे तुकडे तुकडे झाले. मला इतका आनंद झाला की मी त्याला दुसरा सफरचंद डोक्यावर ठेवायला सांगितला. रिफ्लेक्स शूटिंगचं तंत्र विकसित करण्याचं बीज त्या भीतीनंतर माझ्यात रोवलं गेलं. 
एक वेळ होती जेव्हा मी पंधरा-वीस फुटावरून उडी मारायला घाबरत होते. पण ठरवलं की घ्यायची उडी. ती दहा-पंधरा फूट उंचावरच्या उडीनं मला दहा हजार फुटावरून उडी घेण्याचं बळ दिलं. 
आपल्यातले विकनेस, आपले कच्चे दुवे आपल्याला माहीत असतात. पण ते पटत नसतात. त्यापलीकडे जाऊन काही करण्याची आपल्यातली शक्ती आपण आजमावूनच पाहत नाही. आधी स्वत:तलं न पटणारं उपटून टाकण्यासाठी पेटून उठलं तर आव्हान व्यक्ती, परिस्थिती कोणत्याही रूपातलं असो, ते पार करता येतं. 
 
२. स्पष्ट बोला, करून दाखवा
लोकलज्जा, टीकाटिप्पणी, खोचक प्रश्न ही अप्रत्यक्ष बंधनं आहेत जी आपल्याला बांधून ठेवतात. काही करू देत नाही की बोलू देत नाही. पण या टप्प्यावर आपले विचार पक्के असतील तर उत्तरं ठाम होतात आणि उत्तरं ठाम असतील तर मग मिळणारी प्रतिक्रिया सकारात्मकच असते. मी मार्शल आर्ट शिकले. मला ब्रूस ली ची जीत कोन दो नावाची आर्ट शिकायची इच्छा होती. मी आतापर्यंत मार्शल आर्टमधलं कमावलेल्या कौशल्याबद्दल लिहून ही ब्रूस ली आर्ट शिकण्याची इच्छा मेलद्वारे ब्रूस लीकडे व्यक्त केली. त्यांनीही तयारी दाखवली. मला चीनला बोलावलं. मी इकडे पैशांची जुळवाजुळव केली. कागदपत्रांची जुळवाजुळव केली. व्हिसाची कागदपत्रं सज्ज होती. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळेस मला तिथल्या चिनी अधिकाऱ्यानं खोचकपणे विचारलं की तुम्ही तुमचा देश सोडून चीनमध्येच स्थायिक होणार नाही याची कारणं द्या. माझ्या मनातल्या देशाभिमानालाच त्या माणसानं हात घातला. मी सरळ त्याला विचारलं की, मी माझा देश सोडून चीनमध्ये स्थायिक होण्याची तुम्हाला कोणती कारणं वाटतात? तो अधिकारी निरुत्तर झाला. आणि त्यानं व्हिसा नाकारला. मी ब्रूस लीला प्रशिक्षणासाठी येऊ शकत नसल्याचं कळवलं. पण शिकण्याची इच्छाही स्पष्टपणे कळवली. तेव्हा जीत कोन दोचं प्रशिक्षण आणि सर्टिफिकेट देण्यासाठी दहा दिवस ब्रूस ली भारतात आले. आणि मी शिकले. माझ्या त्या स्पष्ट उत्तरानं मी माझा देशाभिमान जपला आणि शिकण्याच्या तीव्र इच्छेनं मला जे हवं होतं ते मी शिकले. अपमानाला स्पष्ट उत्तर हाच मार्ग आहे. नाहीतर अपमानानं आपण आपल्यालाच थांबवतो. त्यापेक्षा स्पष्ट उत्तर देऊन अपमान थांबवणं हा प्रगतीचा उत्तम मार्ग आहे. 
स्पष्ट बोलण्याप्रमाणे कृती करून समोरच्याला उत्तर देणं हेही गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्हाला खरंच काही येतं का हे नुसतं शब्दांतून सांगताच येत नाही. प्रत्यक्ष कृती ही एकच गोष्ट हजार शब्दांचं काम करते आणि आपल्यासाठीचा आदर खेचून आणते. कमांडो प्रशिक्षक या क्षेत्रात प्रचंड शारीरिक क्षमता आणि युद्धकौशल्याची गरज असते. आणि म्हणूनच या क्षेत्रात आतापर्यंत पुरुषांचा दबदबा आहे. अजूनही आपल्या देशात महिला कमांडो नाहीत. एक कमांडो प्रशिक्षक म्हणून मी जेव्हा सैनिकांना प्रशिक्षण देत असते तेव्हा अनेकांना ‘हे काय, आपल्याला एक बाई शिकवते. हिला प्रत्यक्षात येतं की फक्त सांगताच येतं’ अशा प्रतिक्रियाप्रशिक्षणादरम्यान माझ्याही वाट्याला आल्या. तेव्हा मी प्रशिक्षणार्थींसाठी जे अवघड अशक्य वाटणारे टास्क डिझाइन करायचे तेव्हा त्यांना शिकवण्याआधी ते मी प्रत्यक्षात करून दाखवायचे. तेव्हा त्यांचा माझ्यावर, माझ्या कौशल्यावर विश्वास बसला आणि माझ्याप्रतीचा आदरही निर्माण झाला. त्यामुळे नुसतं बोलून सांगून आपल्यातली क्षमता जगाला दिसत नाही त्यासाठी कृती करणं, करून दाखवणं हाच एक पर्याय आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात असं नुसतं बोलू नका आधी करून दाखवा. जग तुमचा आणि तुमच्या स्किलचा नक्कीच आदर करेल. 
 
३. मनाची दारं सताड उघडा
शिकायचं असेल, काही करून दाखवायचं असेल तर मनाची दारं बंद करून चालत नाही. ओपन माइंडेड असाल तर जास्त शिकाल, पुढे जाल. मी आणि माझ्या नवऱ्यानं अनार्म क्लोज बॅटलमधलं युद्धकौशल्य विकसित केलं. आमचा यात हातखंडा असला तरी आम्ही इथंच थांबलो नाही. यापुढे जाऊन नवीन काही शिकण्यासाठी स्वत:ला कायम तयार ठेवलं. त्यामुळे शूटिंग, फायर फायटिंग, पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग हे प्रत्येक प्रकार शिकले आणि त्यात स्वत:ला सिद्ध करू शकले. आपलं रोजचं जगणं आपल्याला सतत नवीन शिकण्याची संधी देतं. भलेही तुम्ही एखाद्या विषयात मास्टर असा पण म्हणून तुमचं शिकणं तिथेच थांबवू नका. त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नवीन काही शिकलं तर नवीन संधी आपल्यापर्यंत चालत येतात. एकाच गोष्टीला चिकटून राहिलं तर जे आहे त्यात नवं काही करण्याची आपली क्षमता आपल्या हातानं मारून टाकतो. आज जगात सर्वत्र आणि सर्वच क्षेत्रात तुम्ही नवं काय शिकता आहात, नवं काय करता आहात या गोष्टींना खूप महत्त्व आहे आणि त्यालाच वाव आहे. मग नवीन शिकण्यासाठी स्वत:ला थांबवायचं कशाला?
 
४. अडथळे? येणारच!
आपल्या चालू कामात अनेकदा अनेक अडथळे येतात. कामात काय जगतानाही येतात. हे अडथळ्यांचे प्रसंगच असे असतात जिथे तुम्ही तुमच्या ध्येयावर किती ठाम आहात हे तपासता येतं. अडथळ्यांच्या काळात ध्येयातला ठामपणा राखला तर कोणताही अडथळा आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवत नाही. 
एकदा प्रशिक्षणादरम्यान मला मोठा अपघात झाला. डोक्यावर पडून स्मृतिभ्रंश झाला. कित्येक महिने मी कोण, आजूबाजूचे कोण काहीच आठवत नव्हते. पण मी त्यातून बाहेर आले. तेव्हा पहिल्यांदा मला माझ्या मनानं विचारलं की आता बस करायचं का हे? सतत धोक्यांबरोबर खेळणं पुरे करायचं का? पण मी ठाम होते. काम सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. आणखी एका अपघातात मणका फॅक्चर झाला. तेव्हाही अनेक महिने व्हील चेअरवर होते. तेव्हाही थांबावं का असा विचार एक क्षण मनात आला. पण ध्येयात कणखरपणा होता त्यामुळे मागं हटण्याचा प्रश्नच नव्हता. अडथळे हे आपल्यातल्या क्षमतेची आणि निर्धाराची परीक्षा घेतात. तेव्हा अशा अडथळ्यांवर अडकून स्वत:ला थांबवण्याची अजिबात गरज नसते. अडथळा शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक कोणताही असो, ध्येयावर ठाम असाल तर प्रयत्नातून मार्ग निघतोच. 
 
५. सर्वांगानं जगा, पण ध्येय पक्कं ठेवा 
एक ना धड भारंभार चिंध्या असं बहुतेकांच्या बाबतीत होतं. एकावेळी अनेक गोष्टी करून पाहाव्याशा वाटतात. त्या जरूर कराव्यात. पण त्यामुळे आपल्या आयुष्यातलं ध्येय विचलित होता कामा नये. ध्येयहीन गोष्टी आपली कोणतीच ओळख निर्माण करत नाही. जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर सर्वांगानं जगावं पण ठरवलेली एक गोष्ट निष्ठेनं करावी. मी कमांडो प्रशिक्षण देताना अनेक गोष्टी सहज आणि आवड म्हणून केल्या. फेमिना मिसेस इंडिया स्पर्धेत उतरले तिथे रनरअप झाले. मी ब्रूस लीच्या जीत कोन डो या तंत्रावर हातापाई नावाचा चित्रपट काढला, पुस्तकं लिहिली असं खूप काही केलं. पण अनुभव आणि अनुभवातला आनंद म्हणून. पण कमांडो प्रशिक्षण आणि त्यासाठी स्वत:ला विविध अंगानं सज्ज करत राहणं या एका ध्येयावरून मी कधीच ढळले नाही. आपल्याला काय करायचं हे निश्चित केलं आणि ते कायम ठेवलं तर जगण्याचा विविध अंगानं आस्वाद घेता येतो. आनंदी आणि यशस्वी जीवनाचा हाच मंत्र असतो.. ध्येय ठरवा आणि ध्येयावर पक्के राहा! आकर्षण काय चार दिन की चांदनी असतात. 
 
६. फीट आहात?
फिटनेस फक्त आमच्यासारख्या क्षेत्रासाठीच आवश्यक असतो असं नाही. प्रत्येक क्षेत्रात तो गरजेचा आहे. फीट राहण्यासाठी व्यायाम आणि आहाराचे नियम पाळावेच लागतात. फिटनेस ही प्रत्येक कामाची गरज आहे. आज वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षीही मी आठवड्यातून एकदा पाच किलोमीटर पळते. रोज दोन तास मी क्लोज अनआर्म्ड बॅटलचा सराव करते. शनिवार रविवार मी पुरुष खेळाडूसोबत द्वंद्व खेळते. यासाठी २५ ते ३० वर्षाचा आणि माझ्यापेक्षा वजनानं दुप्पट असलेला खेळाडू निवडते. आहाराचे नियमही काटेकोर पाळते. फीट राहिले तरच मी मला जे हवं आहे ते करू शकणार आहे. फिटनेस ही गोष्ट आपल्याकडे खूपच कॅज्युअली घेतली जाते, तर अनेकजण फॅशन किंवा दिखावा म्हणून फिटनेसकडे बघतात. पण हे दोन्ही टाळून तरुणांनी सिरियसली फिटनेसकडे बघणं गरजेचं आहे. आपण आणि आपला देश या फिटनेसशिवाय पुढे कसा जाणार? 
- लेखन आणि संकलन 
माधुरी पेठकर
(माधुरी लोकमत वृत्तपत्रसमूहात उपसंपादक आहे.)
 $madhuripethkar29@gmail.com 

 

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com