मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
आपके हसीन पैरों के लिए..
First Published: 17-May-2017 : 15:21:15

- भक्ती सोमण

फुटवेअर्स नावाचं एक नवं फॅशनेबल जग आपल्याभोवती उभं राहिलं आहे. आपण पायात कुठले चपला-बूट घालतो त्यावरून आपला स्वभावच नाही तर फॅशन स्टेटमेण्ट सांगता येईल इतपत हे जग आता झगमगीत झालंय! पण नक्की आहे काय ट्रेण्ड  सध्या या जगाचा ?

 

एक चप्पल पुरायची पायात असं सांगणारा काळ कुठल्या वेगानं मागे पडला कळलंही नाही. पायात चप्पल असणं हीच मोठी गोष्ट होती. ती फाटली, पार तळ घासला जाऊन छिद्र पडलं मोठं की शिवून आणायची. अंगठे शिवणं आणि सोल लावणं तर नेहमीचंच. 
काही लोकं अगदी आॅफिसला जातानाही स्लिपर्स वापरत असतं. किंबहुना पाय खराब होऊ नये यासाठी पायात काहीतरी घालायला हवं म्हणून चपला, स्लीपर घालायच्या इतपतच होतं या चपलांचं महत्त्व. 
***
पण ग्लोबलायझेशन नावाची एक गोष्ट बऱ्याच गोष्टी घेऊन आली.
त्यातच आला हा एक शब्द.
फुटवेअर.
फुटवेअर फॅशन्स.
चालायचे, पळायचे, व्यायामाचे, आॅफिसचे, पार्टीचे, सिनेमा-हॉटेलात जायचे, लग्नकार्यात घालायचे असे सतराशे साठ प्रकारचे फुटवेअर्स अर्थात पायातले चपला- बुटांचे जोड बाजारपेठेत मिळू लागले. 
चांगलं दिसण्यासाठी कपड्यांना जेवढे पर्याय आले तेच चपलांबाबतीतही झालं. तेच म्हणता म्हणता स्टाइल स्टेटमेंट झालं.
तरीही चार दुकानं फिरून चपला-बूट घ्यायला लागत तेव्हा आपल्या ठरलेल्या दुकानात, ठरलेल्या ब्रॅण्डच्या चपला अनेकजण घेत. पण आता काळ अजून थोडं पुढे सरकला आणि आॅनलाइन साइट्स घरात काय मोबाइलपर्यंत पोहोचल्या. घरबसल्या टुकटुकत खरेदी होऊ शकते. 
त्यामुळे फॅशनच्या जगात जर कुणाची परीक्षा होत असेल तर ती त्याच्या चपलेवरून, बुटांवरून. तुमची चप्पलही तुमचा स्वभाव सांगू शकते आणि स्टाइल स्टेटमेण्ट ठरवते म्हणतात इथवर गेली आहे फॅशन प्रेडिक्शन्स आता.
त्यामुळे फुटवेअरच्या जगात जरा डोकावून पाहू की सध्या काय आणि कसं आहे ट्रेण्डमध्ये? फॅशनेबल आहे? 
पुढच्या खरेदीच्या वेळी ही माहिती हाताशी असलेली बरी..
 
स्लिपर्स/फ्लिप फ्लॉप
स्लिपर्स म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? टिपिकल निळ्या रंगाच्या स्लिपर्स. हा ट्रेंड आजही आहे. मात्र स्लिपर्सऐवजी त्याचं नामकरण झालंय फ्लिप फ्लॉप. सिंपल कलर्ड फ्लिप फ्लॉप्सपासून ते ग्लिटर्ड फॅन्सी प्रकारांपर्यंत विविध पर्याय आता मिळतात. घरात वापरा नाहीतर बीच पार्टी करा फ्लिप फ्लॉपच असतात फॅशनप्रेमींच्या पायात. 
 
सँडल्स
सध्या बाजारात एस्पाड्रिल शूज ट्रेंडमध्ये आहेत. हे शूज कॅज्युएल वापरासाठी असून, कॅनवास आणि कॉटन कपड्यात उपलब्ध आहेत. हटके प्रिंट्स, लेसेस आणि गोल्डन -सिल्वर चमकीच्या वापरामुळे हे शूज सध्या मुलींमध्ये इन आहेत. लांबच्या प्रवासात आणि भरपूर चालायचे असल्यास हे शूज उपयोगी पडतात. 
 
 
बॅलेरिना
फ्लॅट्स प्रकारात मोडणारा हा प्रकार असून, त्या पटकन पायात घालता येतात. रोजच्या वापरासाठी अतिशय उत्तम आहेत. आॅफिससाठीच्या फॉर्मल लूकपासून ते थेट पार्टीसाठीच्या फॅशनेबल लूकपर्यंत सगळ्यामध्ये बॅलेरिनाज फिट बसतात. बॅलेरिनाज प्रवासादरम्यान फिरतानाही सोयीच्या असतात. पावसाळी बॅलेरिनाजना 'जेली' आणि बेल्ट असलेल्या बॅलरिनाजना 'मॅरी जेन्स' शूज असंही म्हणतात.
 
 
वेजेस
हिल्स घालण्याचा सराव करण्याची पहिली पायरी म्हणजे वेजेस. उंच दिसायचे असल्यास, वेजेस हा अतिशय छान पर्याय आहे. वापरायला सोपे असे वेजेस फक्त टाच उंच न करता, पायाचा संपूर्ण तळवा लिफ्ट करते, यामुळे चालताना पाय दुखावण्याची शक्यता कमी होते. प्लॅटफॉर्म हिल्सप्रमाणे यांना बारीक पेन्सिल हिल्स नसतात.
 
 
प्लॅटफॉर्म हिल्स
यांची हिल पेन्सिलीप्रमाणे निमुळती असते आणि शूजच्या पुढच्या भागावर उचललेला असतो. त्यामुळे चवड्यांना आधार मिळतो. आपली उंची जास्त दिसण्यासाठी आणि चालण्यामध्ये लय आणण्यासाठी या शूजचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पार्टीसाठी या शूजची जास्त चलती आहे.
 
 
प्लम्प्स
दिसायला प्लॅटफॉर्म हिल्ससारखेच, पण समोरून प्लॅटफॉर्म हिल्सपेक्षा अधिक रुंद असलेल्या शूजना प्लम्प्स म्हणतात. प्लम्प्सला फॉर्मल लूक असतो. शक्यतो हे शूज मोनोक्रोमॅटिक शेड्समध्ये दिसतात. 
 
 
 
गॅडिएटर्स
फ्लॅट सोल असलेल्या या शूजना विविध पद्धतीच्या वरपर्यंत स्ट्रॅप्स असतात. ग्लॅडिएटर बूटसुद्धा सध्या बरेच गाजत आहेत. रफ अँड टफ स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या या ग्लॅडिएटर्समध्ये सध्या कॉडर््स आणि लेसचा वापरही केलेला दिसतो आहे. 
 
मोजडी
चमचमती, त्यावर नक्षीदार एम्ब्रॉयडरी केलेली मोजडी सध्या सणासुदीच्या काळात घातली जात आहे. यात डार्क रंग जास्त चलतीत आहे. साडी, घागरा, सलवार कमीज या पेहरावांवर मोजडी अतिशय खुलून दिसते.
 
आता अनेक आॅनलाइन साइट्सवर विविध स्टाइलचे शूज मिळायला लागले आहेत. यात तुम्हाला तुमच्या पायाच्या मापानुसार शूज खरेदी करता येतात. लेटेस्ट ट्रेंड अशा साइट्सवर पाहायला मिळतात. यात सध्या बॅलेरिना, कोल्हापुरी चप्पल्स, हिल्स शूजचे विविध प्रकार पाहायला मिळतात. बाजारात मिळणाऱ्या चपलांपेक्षा विविध ट्रेंड्स आणि डिझाइन आॅनलाइनवर उपलब्ध आहेत. यातील चपलांचे दर हे ५०० रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत आहेत. 
 
कस्टमाईज चप्पल्स, शूज
तुमच्याकडे कोल्हापुरी चप्पल आहे किंवा प्लेन काळ्या, ब्राऊन रंगाचे कॅनव्हास शूज आहेत किंवा हिलची सॅण्डल असेल तर त्याला हटके कस्टमाईज लूक देता येऊ शकतो. कॅनव्हास शूजवर रंगीबेरंगी चित्रं काढता येऊ शकतात, तर कोल्हापुरी चप्पल ब्राऊन रंगाऐवजी तुम्हाला हव्या त्या रंगात डिझाइन करता येऊ शकते. त्यावर घुंगरू लावता येतील. या प्रकारात सध्या कस्टमाईज प्र्रॅब्रिक फुटवेअरचा ट्रेंड हा जास्त लोकप्रिय आहे.
पण मुलांचं काय?
मुलांना अर्थात फार पर्याय उपलब्ध नाहीत. त्यांना आॅफिसला जाताना लेदरचे शूज वापरावेच लागतात. यात काळा, चॉकलेटी, डार्क मरून असे रंग लोकप्रिय आहेत. मात्र याचबरोबरीने त्यांच्यात फॅशन आहे ती स्पोर्ट शूजची. हे शूज कधीही घालता येतात. याशिवाय कॅनव्हास शूज, कीटोज, लग्नात घालायला मोजडी, कोल्हापुरी चप्पल्स हेही नेहमीचे पर्याय आहेत.
 
(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे. bhaktisoman@gmail.com ) 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com