मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
T-20 ब्लाइण्ड क्रिकेट वर्ल्ड एक जिद्दी नजरिया
First Published: 15-March-2017 : 19:17:09
Last Updated at: 15-March-2017 : 19:26:04

- ऑक्सिजन टीम  

आपण काय जिद्दीच्या गप्पा मारतो, कसली गाऱ्हाणी सांगतो, परिस्थितीची आणि वेदनांची गुऱ्हाळं चालवतो.. हे सारं झटकून टाकून जिद्द म्हणजे काय आणि यशाची महत्त्वाकांक्षा म्हणजे काय असते हे समजून घ्यायचं असेल तर नुकताच अंधांसाठीचा क्रिकेट वर्ल्डकप जिंकून आलेल्या भारतीय टीमला भेटा.. इतकी संसर्गजन्य आहे त्यांच्यातली ऊर्जा की त्यातून जगण्याचा एक दृष्टिकोनच ते नव्यानं देतात. अंधांसाठीचा टी-व्टेण्टी वर्ल्डकप नुकताच झाला आणि बेंगळुरूला झालेल्या फायनल मॅचमध्ये भारतीय संघानं थेट पाकिस्तानलाच हरवत वर्ल्डकप जिंकला. पाकिस्तानच नाही आॅस्ट्रेलिया आणि बांग्लादेशसह सर्वच अंध खेळाडू टीम्स इतक्या जिद्दीच्या होत्या की एकूण एक सामना अटीतटीचा झाला.. सोपं नाही हे क्रिकेट खेळणं.. प्रचंड आवाजात, स्कोअरच्या पुकाऱ्यात खेळाडूंना कानात प्राण आणून विकेटकिपर देत असलेल्या सूचनांकडे आणि सांगत असलेल्या दिशेकडे लक्ष द्यावं लागतं. चेंडूतून येणाऱ्या आवाजाकडे कान लावावा लागतो. प्रचंड एकाग्रता असल्याशिवाय उत्तम कामगिरी होऊच शकत नाही या क्रिकेट प्रकारात.. पण क्रिकेट ते क्रिकेटच. हे खेळाडू खेळतातही ते अ‍ॅग्रेसिव्हली.. आणि प्रचंड त्वेषानं विजयश्री खेचूनही आणतात.. स्ट्रॅटेजी असते, कोणता खेळाडू कोणत्या क्रमांकावर खेळवायची.. कारण बी-१ म्हणजे पूर्ण दृष्टिहीन खेळाडू, बी-२ म्हणजे ५ टक्के दृष्टी आणि बी-३ म्हणजे ५ ते १० टक्के दृष्टी अशी वर्गवारी असते. गरजेप्रमाणे मग खेळाडू मैदानात उतरवले जातात.. आणि मग जो खेळ रंगतो तो असा की क्रिकेटच्या मॅजिकल खेळातली जादू आणि थरार पाहणाऱ्यांना चकित करून सोडतो.. आपल्याच देशातल्या अंध तरुण खेळाडूंची ही गोष्ट नाही, तर जगभरातल्या अंध क्रिकेट खेळाडूंच्या जिद्दीची ही गोष्ट आहे. कष्टाची आणि जिंकण्याची गोष्ट आहे.. त्यातलाच एक खेळाडू महाराष्ट्राचा, तो भारतीय संघातून खेळला. अनिस बेग. मूळचा नाशिकचा. वर्ल्डकप जिंकून आलेल्या अनिसची ‘आॅक्सिजन’ने खास भेट घेतली आणि त्याच्या जिंकण्याचा प्रवास त्यानं आपल्यासोबत वाटून घेतला.. त्या प्रवासाला चला, आणि उमेदीशी दोस्ती झाली नाही तर सांगा...

 

 

महाराष्ट्र सरकारला जिद्दीचं कौतुकच नाही

विश्वविजेत्या संघात स्थान मिळविलेला अनिस हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी या टीमसाठी दहा लाख रुपये बक्षिसाची घोषणा केली. २८ फेबु्रवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सर्व खेळाडूंची भेट घेतली. प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणाही केली. शेजारी कर्नाटक सरकारने तर संघात सहभागी आपल्या दोन खेळाडूंना प्रत्येकी सात लाख रुपये व शासकीय नोकरी देऊ केली. आंध्र प्रदेश सरकारनेही आपल्या चार खेळाडूंना पाच लाख रुपये दिले. पण महाराष्ट्र सरकार? महाराष्ट्र सरकारकडून मात्र (हा लेख छापायला जाईपर्यंत तरी) अनिसचा कुठल्याही प्रकारचा सत्कार करण्यात आला नाही. त्याला कसलीही आर्थिक मदत, बक्षीस देण्यात आलं नाही. साधं कौतुकही सरकारच्या वतीनं कोणी केलं नाही. अनिस याविषयीची खंत बोलून दाखवतो.. आपण आपल्याच परिस्थितीवर मात करून इथवर पोहचलो आहे. पुढे अजून लढू, अजून चांगलं खेळू, देशासाठी अजून उत्तम कामगिरी करू, असं अनिस सांगतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर त्याची जिद्द स्पष्ट दिसत असते.

 

अंध खेळाडू क्रिकेट खेळतात तरी कसं? 

अंध क्रिकेटपटू क्रिकेट खेळतात कसं? बॉल टाकला हे बॅट्समनला कसं कळतं? बाउण्ड्रीवर उभ्या खेळाडूला कळतं कसं की चेंडू येतोय, कॅच घ्यायचाय किंवा फोर अडवायचा आहे? सोपं नाही अंध खेळाडूंसाठी ते! त्यांच्या जिद्दीचाच नाही, तर खेळातल्या कौशल्याचाही इथं कस लागतो. अंधांच्या या क्रिकेट खेळात ११ खेळाडूंपैकी चार असे खेळाडू असतात, जे पूर्णत: दृष्टिहीन असतात. बी १, बी २, बी ३ अशी वर्गवारी केलेल्या खेळाडूंना आवाजाच्या साहाय्यानेच मैदानावर हालचाली कराव्या लागतात. सामान्य क्रिकेटमध्ये सिझनचा चेंडू असतो. मात्र अंध क्रिकेटमध्ये हा चेंडू फायबरचा असतो. शिवाय त्यामध्ये बेरिंग असल्यानं त्यातून विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. त्या आवाजाच्या दिशेनं या खेळाडूंच्या सर्व हलचाली होतात. गोलंदाज किंवा फलंदाज यांना ‘रेडी’ असा इशारा दिल्यानंतरच फलंदाजी किंवा गोलंदाजी केली जाते. त्याचबरोबर गोलंदाज आणि विकेटकिपर यांच्यात सातत्यानं समन्वय ठेवावा लागतो. या खेळात विकेटकिपरची महत्त्वाची भूमिका असते. तो आवाजाच्या साहाय्याने संपूर्ण टीमला दिशादर्शनाचे काम करीत असतो. त्याचबरोबर अम्पायर डोळस असल्यानं ते खेळाडूंना सूचना देण्याचं कामही करत असतात.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com