मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
जेईई क्रॅक करण्याचा फॉर्म्युला
First Published: 10-May-2017 : 15:53:04
Last Updated at: 10-May-2017 : 16:04:39

- सतीश डोंगरे

कुठलीही परीक्षा असो, 
ती क्रॅक करण्यासाठीचा 
फॉर्म्युला शोधत बसायचं नाही. 
फॉर्म्युला चुकू शकतो.
दुसऱ्याचा फॉर्म्युला आपल्याला
चालेल असंही नाही.
त्यापेक्षा शांतपणे आणि
जमेल तेवढा अभ्यास करायचा. 
मी तरी एवढंच केलं!

नाशिकची वृंदा राठी.

जेमतेम १७ वर्षांची ही हसरी अत्यंत चिअरफुल मुलगी. देशपातळीवर होणारी जेईई अर्थात जॉइण्ट एण्ट्रन्स एक्झाम क्रॅक करत ती मुलींमध्ये देशात पहिली आली..

जेईईत देशात पहिलं येणं ही काही सोपी गोष्ट नाही. यंदा १०.२ लाख मुलं या परीक्षेला बसली होती. त्यातल्या जेमतेम २.२० लाख मुलांनी या परीक्षेत यश मिळवलं. हे आकडे पाहिले की वृंदाच्या यशाची झेप लक्षात येते.

जेईईच्या नावानंच जिथं इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांचा आणि त्यांच्या पालकांचाही थरकाप होतो. या ना त्या एण्ट्रन्स एक्झामचे सतत होणारे ‘नीट’ घोळ तर नेहमीचेच. आणि बारावीनंतर अनेक प्रवेश परीक्षा, त्यासाठीचा अभ्यास, त्यात घरात लागलेला कर्फ्यू, आईबाबांचं चढतं-उतरतं बीपी अशा वातावरणात मुलं ही घनघोर परीक्षा देत आपल्या करिअरचा गेट पास मिळवण्यासाठी जिवाचं रान करत असतात. त्यात ज्यांना आयआयटीला जायचं त्यांच्यासाठी तर ही परीक्षा म्हणजे लाइफटाइम संधी. सर्वस्व पणाला लावतात मुलं (आणि अर्थातच पालकही) या परीक्षेसाठी!

हे एवढं ज्या एका परीक्षेभोवती फिरतं त्या परीक्षेचं टेन्शन काय असेल याची कल्पनाही न केलेली बरी!

आणि त्या टेन्शनच्या दिव्यातून आणि प्रेशरच्या मणामणाच्या ओझ्यासह पार पडायचं आणि सर्वोेच्च यश मिळवायचं हे सोपं कसं असेल?

नसेलच!

पण मग स्ट्रॅटेजी काय असं यश कमावण्याची?

- असा प्रश्न पडतोच.

हा प्रश्न थेट वृंदालाच विचारला.

तर एक मस्त स्माइल देत तीच विचारते, ‘कसली स्ट्रॅटेजी. टेन्शन घ्यायचं नाही, कूल राहायचं, जमेल तेवढी मेहनत सिन्सिअरली करायची. एवढीच स्ट्रॅटेजी!’

जेईई नावाच्या अग्निदिव्यातून निभावून जाणं इतकं सहज आणि कूल कसं काय असू शकेल? याच विषयावर वृंदाशी गप्पा मारताना जाणवत राहतो मग तिचा फोकस. जेईईनंतर कुठल्याच आयआयटीच्या वाटेनं न जाता तिनं बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये जायचं स्वप्न पाहिलं होतं. प्युअर सायन्समध्ये काम करून शास्त्रज्ञ होण्याचं ते स्वप्न. त्या स्वप्नाच्या दिशेनं तिचं पहिलं पाऊल पडलंही..

कसं जमलं ते तिला? कसं जमवता येतं?

जेईईच नाही तर कुठल्याही प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांच्या याच अवघड प्रश्नांची काही उत्तरं वृंदा देतेय..

(सतीश लोकमतच्या नाशिक आवृत्तीत सहायक उपसंपादक आहे.)

‘टेन्शन कशाला घ्यायचं? करायचंय ना आपल्याला, मग मनापासून करायचं. त्यात काय टेन्शन घ्यायचं?’

- हसरी वृंदा आपल्यालाच प्रश्न विचारते तेव्हा वाटतं की कसं सांगणार हिला की परीक्षा म्हटलंकीच टेन्शन येतं. त्यात जेईई, नीट आणि अन्य सीईटीच्या नावानं तर घामच फुटतो.

आणि जेईईत (जॉइंट एण्ट्रन्स एक्झामिनेशन) ३६० पैकी ३२१ गुण मिळवून देशात मुलींमध्ये पहिली आलेली वृंदा राठी म्हणते, टेन्शन नसतंच घ्यायचं. रिलॅक्स राहायचं आणि जमेल तेव्हा अभ्यास करायचा, पण मन लावून!

आपण फिरवून फिरवून विचारत राहतो तिच्या यशाचं सूत्र, तिच्या वेळापत्रकातली शिस्त, जेईई क्रॅक करायची तिची स्ट्रॅटेजी काय म्हणते. पण ती वारंवार एकच फॉर्म्युला सांगते. तसा तो फॉर्म्युला घोकंपट्टी करणाऱ्या आणि चोवीसपैकी पंचवीस तास अभ्यास करणाऱ्या अनेकांना पचणं जरा अवघड आहे. मात्र सोपं करून घेतलं आपलं काम, त्याकडे पाहण्याची आपली नजर साधी मात्र फोकस्ड असली तर काय होऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे वृंदाचं यश. 

साधारण होतं काय की जेईईसारख्या परीक्षेची तयारी करणारे अनेकजण अभ्यास करताना रात्रीचा दिवस करतात. टीव्ही-मोबाइलपासून चार हात दूर राहतात. मित्रांना भेटत नाहीत की चुकून आपल्या खोलीतून बाहेर येत नाहीत. 

मात्र वृंदाचं तसं नव्हतं.

ती सांगते, मी क्लासमध्ये सहा तास अभ्यास करत होते. तेवढा मला पुरत होता. करायचा म्हणून रात्रंदिवस अभ्यास मी केला नाही. जेवढा केला तो मन लावून केला. टाइमटेबल भिंतीवर चिकटवलं ते काटेकोर पाळलं असं काही नाही. कॉलेज, ट्यूशनमधून वेळ मिळाला की घरी जमेल तसा मी अभ्यास करायचे. आपण अमुक एवढाच तास अभ्यास करायला हवा, त्यातही पहाटे उठून अभ्यास करायलाच हवा असं ठरवून अभ्यास करणं मला कधीच जमलं नाही. उलट मी रोज रात्री दहा वाजता झोपते. कधी आरामात सकाळी आठलाही उठले. आणि मग अभ्यासाला बसले की त्यावेळात फक्त अभ्यास आवडीनं आणि खूप शांतपणे केला. रिलॅक्स होते. अमुक एक गोष्ट सिद्ध करायची नव्हती, पण आपण करू ते बेस्टच करू असं मात्र मनाशी पक्कं होतं. 

पण हे असं मनाशी पक्कं करणं, करिअरचा फोकस एकदम पक्का असणं, आणि आयआयटी नको आपण प्युअर सायन्सकडेच जाऊ हा एवढा मोठा निर्णय सहज घेणं कसं जमलं तुला? एवढा मोठा निर्णय, काहीच कन्फ्युजन नव्हतं तुझं?

ती म्हणते, ‘होतं ना! हे करू का ते करू, आपल्याला हेही आवडतं आहे आणि तेही आवडतं आहे असं मलाही वाटत होतंच. दहावीनंतरच या साऱ्या घोळातून गेले मी. मला इतिहास प्रचंड आवडतो. त्यामुळे दहावीनंतर आटर््सला जाऊन इतिहास आणि मॅथ्स असं शिकायचं मी ठरवत होते. पण त्याच काळात करिअर कौन्सिलिंग केलं. अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट केल्या. आपल्याला नेमकं काय आवडतं, कल कुठं आहे हे जाणून घेतलं आणि मग सायन्सला जाणं नक्की केलं. मॅथ्स तर आवडत होतंच, अकरावीत फिजिक्स पण आवडायला लागलं. मग नक्की केलं की आपण प्युअर सायन्स शिकू. अमुक कोर्स करू असं ठरवलं नव्हतं, पण बेंगळुरूच्या सायन्स इन्स्टिट्यूटला जायचं स्वप्न होतं डोळ्यासमोर.’

आपल्या कन्फ्युजनशीही शांतपणे निभावून नेत त्यातून वाट काढणारी ही वृंदाची कूल रीत. तितक्याच शांतपणे ती सांगत असते आपल्या निर्णयामागची एक मोठी प्रक्रिया. 

आणि या साऱ्यात तिच्यासोबत होतीच तिची बासरी. आणि बास्केटबॉलही. अभ्यासाच्या या ताणातही तिच्या हातातली बासरी सुटली नाही. वृंदा उत्तम क्लासिकल बासरी वाजवते. जेव्हा जेव्हा अभ्यासाचा ताण जाणवायचा वृंदा बासरीचा रियाज करायची. कधी बास्केटबॉल खेळायची. त्यासंदर्भात तिला विचारलं की, अनेक मुलांना वाटतं की छंदांपायी वेळ वाया जातो. अभ्यासाच्या महत्त्वाच्या वर्षात ते लांब ठेवलेले बरे. पण तू मात्र असं केलं नाही, ते कसं? 

‘हो, असं कशाला करायचं? आपल्याला जे आवडतं ते करावं, त्यासाठी वेळ दिला तर वाया जाणार असं मनात तरी कशाला आणायचं? मी या काळात बासरी वाजवत होते. उलट त्यानं मला रिलॅक्स व्हायला, स्ट्रेस फ्री राहायला खूप मदतच केली. शांत होते मी. उत्तम सूर लागला की छान आनंदी व्हायचे. त्याचा मला अभ्यासात उपयोगच झाला.’ 

आता वृंदा २३ मे रोजी होणाऱ्या ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ या परीक्षेचीही तयारी करते आहे. ती म्हणते, रिलॅक्स राहायचं. मनावर प्रेशर येऊ द्यायचं नाही आणि अभ्यास मन लावून करायचा, परीक्षा म्हणून दडपण घ्यायचं नाही हे याही परीक्षेच्या वेळी मी स्वत:ला सांगते आहे. तसं करतेही आहे. 

सिम्पल, रिलॅक्स आणि शांत राहिलं तर दडपणाशिवाय या परीक्षा क्रॅक करता येऊ शकतात, असं वृंदा वारंवार सांगत असते, तेव्हा तिच्या नजरेत तिचा आत्मविश्वास दिसत असतोच..

वृंदाबरोबर एक रॅपिड फायर

तुला अभ्यासाचं टेन्शन नाही येत कधीच?

वृंदा- अभ्यासाचं ओझं असं कधी नसतंच. येतो तो ताण आपण कसा पेलतो यावर सारं काही ठरतं. त्यामुळे परीक्षा क्रॅक करण्यासाठीचा फॉर्म्युला शोधत बसायचं नाही. अभ्यास करायचा. दडपण घरी ठेवून परीक्षेला जायचं.

पण तरी दडपण येतंच, तर काय..?

वृंदा- हो मीसुद्धा विद्यार्थी बघितले जे अभ्यासात प्रचंड हुशार असतात. मात्र मनावर फार दडपण असतं त्यांच्या. ऐन परीक्षेच्या दिवशीचं हे दडपण फार धोकादायक बनतं. त्यात स्वत:च्या आणि इतरांच्याही अपेक्षांचं ओझं होतं. त्यांचंही प्रेशर येतं. भीती वाटते. नाही जमलं तर काय असंही त्यांना वाटतं. मला वाटतं असा विचार करू नये. आपण अभ्यास केलाय तर आपल्याला उत्तम मार्क मिळतील एवढा आत्मविश्वास पुरतो. तो सांभाळायचा. आपण जेवडे ‘रिलॅक्स मूड’मध्ये पेपर सोडवू ना तेवढा आत्मविश्वास वाढतो.

तुझ्या आईबाबांना नाही आलं कधी टेन्शन?

वृंदा- नाही. ते पण कूल आहेत. जमेल तेवढं पण मन लावून कर एवढंच ते सांगत. उगीच लकडा नाही लावत मागे कसला.

सगळ्यात महत्त्वाचं फेसबुक/व्हॉट्सअ‍ॅपचं काय केलंस?

वृंदा- काय करणार? मी वापरते ते सारं. ते बंद केल्यानं काही गोष्टी बदलत नाहीत. इच्छा झाली तर व्हॉट्सअ‍ॅप/फेसबुकवर एखादी चक्कर टाकून यायचे. ते बंद करण्याचं, न पाहण्याचं किंवा वेळ वाया घालवण्याचं टेन्शन नव्हतं. आपलं आपल्याला कळतंच ना, कशाला किती वेळ द्यायचा ते!

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com