शनिवार २४ जून २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
हा रुसवा सोड..
First Published: 19-April-2017 : 15:20:56
Last Updated at: 19-April-2017 : 15:42:30

 

- प्राची पाठक

मी ना बोलणारच नाही,

कळू दे त्याचं त्याला!

**

मी का सांगू,

तिला कळायला नको का,

तिचं काय चुकतंय?

**

बोलणारच नाही,

प्रेम आहे ना माझ्यावर

मग मला समजून घेतलंच पाहिजे,

माझ्या मनातलं समजत कसं नाही त्याला?

**

हे असंच सगळं वाटतं तुम्हाला?

मग तुमचा मामला सॉलिड गडबड आहे.

‘याला कळत नाही का?’ 

‘समजत कसं नाही तिला?’

‘नीट वागायला नको? इथे माझ्या मनात काय घालमेल सुरू आहे.’ 

- हे असं मनातलं ओळखा खेळ चालतो ना आपल्या मनात? असं वाटतं ना अनेकदा? 

समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं असं आपल्याला वाटतं. पण आपल्या मनात नेमकं सुरू तरी काय आहे, ते त्यांना कसं कळणार, हेच आपण लक्षात घेत नाही. आपलं मन आॅटोमॅटिकली दुसऱ्याला कसे कळेल? माइण्ड रीडर नावाचं अ‍ॅप इन्स्टॉल केलं आणि तितका वेळ मनातला तितका भाग दुसऱ्याच्या मनात कॉपी पेस्ट केला आणि ब्लू टूथ सारखा धाडला तर बरं होईल ना? कुठं असतं हे असं अ‍ॅप? त्यात आपल्याला सगळंच्या सगळं पण कुणाला सांगायचं नाही. निवडक गोष्टीच सांगायच्या आणि त्यावर तातडीने उत्तरं हवीत. समजून घ्यावं इतरांनी ही अपेक्षा आहेच. आपले दोष आपण क्वचितच पाहणार. दुसऱ्यानं आपलं मन जाणून आपल्या मनासारखं देखील वागायला हवंय. पण हे कल्पनाविलास निबंध लिहिण्याइतपतच ठीक आहेत. प्रत्यक्ष असे कॉपी पेस्ट करता येत नाहीत मनातले कण्टेण्ट. मनाला स्कॅनरदेखील लावता येत नाही. त्यामुळे समोरच्याला आपल्या मनातलं कळत नाही म्हणून रुसून बसणं, अबोला धरणं तितकंसं उपयोगाचं ठरत नाही. असं केल्यानं नात्यातली गुंतागुंत अजून वाढत जाते. ‘नाही बोलत तर नाही, गेले उडत’ अशा ट्रॅकलादेखील तुमची मैत्री-नातं जाऊ शकतं. म्हणूनच रुसवे फुगवे गेम्स खेळण्यापेक्षा मनातलं व्यक्त करता येणं, तेही मोजक्या शब्दांत, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीकडेच हे शिकायला हवंय. 

रुसून बसल्यावर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो आपलं रुसून बसणं, आपला अबोला. पण तो समोरच्यापर्यंत गेला तरी आहे का? आपण मनात हिशेब मांडत बसायचं, समोरच्याला कळलं की नाही? कळलं तर कसं आणि कितपत? नाही कळलं तर कसं आणि का? ते पोहोचलंच नसेल तर उपयोग काय रुसून बसण्याचा? आपला अबोला आपल्याला हवा तसा पोहोचला की नाही, अशी घालमेल सुरू होते मग! त्यातून मनातल्या मनात गैरसमज सुरू होतात दोन्ही बाजूने. चुकीच्या प्रकारे आपलं रुसून बसणं बघितलं जाऊ शकतं. म्हणजे छोट्याशा मुद्द्यावरून लाडिक खेळ खेळायला गेलं तरी गैरसमजाचे मोठे डोंगर उभे राहू शकतात. एका छोट्याशा गोष्टीसाठी मनातल्या मनात कुढून काही गेम्स खेळत बसण्यापेक्षा योग्य प्रकारे आपलं म्हणणं मांडता येणं आणि आयुष्यात पुढे जात राहणं खूपच श्रेयस्कर ठरतं. मन वेधून घ्यायचा छोटासा प्रयत्न, इतपतच तो अबोला असेल आणि लगेच मिटणार असेल तर एकवेळ ठीक असतं; पण आपल्या अबोल्यानं दुसऱ्या कुणाला सुधरायला जाणार असू, त्यानं आपल्या मनासारखं वागावं म्हणून अबोला आणि रुसवे फुगवे असतील तर नीट विचार केला पाहिजे. ते टाळता आले पाहिजे. संवाद साधून, व्यक्त होऊन मुद्दे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत नीट पोहोचवता आले पाहिजेत. 

नीट बघा, मनातला गोंधळ नीट मांडा आणि स्वत:च्या चुका आधी हाताळून-समजून घेऊन मग योग्य प्रकारे थेट त्याच व्यक्तीशी बोलायला जा. 

हा फंडा वापरता येतोय का, बघा तरी विचार करून... 

लाइन एकदम क्लिअर आणि आयुष्य पुढे सुरू, असं मस्त वाटू लागेल मग.. 

( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)

जमावं कसं, दुसऱ्याचा क्लिअर विचार करणं?

कुणाचा राग आला, कुणी त्रास दिला असं वाटलं, अपमान झाला, आपण हर्ट झालो तर आपलं म्हणणं काय की चूक त्यांचंच. आपण कायम ‘समोरचाच दोषी’ अशा नजरेनं जग पाहणार!

खरंच तसं असतं का?

अनेकदा माणसं त्या त्या परिस्थितीत तशी वागतात. पण म्हणून त्यांना एकदम लेबल्स लावणं टाळता आलं पाहिजे. अधिकाधिक समजून घेता येईल का त्यांना, असं बघायला हवं. त्यात अबोला किंवा रुसवे फुगवे फार काळ धरून बसलं तर अनेकदा हाती काहीच लागत नाही. आयुष्य तिथंच अडकवून ठेवायचं की पुढे जायचं ते बघावं लागतं. 

समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीत आणि का तशी वागली, हे थेट विचारून क्लिअर करणं जमत नसेल तर आपण तिच्या बाजूनं थोडा विचार करून बघायचा. आपल्याकडे, आपल्या वागण्याकडे दुरून पाहून बघायचं. एखादं झाड किती उंच आहे, कसं आहे, किती फांद्या त्या झाडाला आहेत, कोणत्या फांद्या कोसळू शकतात वादळात, त्याचा अंदाज योग्य अंतरावरून लांबून बघून जास्त चांगला येतो. थेट झाडाखालीच उभं राहून झाडाची उंची नीट कळत नाही. आहे त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचं भासतं मग सगळं. त्यापेक्षा योग्य अंतरावरून पिक्चर एकदम क्लिअर दिसतं. जे रुसव्याफुगव्यांचं तेच इतरांकडून आपण करत असलेल्या अपेक्षांचं!

बघा दिसतंय का आता पिक्चर क्लिअर?

दुसऱ्याचं जाऊद्या, 

स्वत:चं मन कसं वाचाल?

त्यासाठी आपल्या मनात नेमका काय गोंधळ झालेला आहे, ते टिपता आलं पाहिजे. 

काय सुरू आहे आपल्या मनात, ते आपल्याशीच बोला आधी.

जमलं तर कागदावर लिहून काढा. 

मला अमक्याचा राग आला आहे का? 

असेल, तर का? 

काय केलं आपण तर तो राग जाईल? 

काय केलं त्यानं तर तो राग जाईल? 

माझा राग मुळात अवाजवी आहे का? 

राग येण्याची कारणे काय आहेत? 

दुसऱ्याच्या बाजूने आपण आपल्या रागाकडे पाहू शकतो का?

हा नेमका राग आहे की अपेक्षा आहे की दोन्ही आहेत? 

ते कितपत साध्य होण्याजोगं आहे? 

आपल्या अपेक्षा अवाजवी तर नाहीत?

ही अपेक्षा किंवा मुद्दा बोलून, व्यक्त होऊन समोरच्याकडे पोहोचवता येईल का? 

बोलता येत नसेल तर त्याबद्दल लिहिता येईल का? 

कोणत्या वेळी बोलायचं, कसं बोलायचं हे ठरवता येतं आहे का? 

ती वेळ समोरच्याला सोयीची आहे का? की आधी त्याला कोणती वेळ सोयीची आहे असं विचारावं?

समोरून नकार आला, तर तो आपण पचवू शकणार आहोत का? 

भलेही आपला मुद्दा आपल्या दृष्टीने आणि एरवीही बरोबर आहे असं आपल्याला वाटतं आहे. तरीही तो मुद्दा समोरच्याला पटला नाही, तर पुढचे प्लॅन्स काय असतील? आयुष्य याच एका मुद्द्यावर थांबवून ठेवायचं आहे का? 

केवळ एकच मुद्दा आपलं संपूर्ण भावनाविश्व का व्यापून ठेवतो आहे? 

तो ओलांडून आपल्याला आयुष्यात दुसरं काही करता येईल का? 

- विचारा तरी हे प्रश्न स्वत:ला?

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com